लेख – विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य कसे राखावे?

>> डॉ. अंजुषा पाटील

पालक हे अप्रशिक्षित शिक्षक असतात व शिक्षक प्रशिक्षित पालक असतात. दोघांनीही सुसंवाद व निरीक्षणातून मुलांचे गुण, त्यांची बलस्थानं व उणेपणा जाणून घेऊन मनःस्वास्थ्य जपलं पाहिजे. पालकांचं वागणं मुलांसमोर आदर्श असलं पाहिजे. पालकांसाठीही प्रभावी पालकत्वावर अनेक पुस्तकं आहेत, कार्यशाळा, मानसशास्त्रज्ञ बालरोगतज्ञ, शिक्षक, खूप साऱया वेबसाईटस् नेटवर उपलब्ध आहेत, त्याचा वापर पालकांनी केला तर त्यांना नक्कीच मार्गदर्शन मिळेल आणि मुलं आणि पालक यांचे स्नेहसंबंध निकोप बनतील. अर्थातच विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगलं राहील.

मानसिक आरोग्य म्हणजे आयुष्यात येणाऱया अनुभवांना खंबीरपणे सामोरे जाणे होय. तसेच कुटुंबातील व इतर लोकांशी चांगले नाते असणे असा याचा अर्थ आहे. मानसिक आरोग्य चांगलं आहे असं आपण केव्हा म्हणतो?

1. जेव्हा त्या माणसाचं मन शांत असते.
2. इतरांबरोबर जुळवून घेता येते.
3. कोणी नावं ठेवली, उणीदुणी काढली किंवा मुलांच्या भाषेत चिडवलं तरी दुखावले न जाणे.
4. आपल्या प्रश्नांची आपणच उत्तरे शोधणे.
5. मनावर ताबा असणे.
6. जीवनातले ताण-तणाव, काळजी सहन करण्याची क्षमता असणे.

मानसिक आरोग्य चांगले राहण्याकरिता आहार- विहार, आचार – विचार शुद्ध व पवित्र असायला हवेत. प्रसन्न मनात प्रसन्न विचार येतात. समर्थ रामदास म्हणतात, ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण.’

सध्याची कोरोना महामारीची नकारात्मक परिस्थिती आहे. त्यावर मात करण्यासाठी सकारात्मकता ही काळाची गरज आहे. मग त्यासाठी विद्यार्थी, मुलेच नाहीत, सर्वांनाच या मानसिक आरोग्याची गरज आहे. पण विद्यार्थी हे कमी वयाचे, संवेदनशील असतात. त्यांच्या मनावर कोणत्याही चांगल्या, वाईट गोष्टींचा लगेच परिणाम दिसून येतात आणि त्याचे पडसाद संपूर्ण कुटुंबांवर उमटतात. त्यासाठी विद्यार्थ्यांनी व्यक्त झालं पाहिजे. आई, वडील, भावंडं यांच्याशी बोललं पाहिजे. संवाद साधला पाहिजे. पुस्तके वाचली पाहिजेत. टीवी, मोबाईलवरचे निवडक कार्यक्रम पाहता येतील. यूटय़ूबवर लहान मुलांसाठी स्पेशल कार्यक्रम असतात, त्यांचा वापर अर्धाएक तास करावा.

संगीत, कला, क्रीडा, साहित्य या माध्यमांतून त्यांना आनंददायी शिक्षण देऊन संस्कारित करण्याचा प्रयत्न करता येईल. हे लगेच होणार नाही. त्यासाठी पालकांना त्यात सहभागी व्हावं लागेल. मुलांचं वय, क्षमता, कल लक्षात घेऊन पालकांनी मुलांच्या मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी प्रयत्न करावेत. सर्वप्रथम या मुलांशी म्हणजे शालेय विद्यार्थी आहेत त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्यांची आवड लक्षात घेतली पाहिजे. घरातच वर्षभर राहून, टीवी पाहून, व्हिडीओ गेम खेळून मुलांना कंटाळा आलेला आहे. शाळेत शिक्षकांचा धाक व आदरयुक्त भीती मुलांना वाटते. तेवढा आदर मुलं आईवडिलांचा करतीलच असं नाही. म्हणून सर्वप्रथम पालकांनी घरात खेळीमेळीचं, आनंददायी वातावरण तयार करून वेगवेगळ्या माध्यमांतून त्यांना गुंतवून ठेवलं पाहिजे. त्यांची आकलनशक्ती, भावनिक क्षमता हे तणावविरहित झाले पाहिजेत. घरच्या कौटुंबिक, मानसिक, भावनिक… सर्व वातावरणाचा परिणाम या शाळकरी मुलांवर पडतो. आपल्यासमोर जे विद्यार्थी आहेत ते वय वर्षे 6 ते 18 पर्यंतचे आहेत.

‘विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य’ हा माझ्या अभ्यासाचा व संशोधनाचा विषय आहे. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील हजारो विद्यार्थ्यांचं निरीक्षण मी केलेलं आहे. शिक्षिका म्हणून 36 वर्षे व मुख्य म्हणून 2 वर्षांचा अनुभव लक्षात घेऊन मुलांच्या मानसिक आरोग्यकडे लक्ष देणं गरजेचं आहे हे प्रकर्षानं जाणवलं.

प्रत्येक मूल समान असते. प्रत्येक बालक विशाल समाजाचाही एक घटक आहे. प्रत्येक प्रौढ व्यक्ती समाजातल्या प्रत्येक बालकाचा पालकच आहे. मुलांनी वेळेवर अभ्यास केला, एखादे चांगले काम केले तर त्याची दखल घेऊन शाबासकी दिली पाहिजे.

मुलांना घरात व शाळेतही छोटय़ा मोठय़ा कामात सहभागी करून घेतले पाहिजे. मुलं अनुकरणप्रिय असतात. त्यांना कामं करायला आवडतात. त्यामुळे मुलांच्या सामर्थ्याची / सुप्त गुणांची आणि कमजोरीची नोंद घेतली तर त्यांच्या विकासात मदत करता येईल.

शाळेत परिपाठच्या वेळेला नेतृत्व करणे, रांगा लावणे, वर्गमंत्री, अभ्यासमंत्री, शिस्तमंत्री अशी कामे देऊन त्यांचे नेतृत्वगुण दिसून येतात. घरी असताना निरोप पोहोचवणे, पाणी नेऊन देणे, बाबांना चहा देणे, केर काढणे, कपडय़ांच्या घडय़ा करणे अशा कामांपासून सुरुवात करून अत्यंत कुशल कामाचा टप्पा क्रमाक्रमाने गाठता येतो. त्यामुळे बालकांचे समाजीकरण होते. आधी कुटुंब, शाळा आणि समाज या तीन स्तरांवर संधी दिली तर मुलं मिळून मिसळून वागतात. ज्ञान, कृती आणि भावना यांचा योग्य वेळी मेळ घालता येतो. त्यामुळे मुलांना ताण येत नाही. अर्थात त्यांच्या मानसिक विकासाला चालना मिळते व सुरक्षित वाटते.

मूल हे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. त्याच्याशी पालकांना सुसंवाद साधता आला पाहिजे. आजची मुलं स्वावलंबी व स्वतंत्र राहू इच्छितात. त्यासाठी पालकांचा जबाबदारी वाढली आहे.

आपल्या बोलण्यातून, वागण्यातून मुलांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संस्कार होत असतात. त्यांच्या विकासासाठी, भल्यासाठी जास्तीत जास्त चांगले करण्याची सगळ्याच पालकांची इच्छा असते, पण मुलं आणि पालक यांच्यात मनःसंवाद घडत नाही, उलट कधी कधी संवादयुद्ध धुमसत असतात. म्हणून मुलांची मानसिकता हळुवारपणे जाणून घेणे गरजेचे आहे.

पालक हे अप्रशिक्षित शिक्षक असतात व शिक्षक प्रशिक्षित पालक असतात. दोघांनीही सुसंवाद व निरीक्षणातून मुलांचे गुण, त्यांची बलस्थानं व उणेपणा जाणून घेऊन मनःस्वास्थ्य जपलं पाहिजे.

कुटुंबातील व्यक्तींमध्ये प्रेम असलं पाहिजे. प्रभावी पालकत्व ही आज काळाची गरज आहे. आज नात्यातले संबंध दुरावत चालले आहेत, पण मुले आणि पालक यांच्या संबंधात दुरावा कोणालाच परवडण्यासारखा नाही.

मुले आणि पालक यांचा होणारा संवाद सुखकारक होण्यासाठी डॉ. थॉमस यांनी सांगितलेले 12 अडथळे समजून घेतले तर वाढत्या वयाच्या मुलांचा मानसिक विकास चांगल्या प्रकारे होईल.

1. आज्ञा देणे 2. कानउघाडणी करणे 3. उपदेश देणे 4. सूचना देणे 5. भाषणबाजी करणे 6. टीका करणे 7. अतिस्तुती 8. नावे ठेवणे 9. निदान करणे 10. खात्री करणे 11. छडा लावणे (उलटतपासणी) 12. टाळाटाळ करणे अशा प्रकारच्या कृती मुलांचा मानसिक ताण वाढवतात. म्हणून त्याच्या कलाने घेऊन प्रेमाने विश्वासाने सुसंवाद साधला पाहिजे.

मुलांवर संस्कार घडवण्यासाठी ती आदर्श कृती प्रथम पालक म्हणजे आईवडील यांनी करावी.

समर्थ रामदासांनी म्हटलं आहे, ‘सोसता सोसेना संसाराचा ताप, तेणे मायबाप होऊ नये’. संसार हा ताप वाटत असेल अशा पालकांनी मायबाप होऊ नये.
मुलांनी ‘मनाचे श्लोक’ म्हणावे असे वाटत असेल तर घरातल्या मोठय़ा माणसांनी ते आधी म्हणावे. ‘दिसामाजी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अंखडित वाचित जावे’. वाचन पालकांनी केलं तर मुलांनाही आवडेल. वाचन हा एक संस्कारच आहे.

पालकांचं वागणं मुलांसमोर आदर्श असलं पाहिजे. पालकांसाठीही प्रभावी पालकत्वावर अनेक पुस्तकं आहेत, कार्यशाळा, मानसशास्त्रज्ञ बालरोगतज्ञ, शिक्षक, खूप साऱया वेबसाईटस् नेटवर उपलब्ध आहेत, त्याचा वापर पालकांनी केला तर त्यांना नक्कीच मार्गदर्शन मिळेल आणि मुलं आणि पालक यांचे स्नेहसंबंध निकोप बनतील. अर्थातच विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगलं राहील.

(लेखिका ज्येष्ठ शिक्षिका आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या