
>> द्वारकानाथ संझगिरी
ऑस्ट्रेलियाने वन डे मालिका जिंकली. स्टीव्ह स्मिथ कर्णधार झाला आणि ऑस्ट्रेलियाचे नशीब आणि परफॉर्मन्स बदलला. त्याने फार धावा केल्या नाहीत. पण त्याचं नेतृत्व आणि क्षेत्ररक्षण अफलातून झालं. त्याच्या नेतृत्वाने अजिंक्य रहाणेची आठवण झाली. याला म्हणतात नेतृत्व. पहिली वन डे हिंदुस्थानने 3 बाद 39 वरून जिंकली तेव्हा हिंदुस्थानी संघाच्या लढण्याच्या ताकदीबद्दल आशा निर्माण झाल्या. फलंदाजीची खोली जाणवली. पण स्टार्कने चिलखतातल्या भेगा दाखवल्या होत्या. त्याचा वेग आणि स्विंग आपल्या खेळपट्टीवर खेळायला आपल्याला जड गेला.
वायझागला चांगल्या खेळपट्टीवर आपण अशी नांगी टाकली की वाटावं, पर्थ किंवा गाबाला खेळतोय. चांगला वेग आणि स्विंगवर आपण आपल्या खेळपट्टीवरही अजून लेझीम खेळतो. तिसऱ्या वन डेत टिपीकल हिंदुस्थानी खेळपट्टीवर आपण 270 धावांचा पाठलाग करू शकलो नाही. झंपा एगरच्या पायावर माथा टेकवला. विराट कोहली आणि पंडय़ा खेळताना विजयाच्या घोड्यावरून रपेट सुरू आहे असं वाटलं. पंड्या ड्रेसिंग रूममधून सेट होऊन आला होता. विराट सेट झाला होता. विराट आरामात ढकलून धावा घेत होता. पंडय़ाने भाता रिकामा करायला सुरुवात केली होती. विराटला जोखीम घ्यायची गरज नव्हती. पण ती त्याने घेतली आणि फसला. त्यात सूर्या पुढच्या चेंडूवर बाद झाला आणि पंड्याची लय बिघडली. तिथून हिंदुस्थानी संघ वाट चुकला. त्या आधी अक्षरचं धावचीत होणं महागात पडलं. ऑस्ट्रेलियाचं क्षेत्ररक्षण असं होतं की ते क्रिकेटमधले कमांडोज वाटले. स्मिथच्या क्षेत्ररचनेत कल्पकता होती आणि गोलंदाजीतले बदल अचूक होते. मला काही मुद्दे मांडावेसे वाटतात.
1) वरची फळी हवी तशी यशस्वी झाली नाही. रोहित, गिल सेट झाल्यावर विकेट्स लहान मुलाला खाऊ द्यावा तशा देतात.
2 ) विराटच्या फलंदाजीचा अॅप्रोच असा वाटतो की त्याला 100 शतकांची स्वप्नं पडायला लागली.
3) सूर्याला उमगलं असेल की, क्रिकेट हा क्रूर खेळ आहे. तो तुम्हाला टी-20 चा बादशहा बनवतो आणि 50 षटकांत तिन्ही वन डेत फक्त तीन चेडू आणि तीन शून्य पदरात टाकतो. त्याने भूतकाळ लवकर विसरायला शिकलं पाहिजे. मग तो यशाचा असो किंवा अपयशाचा. सूर्याला फलंदाजी करताना पाहताना डोळे सुखावतात. डोळय़ांना असं सुखं क्रिकेटमध्ये क्वचित मिळतं. पण टी-20 मधली आतषबाजी म्हणजे फलंदाजी नव्हे. त्याला स्वतःला वन डेमध्ये सिद्ध करावे लागेल. 23 वन डेत 24 च्या सरासरीने त्याच्या 433 धावा आहेत. तीन वेळा नाबाद राहिल्यामुळे त्याची सरासरी थोडी फुगली आहे. एका कसोटीत आठपेक्षा त्याच्याकडे अधिक काही नाही. त्याचं ध्येय एबीडी होणं हवं. त्यासाठी धावाचा हिंदी महासागर, वन डेत, कसोटीत ओलांडावा लागेल. तो येणारा वर्ल्ड कप खेळेल? आयपीएल आणि पुढच्या वन डेवर अवलंबून आहे.
4)कुलदीप याने आपली वर्ल्ड कपमधली जागा पक्की केली आहे. नसेल तर त्याच्यावर कुणाचा तरी राग आहे. हिंदुस्थानी संघात कुणाचा तरी कुणावर राग असतो आणि कुणाची कुणावर तरी मर्जी.
5) राहुल दुसऱया गटात आहे. त्याने पहिली वन डे जिंकून दिली. गुढीपाडव्याला धावांची छोटी का होईना गुढी उभारली. लग्नाचं पहिलं वर्ष आहे. सण साजरे होणार. वर्ल्ड कप दिवाळीत येतोय. राहुलला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संघात घेतलं जाणार. राहुलला काळजी करायचं कारण नाही. वर्ल्ड कप हाकेच्या अंतरावर आहे आणि आपली तयारी सध्या तरी अपूर्ण आहे. पंडय़ा ही संघाला सध्या मिळालेली चांगली देणगी आहे. विकेट काढतो, आक्रमक फलंदाजी करतो. तो मॅचविनर आहे. त्यामुळे आपण 6 गोलंदाज घेऊन खेळू शकतो. आपल्या भूमीवर 3 फिरकी गोलंदाज घेऊन खेळू शकतो. प्रश्न शेवटच्या फळीने धावांची जबाबदारी घ्यायचा. ते व्हायला हवं. तरच 2011 चं स्वप्न पाहता येईल.