
>> गणेश आचवल
काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाह वाहिनीवर ‘मन धागा धागा जोडते नवा’ ही मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील सार्थक राजाध्यक्ष ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता म्हणजे अभिषेक रहाळकर…एक प्रॉमिसिंग चेहरा.
अभिषेक रहाळकर नाशिकचा आहे. त्याचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणही तिथेच झाले. लहानपणापासून वत्तृत्व स्पर्धा, पाठांतर स्पर्धा यात तो सातत्याने भाग घेत होता. नाशिकमध्ये असताना ‘दि जिनिअस’ नावाच्या ग्रुपतर्फे तो प्रायोगिक नाटकात भूमिका करत होता. अभिनय क्षेत्रात करीअर करण्याची अभिषेकची इच्छा होती, पण त्यांच्या घरातील कोणीच या क्षेत्राशी संबंधित नव्हतं. अभिनयाच्या क्षेत्रात करीअरविषयीची अनिश्चितता असल्यानेदेखील सुरुवातीला या क्षेत्रात करीअर पूर्णवेळ करण्यासाठी त्याच्या घरातून अनुकूल मत नव्हतं, पण तरीही या क्षेत्रात करीअर करण्यासाठी मुंबई हा उत्तम पर्याय आहे असा विचार करून अभिषेक नाशिकहून मुंबईत आला. मग ऑडिशन्स देणं सुरू झालं. सुरुवातीला कधी एक दिवसाचं काम, तर कधी दोन दिवसाचं काम अशी छोटी छोटी कामं त्याला मिळत गेली.
अभिषेकला एक महत्त्वाची भूमिका मिळाली ती ‘स्वामिनी’ या ऐतिहासिक मालिकेत! त्या मालिकेत त्याने ‘सदाशिवराव’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्याच्या नावाला ओळख मिळाली होती. त्यानंतर ‘वैदेही’ मालिकेतदेखील त्याची महत्त्वाची भूमिका होती. ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतील ‘सचिन’ म्हणूनदेखील तो आपल्या लक्षात राहिला.
‘मन धागा धागा जोडते नवा’मधील ‘सार्थक’ या व्यक्तिरेखेबद्दल तो म्हणतो, ‘‘सार्थक ही व्यक्तिरेखा माझ्या आयुष्यातील एक टार्ंनग पॉइंट म्हणता येईल. श्रीमंत घरातील हा मुलगा असून तो खूप सकारात्मक विचारांचा आहे. घरातल्या जबाबदाऱया आल्या तरी तो आनंदाने स्वीकारणारा आहे. आयुष्यात आनंदी आणि आशावादी असणारा आहे. मनमोकळय़ा स्वभावाचा आहे. या भूमिकेसाठी ज्या पद्धतीचा माझा लूक आहे, जसे कपडे या व्यक्तिरेखेसाठी आहेत ते पाहून मी खूप खूश झालो. अशा पद्धतीचा पोशाख मी मालिकेच्या निमित्ताने प्रथमच अनुभवत आहे. या मालिकेतील माझे काम पाहून माझे कुटुंबीय पण खूप खूश आहेत.’’
अभिषेकला लिखाण आणि वाचन या गोष्टींची आवड आहे. तसेच तो उत्तम प्रकारचा स्वयंपाक करतो. पर्यटनाचीदेखील त्याला आवड आहे. या भूमिकेच्या माध्यमातून त्याचा प्रेक्षकांशी एक नवा धागा जोडला गेला आहे.