हवाई दलाची क्षमता वाढवणे काळाची गरज

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन 

तंत्रज्ञान हे बदलत चालले आहे. त्यानुसार सातत्याने सुधारणा करणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांत हिंदुस्थानच्या हवाई दलाने काही सुधारणा केल्या आहेत; परंतु त्याला गती देण्याची गरज आहे. परदेशी गुंतवणुकीच्या जोडीलाच खासगी कंपन्या व त्याच्या जोडीला लघू व मध्यम उद्योगांच्या सहभागातून क्षमता विकसित करता येईल. त्यामुळे चांगली उत्पादने मिळतील व सेवा चांगली मिळेले. हवाईदलाची क्षमता संख्येने व सशस्त्र्ातेने वृद्धिंगत करणे काळाची गरज आहे.

हिंदुस्थानी हवाई दलाचे लढाऊ विमान मिग-21 बायसन 28 जुलैच्या रात्री राजस्थानमधील बारमेर येथे कोसळले. या अपघातात विंग कमांडर मोहित राणा आणि फ्लाइट लेफ्टनंट अनिकाश बल शहीद झाले. हे दोन्ही वैमानिक राजस्थानमधील उत्तरलाई एअरबेसवरून उड्डाणाचे प्रशिक्षण घेत होते.

गेल्या 60 वर्षांत ‘मिग 21’ची चारशे विमाने अपघातात कोसळली असून, त्यात दोनशे वायुवीर व 50 नागरिक प्राणास मुकले आहेत. 1962 च्या हिंदुस्थान-चीन युद्धानंतर, चीन व पाकिस्तानचे आव्हान पेलण्यासाठी हवाई दलाला लढाऊ विमानांची नितांत गरज होती. त्यातूनच स्वनातीत वेगाची ‘मिग 21’ विमाने ताफ्यात आली. हिंदुस्थान एरोनॉटिक्समध्ये त्यांची निर्मिती होऊ लागली. आजवर 874 ‘मिग 21’ हवाई दलात आली. गेल्या काही वर्षांत या विमानांचे आयुर्मान वाढले, तसतशा त्यांच्या सुरक्षेतील त्रुटीही वाढल्या. वाढत्या अपघातांमुळे या विमानाला ‘उडत्या शवपेटय़ा’ म्हटले जाऊ लागले. मिग-21 इतर कोणत्याही लढाऊ विमानापेक्षा जास्त क्रॅश झाले आहे. अखेर या विमानांमध्ये एवढे विशेष काय आहे की, 60 वर्षांनंतरही त्यांना हटवण्याचा निर्णय सरकारला घेता आलेला नाही?

1955 च्या सुमारास एस.च्या मिकोयन कंपनीने तयार केलेले हे विमान 1963 मध्ये हिंदुस्थानी हवाई दलात सामील झाले. हिंदुस्थानने एकूण 874 मिग-21 विमाने आपल्या ताफ्यात समाविष्ट केली होती. सध्या हवाई दल अपग्रेडेड मिग-21 बायसन वापरते. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड हे विमान परवानाअंतर्गत अपग्रेड करते.

मिग सीरिजची लढाऊ विमाने गेल्या 50 वर्षांपासून हिंदुस्थानी हवाई दलाचा कणा आहेत. 1965 च्या हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध, नंतर 1971 युद्धात या विमानांनी देशासाठी निर्णायक भूमिका बजावली. पण सुरक्षिततेच्या दृष्टीने या विमानांचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही.

कोणत्याही देशाच्या हवाई दलासाठी तेथील वैमानिक हे फायटर जेट्सपेक्षा जास्त मौल्यवान असतात; कारण फायटर वैमानिक तयार करण्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत आणि कोटय़वधी रुपये खर्च करावे लागतात. हवाई दलातील लढाऊ वैमानिकाला कठोर प्रशिक्षण घ्यावे लागते. म्हणजेच वैमानिक गमावणे म्हणजे हवाई दलाची ताकद कमी होणे. याशिवाय अशा अपघातांमुळे हवाई दलातील जवानांच्या मनोधैर्यावरही खोलवर परिणाम होतो आणि शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या हानीचा हिशोब देता येत नाही. ‘मिग 21’चे अपघाती मृत्यू हे केवळ वैमानिकाच्या चुकीने होत असल्याचा ठपका चुकीचा आहे. काही हवाई दलप्रमुखांनीही या विमानातून उड्डाण करून ते सुरक्षित असल्याचे सांगितले; परंतु ‘मिग 21’चे अपघात थांबले नाहीत. गेल्या काही वर्षांत ‘मिग 21’मध्ये काही तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या; मात्र त्यांच्या सुरक्षेत फार भर पडली नाही. भविष्यात ‘मिग 21’ची जागा घेण्यासाठी 1983 मध्ये हिंदुस्थानी बनावटीच्या ‘तेजस’ची कल्पना आहे. मात्र प्रत्यक्ष निर्मितीला तीन दशके लागली. दुसरीकडे, हवाई दलातील लढाऊ विमानांची संख्या रोडावली होती. साहजिकच ‘मिग 21’ ताफ्यातून बाद करण्याचा निर्णय लांबला. आता 2025 पर्यंत उरलेली ‘मिग 21’ ताफ्यातून बाद होतील; मात्र तोपर्यंत नव्या लढाऊ विमानांची संख्या कितपत वाढेल? देशाचे संरक्षण, तांत्रिक सुरक्षितता, विमाननिर्मिती आणि सामग्री खरेदीतील नियोजनाचा अभाव तरुण वैमानिकांच्या जिवावर बेततो आहे.

अपघात होण्याची अनेक कारणे आहेत. अजूनही हवाई दलातील पायलटना मिग 21 ही जुनाट झालेली विमाने चालवावी लागतात. विमाने जुनाट असल्याने अपघाताची शक्यता अधिक असते. ही जुनाट विमाने लवकरात लवकर बदलण्याची गरज आहे. मात्र संरक्षण दलासाठी असलेली अर्थसंकल्पीय तरतूद कमी असल्याने या जुनाट विमानांची बदली कमी वेगाने होत आहे. अजूनही मिग विमाने हवाई दलातून बाद करण्यासाठी 2025 ची वाट पाहावी लागेल. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, विमानांच्या देखभालीची गुणवत्ता वाढवण्याची गरज आहे. विमानांच्या अपघातांची तुलना प्रगत राष्ट्रांमध्ये होणाऱया विमान अपघातांशी करतो तेव्हा त्याच प्रकारच्या विमानांचे अपघात हिंदुस्थानात अधिक प्रमाणात होतात. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे विमानांचे सुटे भाग. ते बदलावे लागतात. दुर्दैवाने हे सर्व सुटे भाग अजूनही परदेशातून म्हणजे रशिया किंवा अमेरिका इथून आयात करावे लागतात. या सुटय़ा भागांची कमतरता भासल्याने अपघातांचे प्रमाण वाढते. त्याव्यतिरिक्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैमानिकांचे प्रशिक्षण. काही अपघातांमध्ये मानवी चुका होतात. त्यासाठी वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी विविध प्रकारची एअरक्राफ्ट हवाईदलात आणण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र प्रगत जेट ट्रेनर (Advance jet trainer) हे विमान लवकरात लवकर हवाई दलात सामील करायला हवे.

मिग विमान हिंदुस्थानातच विकसित होत असलेल्या तेजस विमानांनी बदलले जाणार होते. पण हे विमान विकसित करण्यात अनेक दशकांचा विलंब झाला. भारतीय हवाई दलाला टू फ्रंट वॉर म्हणजे हिंदुस्थानने पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांशी एकाच वेळी युद्ध केले तर त्याला 42 स्क्वाड्रनची गरज भासेल. आपण या संख्येत मागे आहोत.

या सर्व परिस्थिती लक्षात घेता, हिंदुस्थानने फ्लाय अवे कंडिशनमध्ये फ्रान्सकडून राफेलच्या 2 स्क्वाड्रन्स खरेदी केल्या आहेत. म्हणजे विमान पूर्णपणे तयार आहे आणि त्याचा वापर लगेच सुरू होऊ शकतो. 36 राफेल विमानांशिवाय हिंदुस्थानला 40 तेजस विमानेही मिळणार आहेत. तथापि, असे असूनही, या वर्षापर्यंत हिंदुस्थानी लष्कराकडे केवळ 29 स्क्वाड्रन्स उपलब्ध होतील, असा अंदाज आहे.

हिंदुस्थानी हवाई दलासमोरील आव्हान अपघातांचा दर कमी करण्याचे आहे. एक विमान कोसळते तेव्हा देशाचे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान होते. त्यामुळे महागडय़ा विमानांची काळजी आणि देखभाल करणे महत्त्वाचे आहे.

[email protected]