भटकेगिरी : पझलिंग वर्ल्ड

>> द्वारकानाथ संझगिरी

न्यूझीलंडमध्ये ‘वानाका’ हे स्वप्नातलं शहर आहे. शहराची लोकसंख्या पुरी नऊ हजारसुद्धा नाही. शहराच्या मध्यभागी एक तलाव आहे. त्या तलावाची निळाई अधिक सुंदर की आकाशाची ते ठरवता येत नाही. आजूबाजूच्या हिरव्या डोंगराने या तलावाला ओंजळीत घेतलंय असं वाटतं. एखाद्या सुंदरीने केसात फुलं माळावीत तशी छोटी टुमदार घरं या डोंगराने माळली आहेत आणि तलावाच्या काठी बसलं की, समोर बर्फाच्छादित डोंगर दिसतात. त्या माळलेल्या फुलांसारख्या घरातून रोज सकाळी उठल्यावर समोर निळं पाणी दिसतं, समारे बर्फ दिसतो. हे सर्व हिरवं पांघरुण अंगाभोवती गुंडाळून पाहता येतं. माझ्या सुखाच्या व्याख्येत हे सर्व बसतं. तुमच्याही बसत असेल, पण माझ्या नशिबी सकाळी उठल्यावर दात घासत बसलेला समोरचा कांतीभाई असतो किंवा मासे विकायला येणारा अस्लम! न्यूझीलंडचा एक सुप्रसिद्ध आघाडीचा फलंदाज होता. त्याचं नाव ग्लेन टर्नर. तो न्यूझीलंडमध्ये डय़ुनेडिनला राहतो. तो सातत्याने इंग्लंडमध्ये खेळायचा. मी त्याला म्हटलं, ‘‘इंग्लंडमध्ये स्थायिक व्हावंसं वाटलं नाही का?’’ तो म्हणाला, ‘‘आपल्या देशाची कमी लोकसंख्या असणं हे बऱयाचदा फायदेशीर असतं. मोठी जागा मिळते, स्वस्त किमतीत मिळते. इतर सुखसोयी मिळतात. इथलं सुख सोडून मी इतरत्र कशाला जाऊ?’’ वानाका पाहिलं की, ते पटायला लागतं.

ते पूर्णपणे पर्यटकांचं शहर आहे. क्वीन्सटाऊनपासून फक्त एका तासावर आहे. पर्यटकांसाठी क्वीन्सटाऊन भयंकर महाग आहे. त्यामुळे वानाकात राहणं जास्त स्वस्त पडतं. वानाकाचं अर्थकारण पर्यटनावरच चालतं. उन्हाळय़ात तिथे स्कीइंग, रॉक क्लाइम्बिंग, फिशिंग, पॅराग्लायडिंग, राफ्टिंग, जेट बोटिंग, हाइकिंगसाठी पर्यटक येतात. थंडीत बर्फातले खेळ खेळायला येतात. तिथे पर्यटनासाठी पहिलं हॉटेल 1867 साली थिआडोर रसेलने उभारलं आणि त्यावेळी तिथे कळप सांभाळणारे कुत्रे कळप कसा सांभाळतात याच्या कुत्र्यांमधल्या स्पर्धा भरवल्या जायच्या. आता तिथे अनेक आकर्षक गोष्टी आहेत. त्यातील एक सर्वात महत्त्वाची म्हणजे पझलिंग वर्ल्ड.

पझलिंग वर्ल्ड स्टुअर्ट लॅण्डस्बरोने 1973 साली बांधलं. त्यावेळी एक मजल्याचा भुलभुलैया तिथे होता. त्याला इंग्लिशमध्ये मेझ (Maze) असा शब्द आहे. आता तिथे गोंधळात टाकणाऱया खोल्या आहेत (Puzzling Room). नजरेला होणाऱया आभासाचं (Optical illusion) खूप सुंदर प्रदर्शन आहे. तीन डायमेन्शनल भुलभुलैया आणि एक छोटासा लीनिंग टॉवर (एका बाजूला कलंडलेला टॉवर) आहे. दरवर्षी किमान अडीच लाख माणसं या पझलिंग वर्ल्डला भेट देतात. न्यूझीलंडची लोकसंख्या आणि जगाच्या नकाशावरील भौगोलिक विचार केला तर पर्यटकांची संख्या प्रचंड आहे. स्टुअर्ट लॅण्डस्बरोची ही कल्पना. तिला मूर्त रूप देण्यासाठी त्याने बँकेकडे कर्ज मागितलं, पण बँकेने ते नाकारलं. तो गप्प बसला नाही. त्यानं घरं विकून पैसा उभारला. पहिल्या वर्षी तिथे 17,600 पर्यटक आले. 1999 साली तो लीनिंग टॉवर उभारला गेला. लॅण्डसबरो असं म्हणतो की, माझ्या वडिलांनी धंद्यात कल्पनेची भरारी कशी घ्यावी हे शिकवलं. मी पझलिंग वर्ल्डची जाहिरात मोठय़ांसाठी जास्त करतो, फक्त मुलांसाठी करत नाही आणि खरोखरच हे फक्त मुलांसाठी नाही, ते त्यांच्या पालकांसाठी आहे.

माझी नात भुलभुलैयात येण्यासाठी माझ्या मागे लागली. तिच्या समाधानासाठी मी तिथे गेलो, पण अलीकडे बुद्धीला विनाकारण ताण द्यायचा उत्साह वाटत नाही. मी हळूच सटकतो, पण तिने आणि तिच्या आईने भुलभुलैया चक्क भेदला. तीन डायमेन्शनल भुलभुलैयासुद्धा पादाक्रांत केला. नात उत्साहाने डोकं वापरू शकते याचा मला आनंद झाला. तो छोटा लीनिंग टॉवर हा फार मोठा फोटो स्पॉट आहे. त्याच्याखाली उभं राहून आपण तो हातावर तोललाय असा फोटो काढू शकतो, पण त्याचं उभारणं कौतुकास्पद आहे. जमिनीशी तो त्रेपन्न अंशांचा कोन करून आहे.

त्यात सर्वात मला भावलेला भाग म्हणजे ऑप्टिकल इल्युजन रूम. त्यातल्या काही खोल्या या पंधरा अंश कोनाच्या बांधलेल्या आहेत. तिथे गुरुत्वाकर्षण उलट आहे असा भास होतो. उदाहरणार्थ, पाणी वर चढतंय. आपण एका गाडीत बसलो की, ती वर विनासायास जाते, पण उतरताना ती खाली खेचावी लागते. हा नजरेच्या विभ्रमाचा खेळ आहे असं मानलं जातं. त्या खोलीला एक मूव्हमेंटसुद्धा आहे. 2015 साली वानाकात भूकंप झाला तेव्हा काही मंडळी पझलिंग वर्ल्डमध्ये होती. त्यांना वाटलं की, पझलिंग वर्ल्डचा तुम्हाला गोंधळात टाकणाराच हा भाग आहे. भूकंपाची मानसिक भीषणता त्यांना जाणवलीच नाही. तिथे एक खोली अशी आहे की, एका दरवाजावर तुम्ही बुटके दिसता आणि दुसऱया दरवाजात ताडमाड. एक अष्टकोनी हॉल. डेरेक बॉल या मूर्तिकाराने तयार केलाय. तिथे अनेक महनीय व्यक्तींचे छोट मास्क आहेत. ते तुम्ही जाल तिथे तुमच्यावर नजर रोखून आहेत असं वाटतं. तिथला आणखी एक रंजक हॉल म्हणजे स्कल्प्टी इल्युजन गॅलरी (sculpti Illusion Gallery). 2012च्या डिसेंबरात त्याची स्थापना झाला. तिथे एक मोठा नळ आहे. तो हवेत लटकवल्यासारखा वाटतो आणि सतत वाहत असतो. पाइपचं कनेक्शन दिसत नाही, पण खूप जवळ गेल्यावर एक पारदर्शक पाइप त्या पाण्यात दडवलाय हे जाणवतं.

यात जादूटोणा नाही. फक्त तुमच्या डोळय़ांना फसवण्याचा तो अतिशय सुंदर प्रकार आहे. तुम्ही गुगलवर गेलात तर त्या मागचं विज्ञान तुम्हाला कळू शकतं. ते जरूर वाचा. समजलं तर पहा. मला समजून घ्यायला कष्ट लागले. मी निर्बुद्ध, पण तुम्ही बुद्धिमान आहात, पण त्याआधी स्वतःला फसवून घ्या. फजिती नेहमीच आनंदी नसते, पण ही फजिती आनंद देऊन जाते.

– dsanzgiri@hotmail.com