बाळासाठी कोलोस्ट्रमचे फायदे

>> डॉ. तुषार पारीख 

आईचं दूध हे बाळासाठी अमृत मानलं जातं. डिलिव्हरीनंतर आईच्या शरीरात जे बदल होतात, त्यातील एक बदल होतो स्तनांतील दुधामध्ये आणि डिलिव्हरीनंतर स्तनांमध्ये जे पहिले दूध येते त्याला कोलोस्ट्रम असे म्हणतात.  

कोलोस्ट्रम हे बाळासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे ठरते. त्यामध्ये प्रथिने, क्षार, अॅण्टिबॉडीज आणि बचावात्मक वैशिष्टय़े आहेत, जी आपल्या बाळासाठी उपयुक्त आहेत. कोलोस्ट्रममध्ये जास्त प्रथिने असतात. परंतु साखर, चरबी आणि कॅलरीज कमी असतात. बाळाच्या जन्मानंतरचे पहिले काही दिवस आईचे दूध घट्ट आणि पिवळय़ा रंगाचे असते, ज्याच्या सेवनाने बाळाला अनेक फायदे होतात.

बाळाला कोलोस्ट्रमचे फायदे कोणते? 

हे दूध गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यांत आणि डिलिव्हरीनंतर काही दिवसांत येते. या दुधामुळे नवजात अर्भकाला खूप लाभ होतात. तुमच्या बाळाची रोगप्रतिकार शक्ती व विकास होण्यात याचा फायदा होतो (यामध्ये अॅण्टिबॉडीज आणि पांढऱया रक्तपेशी असतात). बाळाच्या पोटात आणि आतडय़ांवर एक जाड थर तयार करते, ज्यामुळे पांमण आणि जळजळ दूर होते. अर्भकाला मेकोनियम (काळय़ा रंगाची प्रथम विष्ठा) करण्यास मदत करते. कावीळसारख्या आजारास प्रतिबंध करते आणि टाक्सिन्स काढून टाकण्यास मदत करते. बाळाचा मेंदू, दृष्टी आणि हृदयाला विकासासाठी आवश्यक असलेले पोषण देते. यात प्रथिने, क्षार आणि जीवनसत्त्वांचे प्रमाण अधिक असते. या दुधातील पोषक द्रव्ये ही बाळाला सहज पचतात. हे आपल्या बाळासाठी एक आदर्श पोषण ठरते. बाळाच्या रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य राखण्यास मदत होते.

कोलोस्ट्रम आणि आईच्या दुधामध्ये महत्त्वाचे फरक कोणते? 

कोलोस्ट्रममध्ये इम्युनोग्लोबिन असतात, जे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि आजारपणापासून संरक्षण करण्यास मदत करतात. कोलोस्ट्रममध्ये दुधापेक्षा दुप्पट प्रोटिन असते. कोलोस्ट्रममध्ये चारपटीने अधिक झिंक असते. कोलोस्ट्रममध्ये चरबीचे प्रमाण कमी आणि साखरेचे प्रमाणही कमी असते. यामुळे ते पचण्यास हलके असते. कोलोस्ट्रम सोनेरी रंगाचे आणि जाडसर असते.

एखादी माता जरी कमी प्रमाणात कोलोस्ट्रम तयार करत असेल तरीही सुरुवातीच्या काळात बाळाला शक्य तितक्या वेळा स्तनपान देणे सुरू ठेवावे. नवजात बाळाला पहिल्या काही दिवसांसाठी फक्त थोडय़ा प्रमाणात कोलोस्ट्रमची आवश्यकता असते. सुरुवातीच्या दिवसांमध्ये बाळाला शक्यतो दर तासाला स्तनपानाची गरज भासू शकते. काही दिवसांनंतर स्तनपानातून अधिक पोषण मिळू लागते. मातेने स्तनपानाविषयीचे गैरसमज दूर करून काही गोष्टी सुरुवातीला नियोजन केल्याप्रमाणे होत नसतील तर जास्त काळजी करू नये. तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करावा. जर ते अत्यंत वेदनादायक असेल किंवा तुम्हाला, तुमच्या बाळाला इतर कोणतीही लक्षणे दिसून आल्यास वैद्यकीय सल्ला घ्या.

(लेखक मदरहूड हॉस्पिटल, खराडी, पुणे येथे नवजात शिशू आणि बालरोगतज्ञ आहेत.)