हिंदुस्थानची दादागिरी!

19

<<द्वारकानाथ संझगिरी>>

आपल्या १९ वर्षांखालील ‘छोटे मियाँ’नी वर्ल्डकप जिंकला म्हणून नाही… किंवा जोहन्सबर्गच्या खेळपट्टीच्या आगीतून सिनेमाप्रमाणे हिंदुस्थानी संघ अग्निपरीक्षा देऊन बाहेर आला म्हणूनही नाही… पण मला एक वल्गना करायचीय.़. खोटी ठरली तर मी मूर्ख ठरेन (आहेच. आणखी काय ठरायचं? हे तुमच्या तोंडात आलेले वाक्य तुम्ही केवळ विनयामुळे गिळलं असेल); पण खरं ठरलं तर द्रष्टा ठरायची संधी मिळेल. म्हणून बोलतोय, ‘‘हिंदुस्थानी संघ पुढची सात-आठ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजावील.’’ म्हणजे कसोटीनंतर वन डे नंबर वन वगैरे नेहमी असू असं नाही. माझा खरंच या नंबर बिंबरमध्ये विश्वास नाही. पण दादागिरी करील. एकेकाळी विंडीज किंवा ऑस्ट्रेलियाने केली तशी.

राहुल द्रविडच्या कार्याचं वर्णन करायला गदिमांचे काव्य मला घ्यावंसं वाटतं.

‘फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार द्रविडा तू वेडा कुंभार’

राहुल द्रविडने ठरवलं असतं तर ‘बडेमियाँ’चा प्रशिक्षक होऊन त्याला अस्तित्वात असलेल्या सोनेरी वटवृक्षाच्या सोनेरी पारंब्यांना रवी शास्त्रीप्रमाणे आरामात लटकता आलं असतं. जास्त मान, जास्त पैसे, जास्त लौकिक, सतत प्रकाशझोतात वगैरे वाटय़ाला आलं असतं (अर्थात त्याचा कुंबळेही होऊ शकला असता). रवी शास्त्री असा आहे की, राजकीय चातुर्याच्या बाबतीत चार गोष्टी तो अमित शहालाही शिकवू शकतो. पण राहुल द्रविडने ते टाळलं. गोरा कुंभार व्हायचं ठरवलं किंवा वेडा माळी म्हणा. त्याने पुढचा वटवृक्ष उभारायची जबाबदारी स्वतःकडे घेतली. अशा वेळी माती आणि शेणखतात काम करावं लागतं. पण आता वृक्षाची वाढ पाहून स्वतः वर्ल्ड कप विजेत्या संघात आहे असं त्याला वाटलं असेल. नाहीतरी विजेत्या वर्ल्ड कप संघाचा भाग तो नव्हता.

अंतिम सामन्यात मनज्योत थंडपणे खेळला. अरे, पॅव्हेलियनमध्ये आईसबर्ग बसला असताना थोडा तरी थंड पाण्याचा शिडकाव त्याच्या डोक्यावर होणारच ना? हिंदुस्थानी संघ या स्पर्धेत इतक्या सहजपणे खेळला की जणू एखाद्या इंजिनीयरला मेकॅनिकचा खेळ खेळायला सांगितलंय. आपण पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धुवा उडवला, मग बांगलादेशला धूळ चारली. पाकिस्तानला आपण खड्डय़ात टाकून मूठमाती देऊन श्रद्धांजली वाहिली. आणि अंतिम सामन्यात असे खेळलो की, नियतीने संघाच्या कानात सांगितलं होतं, ‘‘मी तुम्हालाच जिंकवलंय. तेवढी प्रोसिजर पूर्ण करा.’’ असा एकही क्षण या स्पर्धेत नसावा की हिंदुस्थानी संघाला वाटलं असेल ‘‘आपण हरू शकतो.’’

पृथ्वीने सातत्य दाखवलं. गीलचे काही फटके पाहून विराट कोहलीच्या भुवया उंचावल्या असत्या. अंतिम सामन्यात मात्र तो ज्या पद्धतीने बाद झाला त्याबद्दल द्रविडने त्याला तासभर पॅव्हेलियनबाहेर उभं करायला हरकत नव्हती. अरे बाळा, ते सर्वोच्च स्टेज होतं. अशी संधी वारंवार मिळत नाही. मनज्योत मात्र शतक कसं पुरं करावं याचा विराट कोहलीकडून क्रॅशकार्ड घेतल्यासारखा खेळला. पण या तिघांनी लक्षात ठेवावं की, १९ वर्षांखालील स्तर ते कसोटी  क्रिकेट ही घराची पायरी नाही. फक्त मूठभरांचे पाय वरच्या पायरीवर पोहोचतात. त्यातले चिमूटभर महान झाले. प्रत्येक जण सेहवाग, विराट होत नाही. सेहवागला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शोएबचा पहिला चेंडू दिसला नव्हता. त्याने दुसऱया दिवशी थोडय़ा हिरव्या खेळपट्टीवर दिल्लीतले वेगवान गोलंदाज जमवून त्यांना १८ यार्डांवरून गोलंदाजी टाकायला लावली. नंतर तो ती पायरी चढला आणि शोएब अख्तरला खिशात घेऊन फिरला. पुढे श्रम आहेतच.

मला तर नागरकोटी, मावी यांचा वेग पाहून सुखद हुंदका आला. अरे यार, मी माझ्या लहानपणी तर त्या चेंडूची अशी विटंबना पाहिलीय की द्युतात हरलेल्या द्रौपदीलाही कुणीतरी आपल्यासारखा समदुःखी आहे हे पटावं. कधी गावसकरने नवा चेंडू वापरलाय, कधी वाडेकरने तर कधी यष्टिरक्षक कुंदरनने! अनेकदा तो लकाकी घालवायला घासलाय गवतावर. आपली विटंबना टळून कधी आपण बेदी-प्रसन्ना-चंद्राच्या हातात जातोय असे त्याला व्हायचे. एखादा रमाकांत देसाई तेव्हा स्वतःचा जीव आटवायचा. पुढे कपिलदेव आल्यावर चित्र बदललं. आता १९ वर्षांखालील मुले सातत्याने ताशी १४० किलोमीटर्सच्या वेगाने चेंडू टाकतात. कधी कधी स्पीडगन १४९चा आकडा दाखवते. आता शेजारच्या पाकिस्तानकडे पाहून हेवा करतो भले उनके पास इतने तेजतरार गेंदबाज कैसे असे म्हणण्याचे दिवस संपले आहेत. ‘‘आम्ही बिफ खातो म्हणून आमच्याकडे वेगवान गोलंदाज तयार होतात,’’ या त्यांच्या दर्पोक्तीला ‘‘ए हट ए. बंद कर बकवास,’’ म्हणायची ताकद आपल्याकडे आहे.

फिरकी गोलंदाजांनीही कमाल केली. बिहारच्या छोटय़ा शहरातून एक फिरकी गोलंदाज येतो आणि सर्वोत्तम बळी घ्यायचा मान मिळवतो. अंतिम सामन्यात महत्त्वाचे ब्रेक थ्रू देत हे मुंबईत वाढलेल्या आणि मुंबई क्रिकेटच्या नावाने कॉलर टाइट करून फिरलेल्या माझ्यासारख्या माणसाला अद्भुत पण आनंददायी वाटतं. बरं, संघाचं क्षेत्ररक्षणही किती उच्च दर्जाचं असतं आणि नीट मिसरूड न फुटलेला पृथ्वी शॉ नेतृत्व असं करतो की डोकं पंचवीस वर्षांच्या माणसाचं वाटावं.

हे सर्व हिंदुस्थानी क्रिकेटला ‘अच्छे दिन’ आल्याचं लक्षण आहे. आपण नियामक मंडळाला काही वेळा शिव्या घालतो. कधी वशिलेबाजी, कधी पैशाचं उधळणं, कधी मंडळाच्या मंडळींची ऐषआरामी लाईफस्टाईल, कधी भ्रष्टाचार वगैरेसाठी! पण एक गोष्ट कबूल करायला हवी की, इथलं क्रिकेट सुदृढ पायावर उभं आहे. प्रत्येक स्तरावर स्पर्धा आहे. कोचिंग आहे आणि खेळाडूला फिट ठेवण्याची पराकाष्ठा आहे.  आधुनिक प्रशिक्षण आणि आधुनिक विज्ञानाचा फिटनेस, सराव यासाठी वापर यामुळे खालच्या स्तरापासून मुलं योग्य प्रशिक्षण घेतात. फिट असतात. त्याचबरोबर आता देशाच्या कानाकोपऱयातून मुलं पुढे येतात. फक्त शहरांची मक्तेदारी आता मोडीत निघालेली आहे. टेलिव्हिजनवरचे सामने, त्यावरची महान खेळाडूंची क्रॉमेंट्री यामुळेही ही मुलं पूर्वीपेक्षा लवकर मॅच्युअर होतात. त्यात आपलं संख्याबळ असं आहे की, गुणवत्तेचा झरा आता वाहतच राहणार. म्हणून तर म्हटलं, पुढची काही वर्षे दादागिरी आपली असेल, पहा पटतंय का?

आपली प्रतिक्रिया द्या