
>> डॉ. प्रीतम भि. गेडाम, [email protected]
दरवर्षी एचआयव्ही/एड्स, बेकायदेशीर ड्रग्स, आत्महत्या, हत्या, रस्ते अपघात आणि आगीमुळे एकत्रितपणे जितके लोक मरतात त्यापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू तंबाखूमुळे होतो. तंबाखूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागरुकता, इच्छाशक्ती आणि समज. देशाचे उज्ज्वल भविष्य घडवणाऱया पिढीला तंबाखूच्या विषापासून वाचविण्याची गरज आहे. आजच्या जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त…
आपल्या समाजात आणि देशात तंबाखूचे विष आपल्या आजूबाजूला अगदी सहज उपलब्ध आहे. लहान मुलांपासून तरुण, महिला, वडीलधारी मंडळी तंबाखूच्या व्यसनाच्या आहारी गेली आहेत. घर-ऑफिस असो, चौक, बाजार, कार्यालय, संस्था किंवा इतर कोणताही परिसर, अनेक लोक तोंडात तंबाखू दाबताना किंवा सिगारेट फुंकताना दिसतात. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी असतानाही लोक नियम मोडतात. सध्या शहरांमध्ये ई-सिगारेटचा ट्रेंड सुरू झाला असून त्याकडे नवीन पिढी आकर्षित होत आहे. तंबाखूचे सेवन बिडी, सिगारेट, हुक्का, सिगार, चुटा, धुमटी, चिलम, चिरूट, गुटखा, खैनी, जर्दा, खर्रा, तंबाखू पान मसाला, तंबाखूची सुपारी, मावा, स्नूस, मिश्री, गुल, स्नफ व इतर स्वरूपात करण्यात येते. तंबाखू जाळल्यावर त्या धुरातून निघणारी अनेक विषारी रसायने आणि संयुगे मानवी शरीरासाठी हानीकारक असतात. तंबाखूतील निकोटिन हे हेरॉइन, कोकेन आणि अल्कोहोलसारखे व्यसन आहे, ते काही सेकंदांत मेंदूपर्यंत पोहोचते. धूम्रपान केल्याने फुप्फुसांचे नुकसान होते, स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि तग धरण्याची क्षमतादेखील कमी होते. निकोटिनव्यतिरिक्त तंबाखूमध्ये अमोनिया, आर्सेनिक, कार्बन मोनॉक्साईड, टार, नॅप्थालिन, किरणोत्सर्गी संयुगे, हायड्रोजन सायनाईड, शिसे, कॅडमियम, मेन्थॉल यांसारखे विषारी घटक असतात. तंबाखू मानवी शरीराला जीवघेण्या आजारांकडे ढकलते.
धूम्रपान करणारे इतरांपेक्षा 13-14 वर्षे आधी मरतात. दरवर्षी एचआयव्ही/एड्स, बेकायदेशीर ड्रग्स, आत्महत्या, हत्या, रस्ते अपघात आणि आगीमुळे एकत्रितपणे जितके लोक मरतात त्यापेक्षा जास्त लोक तंबाखूमुळे मृत्युमुखी पडतात. दररोज 2800 आणि दरवर्षी एक दशलक्षाहून अधिक हिंदुस्थानी तंबाखूजन्य आजारांमुळे अकाली जीव गमावतात. 2011 मध्ये हिंदुस्थानात तंबाखूजन्य आजारांवरील उपचारांचा एकूण खर्च 1लाख कोटी रुपये होता. धूम्रपान करणाऱयांना फुप्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता 20-25 पट जास्त असते, हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 2-3 पट जास्त असते, अचानक मृत्यू होण्याची शक्यता तीनपट जास्त असते, स्ट्रोक येण्याची शक्यता दोनपट जास्त असते, श्वासोच्छ्वासाचा त्रास होण्याची शक्यता तीनपट जास्त असते. तंबाखूच्या दीर्घकाळ वापरामुळे फुप्फुस, तोंड, ओठ, जीभ, अन्ननलिका, घसा आणि मूत्राशयाचा कर्करोग होऊ शकतो. तंबाखूचा धूर 70 कर्करोगांस कारणीभूत घटकांसह हे सात हजारांहून अधिक रसायनांचे जटील मिश्रण आहे. जागतिक स्तरावर दरवर्षी सहा लाख मृत्यू सेपंडहँड स्मोकमुळे होतात.
तंबाखू वापरणाऱयांपैकी निम्म्यांचा मृत्यू होतो. प्रत्येक सिगारेट 8 ते 11 मिनिटांनी आयुष्य कमी करते. तंबाखूमुळे दरवर्षी 80 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. त्यापैकी 70 लाखांहून अधिक मृत्यू थेट तंबाखूच्या वापरामुळे झाले आहेत, तर सुमारे 12 लाख मृत्यू हे धूम्रपान न करणाऱयांचे सेकंडहँड धुरांच्या संपका&त आल्याने होतात. जगातील 130 कोटी तंबाखू वापरकर्त्यांपैकी 80 टक्क्यांपेक्षा जास्त लोक कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये राहतात. 2020 मध्ये जागतिक लोकसंख्येच्या 22.3 टक्के पुरुषांपैकी 36.7 टक्के आणि महिलांपैकी 7.8 टक्के तंबाखूचा वापर करतात. तंबाखूमुळे हिंदुस्थानात दरवर्षी सुमारे 13.5 लाख लोकांचा मृत्यू होतो. म्हणजे दररोज सरासरी 3699 मृत्यू, दर तासाला 154. तंबाखूच्या हानीकारक परिणामांमुळे दर पाचपैकी एका पुरुषाचा मृत्यू होतो.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने जारी केलेल्या राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रम अहवाल 2020 नुसार, देशातील सर्व कर्करोगांच्या 27 टक्के प्रकरणांसाठी तंबाखू जबाबदार आहे. ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हे इंडिया 2016-17 नुसार, हिंदुस्थानात सुमारे 26.7 कोटी प्रौढ तंबाखू वापरकर्ते आहेत. देशाच्या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणच्या नॅशनल फॅक्ट शीट ग्लोबल यूथ टोबॅको सर्व्हे (जीवायटीएस-4) 2019 नुसार, 13-15 वयोगटातील सुमारे पाचवा भाग त्यांच्या आयुष्यात तंबाखूजन्य पदार्थ वापरतात. तंबाखू सेवनाचे प्रमाण मुलांमध्ये 9.6 टक्के आणि मुलींमध्ये 7.4 टक्के आहे. तंबाखूच्या धूम्रपानाचे प्रमाण 7.3 टक्के आहे. धूरविरहित तंबाखूजन्य उत्पादनांच्या बाबतीत त्याचे प्रमाण 4.1 टक्के आहे. विद्यार्थ्यांमध्ये ई-सिगारेटचा वापर 2.8 टक्के आहे. या राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये सध्याची तंबाखू वापराची टक्केवारी अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम (प्रत्येकी 58 टक्के) ते हिमाचल प्रदेश (1.1 टक्के) आणि कर्नाटक (1.2 टक्के) आहे. हिंदुस्थानात तंबाखूची एकूण किंमत सकल देशांतर्गत उत्पादनाच्या 1.04 टक्क्यांच्या बरोबरीचे आहे आणि डब्ल्यूएचओने प्रकाशित केलेल्या एक संशोधनानुसार, तंबाखूशी संबंधित आजारांच्या उपचारांवर थेट आरोग्य खर्च हा हिंदुस्थानातील एकूण वार्षिक खासगी आणि सार्वजनिक आरोग्य खर्चाच्या 5.3 टक्के आहे.
व्यसन फक्त नाश करते, मग ते कोणतेही असो. धूम्रपान करणाऱया व्यक्तीला गंभीर आजारांमुळे आपला जीव गमवावा तर लागतो, पण त्या धुराच्या संपर्कात आलेले कुटुंबीय किंवा तिथे श्वास घेणारे इतर लोकही जीवघेण्या आजारांच्या विळख्यात येतात. तंबाखू मानवी शरीराला आतून पूर्णपणे पोकळ बनवून कमकुवत करते. शरीर बिघडवून वेदनादायक, घातक रोगांनी अकाली मृत्यूच्या तोंडात टाकते. यापैकी बहुतेक रोगांवर उपचार खूप महागडे असतात. उपचारांसाठी खर्च करून, कर्जाच्या ओझ्याखाली येऊनदेखील अनेक वेळा या आजारांपासून सुटका होत नाही. तंबाखूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागरुकता, इच्छाशक्ती आणि समज. देशाचे उज्ज्वल भविष्य घडवणाऱया पिढीला तंबाखूच्या विषापासून वाचविण्याची गरज आहे. मुलांना नशेपासून दूर ठेवण्यासाठी पालक आणि शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे.