संभाषण कौशल्याची छाप

>> किरण खोत, निवेदक, सूत्रसंचालक  

व्यक्तीचे बाह्य सौंदर्य जसे त्याचे व्यक्तिमत्त्व खुलवण्यासाठी महत्त्वाचे असते तसेच लोकांच्या मनावर छाप पाडण्यासाठी आपल्या अंगी संभाषण कौशल्य असणे पण तितकेच महत्त्वाचे आहे.

आपले म्हणणे प्रभावीपणे, मुद्देसूद आणि योग्य शब्दांत मांडणे आणि समोरच्या व्यक्तीला आपलं म्हणणं पटवून देणं ही खरं तर एक कला आहे. काही लोकांना ती उपजत जमते, तर काही लोक योग्य प्रशिक्षणाच्या आधाराने ही कला आत्मसात करू शकतात.

सुंदर राहणीमान, बोलकी देहबोली, वाचनातून आणि श्रवणातून मिळवलेले ज्ञान, स्पष्ट उच्चार असे अनेक घटक तुम्हाला एक उत्तम वक्ता होण्यासाठी मदत करत असतात.

एक चांगला वक्ता होण्यासाठी एक चांगला श्रोता होणे आवश्यक असते. समोरील व्यक्तीचे म्हणणे पूर्ण ऐकणे, समजून घेणे, अधूनमधून त्याला देहबोलीमधून प्रतिसाद देणे आणि योग्य वेळ येताच त्याला समर्पक उत्तरं देणं यालाच एक उत्तम संवाद म्हणतात.

संस्कृतमध्ये एक सुंदर सुभाषित आहे ‘शतेषु जायते शूरःसहस्त्रsषु च पंडितःवक्ता दश सहस्त्रsषु दाता भवती वा ना वा’ म्हणजेच शेकडो माणसांत एखादा शूर जन्माला येतो. हजारांत एक पंडित बनतो, तर दहा हजारांत एक वक्ता होतो आणि दातृत्व अंगी असणाऱयांची या जगात खूप कमतरता असते.

आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल, काय मी त्या दहा हजारांतला एक आहे. काय वक्ता होणं इतपं कठीण आहे, तर असं बिलकुल नाही. वरती म्हटल्याप्रमाणे तुम्ही मनापासून ठरवले तर नित्य वाचन, योग्य श्रवण, परिपूर्ण संगत आणि योग्य गुरूंनी दिलेल्या अभ्यासाचा सराव करून ते करता येऊ शकते.

शिक्षक, प्राचार्य, राजकीय व्यक्तिमत्त्व, वकील, डॉक्टर, सेल्स मॅनेजर, ट्रेनर्सच नव्हे तर जवळ जवळ सगळय़ांनाच छान बोलता येणं गरजेचं आहे. काहींना सभेत भाषण वगैरे द्यायचं नसतं, पण कार्यालयात, कुटुंबात, मित्र परिवारात छान बोलता यायला हवं असं मनात असतं.

आवाजाची पोत ही परमेश्वराने दिलेली एक नैसर्गिक देणगी आहे. तुमच्या आवाजातून तुमची आताची मानसिकता काय आहे याचाही अंदाज बांधला जाऊ शकतो. तेव्हा या आपल्या जिभेवर विराजमान असणाऱया सरस्वतीचा आपण आदर करू या, आवाजाला जपू या. त्यालासुद्धा काही व्यायाम देऊन परिपूर्ण करू या.

 दडपण नको

आजकाल बदलत्या तंत्रज्ञानामुळे ऑनलाइन विश्वात जगू लागलो आहोत. जिथे आपण सतत चॅटिंग, ई-मेल किंवा तत्सम माध्यमातून बोलत असल्याने आपल्याला अचानक कुणी थेट लोकांसमोर आपले मत मांडायला सांगितले की दडपण येते. कुणाला वाटते आपली जीभ जड आहे, तर कुणाला आपले उच्चार चांगले नाहीत. कुणाला खूपच जलद बोलायची सवय असते, तर कुणाला काय बोलायचे हेच सुचत नाही. असे बरेचसे प्रश्न आपण काही सोप्या उपायांद्वारे सोडवू शकतो.