उपसरपंच ते “माझा एल्गार”

80

दुर्गेश आखाडे

रंगभूमी, चित्रपट, टीव्ही मालिका अशा अभिनयाच्या क्षेत्रांत मुशाफिरी करणारे रंगकर्मी मिलिंद कांबळे. टक्केटोणपे खात केलेल्या या प्रवासातल्या अनुभवांची शिदोरी घेत मिलिंद कांबळे आता नव्या भूमिकेतून आपल्यासमोर येत आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘माझा एल्गार’ हा चित्रपट १० नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यानिमित्त मिलिंद कांबळे यांच्या कारकिर्दीचा हा आढावा.

हौशी रंगभूमीवर काम करता करता व्यावसायिक रंगभूमीचे दरवाजे उघडले. ‘वस्त्रहरण’ एक हजार प्रयोगांमध्ये दुर्योधन, ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकांमध्ये संताजी घोरपडे यांची भूमिका २०० प्रयोगांत रंगवली. रंगभूमीवर जम बसतोय असे वाटत असताना पुन्हा नियतीने परीक्षा घेतली. घरची जबाबदारी खांद्यावर पडल्याने नाटक सोडून गावी यावं लागलं. हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्टची नोकरी स्वीकारली. अभिनयकौशल्यामुळे गावातला बोलका, शिकलेला माणूस म्हणून उपसरपंच.

राजकारण… अळवावरचं पाणी. तेही गेलं. घराच्या बांधकामाची कामे घ्यायला सुरुवात झाली. त्या व्यवसायातही तोटा झाला. पुढे वेळ अशी आली की खिशात पैसे नाहीत. तब्बल आठ कि.मी. चालत गावातून शहरात यायचं. परत जाताना पैसे नाहीत म्हणून बसस्थानकात रात्र काढायची. असं संघर्षमय आयुष्य जगल्यानंतर आता आपली कलाच आपल्या उदरनिर्वाहाचे साधन होऊ शकते याची जाणीव होऊन मिलिंद कांबळे यांनी मुंबई गाठली. सुरुवातीला मालिकांमधून छोट्या छोट्या भूमिका करत दिग्दर्शक होण्यापर्यंत त्यांनी मजल मारली. आता त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘माझा एल्गार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

रत्नागिरी तालुक्यातील वेतोशी गावचे मिलिंद कांबळे हे शिक्षणासाठी मुंबईत गेले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना नाटक, एकांकिकांमधून पारितोषिक पटकावत त्यांनी व्यावसायिक नाटकांपर्यंत मजल मारली. त्या काळात गाजलेल्या ‘वस्त्रहरण’ या नाटकात त्यांनी दुर्योधन साकारला. पुढे ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकामध्ये त्यांनी अभिनय केला. नटवर्य प्रभाकर पणशीकर आणि मच्छिंद्र कांबळी यासारख्या नामवंतांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे नाटक सोडावं लागलं. रत्नागिरीत येऊन एका हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम केलं.

अभिनयकौशल्य, भारदस्त आवाज, गावात बोलणारा माणूस म्हणून मिलिंद कांबळे यांना गावकऱ्यांनी उपसरपंच केलं. अभिनेता बनण्याच्या क्षेत्राला कलाटणी मिळून आपण नेता बनतो असं त्यांना सुरुवातीला वाटलं, पण हे फार काळ टिकलं नाही. मग पुढे पोटापाण्यासाठी नोकरीचा शोध सुरू होता. जाहिरात प्रतिनिधी, विमा प्रतिनिधी अशी कामे करून मग घराच्या बांधकामांची कामे हा कलावंत घेऊ लागला तेव्हा रंगमंचापासून तो खूपच दूर गेला होता. घरांच्या बांधकाम क्षेत्रात तर खूपच तोटा होऊ लागला आणि जगाच्या रंगमंचाने त्याला पुन्हा नाट्यमंचाकडे आणले. इतके सर्व कामधंदे करून इथं आपलं काहीच होत नाही हे लक्षात आल्यावर गाव सोडून पुन्हा मिलिंद कांबळे यांनी मुंबई गाठली. ‘पागोळ्या’ नावाच्या मालिकेत त्यांना काम मिळाले, पण ही मालिका दूरचित्रवाणीवर आलीच नाही. त्यामुळे पुन्हा तोच अनुभव. मग पुढे ‘लक्ष्य’, ‘अरुंधती’, ‘कृपासिंधू’ ‘स्वामी समर्थ’, ‘शोध’ या मालिकांमध्ये छोट्या भूमिका केल्या. ‘महापुरुष’ या नाटकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका केली.

हे सारं करत असताना एक दिवस मिलिंद कांबळे यांची निर्माते श्रीकांत आपटे यांच्यासोबत भेट झाली. श्रीकांत आपटे यांनाही मराठी चित्रपटाची निर्मिती करायची होती. मिलिंद कांबळे यांनी दोन-तीन कथा सांगितल्या. पुन्हा निराशा येऊन मिलिंद कांबळे कोतवाल उद्यानामध्ये येऊन हातात असलेल्या वर्तमानपत्रात डोकं खुपसून बसले. त्याच वेळी वर्तमानपत्रात एका विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची बातमी त्यांनी वाचली. हीच आपली कथा असा विचार करून त्या उद्यानामध्येच त्यांनी लैंगिक अत्याचार झालेली मुलगी अत्याचार करणाऱ्या नराधमाचा बदला कशी घेते ही ‘माझा एल्गार’ची कथा लिहिली. श्रीकांत आपटेंना ती आवडली आणि मिलिंद कांबळे यांच्या पहिल्या चित्रपटाला मुहूर्त मिळाला. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाबरोबरच दोन गाणी मिलिंद कांबळे यांनी लिहिली आहेत. त्यामध्ये ‘पेटी को चाबी लगती है, हमको तो पैसा मिलता’ हे गाणं अवधूत गुप्ते यांनी गायलं आहे.

या चित्रपटामध्ये अभिनेता स्वप्नील राजशेखर, ऐश्वर्या राजेश, यश कदम, ऋचा आपटे, गंधार जोशी यांच्यासह रत्नागिरीतील अडीचशे स्थानिक कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. विशेष म्हणजे हा चित्रपट त्यांनी रत्नागिरीत चित्रित केला आहे. श्रीकांत आपटे आणि सौरभ आपटे यांनी निर्मिती केलेला ‘माझा एल्गार’ चित्रपट १० नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. कोकणातील एक कलाकार संघर्षमय जीवन जगत यशाच्या एका टप्प्यावर पोहचणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या