फटके आणि फटाके – ऑस्ट्रेलिया नव्हे वाघाची शिकार!

द्वारकानाथ संझगिरी

ऑस्टेलियन संघाला हरवणं वाघाच्या शिकारीसारखं असतं. कारण ते लढवय्ये असतात. आक्रमकता हा त्यांचा स्थायिभाव आहे. ते दया दाखवत नाहीत आणि दयेची अपेक्षा करीत नाहीत. कित्येक दशपं त्यांचा लौकिक टिकून असायचा. ते कायम चॅम्पियन्स नसतील, पण त्यांचा लौकिक रसातळाला गेलाय असं कधी होत नाही.

गेल्या काही वर्षांत त्यांचा दर्जा थोडा कुठे तरी घसरलाय असं वाटलं. हिंदुस्थानी संघाने त्यांना दोनदा ऑस्ट्रेलियात जाऊन हाणलं. आपली ताकद अर्थात प्रचंड वाढली आहे म्हणून हे जमलं. पण ‘रहाणे’च्या संघाचा विजय तर चमत्कार होता. अकरा फिट खेळाडूंनी त्यांची शिकार केली होती. आता त्यांची दहशत वाटत नाही, जशी ब्रॅडमनच्या संघापासून रिकी पाँटिंगच्या संघापर्यंत वाटायची… विशेषतः तो संघ जेव्हा ऑस्ट्रेलियाबाहेर खेळायचा.

परवाच मी लिहिलं होतं की, ‘हिंदुस्थान’ हे ऑस्ट्रेलियन संघाचं सेपंड होम आहे. हिंदुस्थानी खेळपट्टय़ा त्यांच्यासाठी परग्रह नाहीत. तरीही त्यांचा संघ हिंदुस्थानविरुद्ध 2 बाद 110 वरून कोसळणं, दोन सामान्य फिरकी गोलंदाज घेऊन खेळणं मला आश्चर्यचकित करणारं वाटलं. रवींद्र जाडेजा मॅच संपल्यावर म्हणाला, ‘स्मिथची विकेट हा मॅचचा टर्निंग पॉइंट होता.’ मला ते पटलं. कारण त्यांच्यातर्फे त्यानेच सर्वात चांगली फलंदाजी केली. त्याला जादुई चेंडू पडला. लेगस्टम्पवर पडून पिंचित वळून ऑफस्टम्प घेऊन जाणारा. जास्त वळला असता तर बीट करून गेला असता.

एक स्मिथ सोडला तर किती फलंदाजांचा दरारा वाटतो? जाडेजा, अश्विन आणि कुलदीपने अप्रतिम गोलंदाजी टाकली, पण खेळपट्टी काही खतरनाक नव्हती. थोडी मंद होती. चेंडू थांबून येत होता. पूर्वीचे ते चॅपेल, रेडपाथ, वॉल्टर्स, मॉर्क वॉ, क्लार्क वगैरेंचं पदलालित्य गेलं कुठे? काही पुढे जाऊन भिडायचे, काही क्रिझचा वापर करून उशिरात उशिरा खेळायचे. त्यावेळी त्यांना हिंदुस्थानी खेळपट्टय़ांवर फार क्वचित खेळायची संधी मिळायची. आता त्यांचा मुक्काम बऱयाचदा आपल्याकडेच असतो.

बरं, त्यांच्याकडे फिरकी गोलंदाजच नाहीत. हिंदुस्थानात विश्वचषक तुम्ही दोन फिरकी गोलंदाजांवर कसा खेळता? ‘झम्पा’ हा मॅचविनर? ओरायली, ग्रीमेट, बेनॉ, शेन वॉर्ननंतर ‘झम्पा’ हे नाव कसं वाटतं? चिकन, मटण, भरलेलं पापलेट, तळलेले बोंबील, कोलंबीचं सुपं आणि शेपूची भाजी यासारखं.

झम्पाने उपयुक्तता काही वेळा सिद्ध केलीय, पण तो काही ‘वॉर्न’… जाऊ देत ‘बेनॉ’ही नाही. राहुलच्या तीन चौकारांनी त्याची लय बिघडली. लेग स्पिनरला छाती सिंहाची लागते. ऑस्ट्रेलियाकडे तीन दर्जेदार वेगवान गोलंदाज आहेत, पण पांढरा चेंडू सुरुवातीला किती काळ स्विंग होणार? आणि आता दोन्ही टोकांनी दोन चेंडू वापरले जात असल्यामुळे रिव्हर्स स्विंग जवळपास हद्दपार झालाय.

मुळात ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 199च होती. त्यात फिरकी गोलंदाजीत खेळपट्टीचा वापर करायची कुवत कमी असल्यामुळे सुरुवातीला पडझड होऊन दोन जोडय़ा जमणं जिंकण्यासाठी गरजेचं होतं. एक जमली आणि त्यांनीच मॅच संपवली. राहुल-विराटची भागीदारी, त्यांची फलंदाजी, त्यांचं प्लॅनिंग, त्यांचं रनिंग बिटविन-द-विकेट उत्तमच होतं, पण ते सेट झाल्यावर त्यांची कठोर परीक्षा पाहणारं कुठलंही अस्त्र ऑस्ट्रेलियाकडे नव्हतं. त्यामुळे सुरुवातीला वादळाचं पाणी हिंदुस्थानी संघाच्या बोटीत शिरूनही बोटीने जलसमाधी घेतली नाही. समुद्र शांत होणार हे अनुभवी विराट-राहुलला ठाऊक होतं. त्यांनी पेशन्स दाखवला. हवामान सुधारल्यावर बोट आरामात किनाऱयावर घेऊन गेले. ऑस्ट्रेलियन संघ चवताळू शकतो. त्यांचा तो स्वभाव आहे. त्यांना दंश करायला आवडतो, पण ते जालीम विष आहे का त्यांच्या दंशात, हा खरा प्रश्न आहे.