भटकेगिरी : न्यूझीलंडचे सौंदर्य

>> द्वारकानाथ संझगिरी

न्यूझीलंडचं सौंदर्य जगाच्या नकाशावर मांडलं हॉलीवूड सिनेमांनी आणि हिंदुस्थानी पर्यटकांना ही आरशातली पद्मिनी दाखवली बॉलीवूड सिनेमांनी. कारण बॉलीवूड हा आपल्या फॅशन, स्टाइल, पर्यटन यांचा आरसाच असतो. ‘लॉर्ड ऑफ रिंग्ज’ आणि ‘हॉबिट’ या दोन इंग्लिश सिनेमांनी न्यूझीलंडचं निसर्गसौंदर्य अशा रीतीने जगापुढे पेश केलं की, युरोपच्या सौंदर्याशी नातं सांगणारा एक देश पृथ्वीच्या पायापाशी आहे हे जगाला कळलं. न्यूझीलंडमध्ये व्यावसायिक टूर्स आहेत या दोन सिनेमांचं जिथे जिथे शूटिंग झालं त्या जागा दाखवण्याचं! मला ऑस्ट्रियामधल्या सालस्बर्गची आठवण झाली. तिथे जी ‘साऊंड ऑफ म्युझिक’ची सहल आहे ती उत्कृष्ट आहे. तो सिनेमा तुमच्या डोळय़ांसमोर उभा करते.

‘कहो ना प्यार है’ सिनेमा हिट झाला आणि बॉलीवूडने युरोपकडून मोर्चा न्यूझीलंडकडे वळवला. ‘मैं प्रेम की दिवानी हूं’, ‘प्लेयर्स’, ‘कुछ तुम कहो – कुछ हम कहें’, ‘आय हेट लव्ह स्टोरीज’ वगैरे सिनेमांचं शूटिंग न्यूझीलंडमध्ये झालंय. ‘कहो ना प्यार है’ सिनेमात प्रेमात पडलेला हृतिक ‘ना तूम जाने ना हम’ म्हणत ज्या कॅन्टरबरीमधून जातो त्या रस्त्यावरूनच आम्ही गेलो. फक्त त्या गाण्याचा शूटिंगचा काळ हा तिथल्या शिशिरातला आणि संपत आलेल्या शरदाचा असावा. कारण पिवळी झालेली झाडांची पानेही दिसतात आणि डोंगरावर नुकताच पहुडलेला बर्फही दिसतो. बॉलीवूड सिनेमाचं शूटिंग न्यूझीलंडमध्ये झालंय आणि त्यांनी क्वीन्सटाऊन टाळलंय असं होऊच शकत नाही.

आम्ही गाडीने फिरत होतो आणि एअरबीएनबीत राहत होतो. मला एअरबीएनबीत राहणं आवडतं. मस्त बंगल्यात राहण्याचा फिल येतो. क्वीन्सटाऊनजवळच्या वास्तव्यात आम्ही चार रात्री राहिलो. आठ जणांसाठी चार बेडरूमचा बंगला होता. प्रशस्त हॉल, मागे अंगण आणि बंगला चकाचक ठेवलेला. मला त्या मालकाचा हेवा वाटला. त्या चार दिवसांत मला अनेकदा वाटलं की, जुन्या सिनेमांत अशोक कुमार मस्त गाऊन घालून सकाळी अंगणात चहा पीत बसतो तसं बसावं किंवा रात्री दिवसभर पाहून आलेल्या सौंदर्यशाली निसर्गासाठी अंगणात बसून उत्तम वाइनचा ग्लास उंचवावा. पण हे फक्त मनातल्या मनात मांडे खाणं होतं. चहा होता, वाइन होती, पण तो गाऊन आणायला मी विसरलो होतो आणि अंगणात स्वेटरवर कोट घालून बसलो तरी वाहणारा वारा धमकीवजा विनंती करायचा, ‘‘छान तंदुरुस्तपणे सहल पूर्ण करायची आहे ना? मग आत जाऊन बसा.’’

आम्ही त्या एअरबिनबीमध्ये मोठा प्रवास करून रात्री पोहोचलो. सकाळी उठून खिडकीबाहेर पाहिलं आणि डोळे चोळले. पुनः पुन्हा चोळले. समोर हिरवागार डोंगर. त्यात लाजून लपतायत असं वाटणारी घरं होती आणि डोंगराने चक्क ढगांचा फेटा गुंडाळलेला होता. दुसऱया खिडकीतून निळं आकाश दिसत होतं. इथलं आकाश निळा रंग कसा असतो ते शिकवतं. मुंबईत निळय़ा आकाशाची व्याख्या वेगळी आहे. दरवाजा उघडून मी बाहेर गेलो तर थंड हवेचं भानही सुटलं. पानं तांबूस झालेली झाडं स्वागताला दोन रांगेत उभी! मी खुळय़ासारखा कॅमेरा क्लिक करीत गेलो. शरदाचे झाडाचे रंग मला एलिझाबेथ टेलर एवढेच खुणावतात. मुख्य म्हणजे त्या पानांना स्पर्श करता येतो, एलिझाबेथला नाही आणि आसपास बंगले असे होते की, त्यातला एक विकत घ्यावा इतपत पैसे खिशात असते तर कुठला घ्यावा हे कळलं नसतं. तात्पर्य, ‘गोऱया’ देशात एअरबिनबी राहायला उत्तम. उत्तर न्यूझीलंड सुंदर नाही असं नाही, पण दक्षिण ही निसर्गाची ‘आर्ट गॅलरी’ आहे. वेलिंग्टनला पेंगुळलेल्या डोळय़ांनी आम्ही बोटीत बसलो. वेलिंग्टन हे शहर उत्तर न्यूझीलंडचं खालचं टोक. तिथून ‘कूक स्ट्रेट’ ओलांडून आपण दक्षिण न्यूझीलंडला पोहोचतो. स्ट्रेट (Strait) म्हणजे दोन समुद्रांना जोडणारा पाण्याचा छोटा पॅसेज. या स्ट्रेटला जेम्स कूकचं नाव दिलंय. कारण त्याने तो 1770 साली प्रथम ओलांडला. तास्मन समुद्र आणि पॅसिफिक समुद्राला तो जोडतो. तिथलं पाणी धोकादायक आणि खटय़ाळ मानलं जातं. सुदैवाने आमच्या प्रवासाच्या वेळी पाण्याने खटय़ाळपणा केला नाही. प्रवास सुरू झाल्यावर डोळा लागला. प्रवास संपायच्या एक तास आधी मला जाग आली आणि मी इतरांनाही उठवलं. बाहेर अफलातून दृश्य दिसत होतं. हिरव्यागार झाडांचा डिझायनर ड्रेस घालून दोन्ही बाजूला डोंगर होते. जणू बोटीच्या स्वागतासाठी त्यांना तयार केलं होतं. डेकवर उभं राहिल्यावर हात थोडा मोठा असता तर डोंगरांना थोपटता येईल असं वाटावं इतके ते जवळ होते. ती बोट पिक्टन नावाच्या एका टुमदार गावाच्या धक्क्याला लागली. त्या बोटीच्या पोटात ठेवलेल्या मोटारीतून आम्ही बाहेर आलो आणि निसर्ग पाहताना भान कसं हरवू शकतं, याचा पुनः पुन्हा अनुभव घेतला. पांढरे ढग या डोंगरमाथ्यांचं सौंदर्य वाढवतात. ते कधी फेटा बनतात, कधी घुंघट, कधी टोपी तर कधी झुंबरासारखे लटकतात. आम्ही ख्राईस्टचर्चला जायला निघालो होतो. पण मन पिक्टनमध्ये गुंतून होतं. पण पिक्टन सोडल्यावरही रस्ता सुंदर होता. एका बाजूला समुद्र होता. पॅसिफिक समुद्राची वेगवेगळी रूपं मी वेगवेगळय़ा देशांतून पाहिली आहेत. हे एक वेगळं रूप. एका ठिकाणी खडकावर सील किंवा सीलायन्स होते. दोघांमध्ये बारीकसा फरक आहे. मला ते कधी सीलायन वाटले, कधी सील. छान खडकावर पहुडले होते. रस्त्याचं काम सुरू होतं. एका हॉटेलमध्ये उदरभरणासाठी थांबल्यावर तिथल्या मालकीण बाईने सांगितलं की, मोठय़ा भूकंपामुळे रस्त्याचं नुकसान झालं. त्याचं दुरुस्ती काम हिंदुस्थानी इंजिनीअर्स करीत होते. आम्ही कॉलर उंच केली आणि कॅन्टरबरीच्या रस्त्यावरून ख्राईस्टचर्चला निघालो. ओठांवर गाणं होतं, ‘क्यू चलती है पवन, क्यू झुमे है गगन, क्यू मचलता है मन’. ऋतिकच्या ‘कहो ना प्यार है’चं गाणं तिथेच तर घेतलं होतं. मन उचंबळत होतं!

– dsanzgiri@hotmail.com