मनातलं वादळ

>> महेंद्र पाटील

आपल्या आयुष्यात अनेक वादळं येतात आणि जातात. काही छोटी, काही मोठी. काही कायम लक्षात राहणारी आणि काही काळाच्या ओघात विरून जाणारी. परवा संध्याकाळी असंच एक वादळ घोंगावत आलं आणि सगळं काही होत्याचं नव्हतं करून गेलं. तुझ्या काही गोड दिवसांच्या आठवणी काढत मी जगू लागलो होतो. जुन्या आठवणी कधी मनाला आधार देऊन जात होत्या, तर कधी स्वत:च आधार मागायला येत होत्या. आमची अशी देवाणघेवाण सुरू असायची. कधी तुझ्या मनातली एकेक भावना जपता जपता इतका दूर निघून आलो की, आता स्वतलाच शोधणं कठीण होऊन बसलंय. त्यातही कधीतरी मीच मला शोधण्याचा प्रयत्न करू पाहतो, पण पुन्हा हाती निराशाच आली. कारण आपण जेव्हा एखाद्याचे होतो तेव्हा स्वतचं अस्तित्वच हरवून बसतो.  

असंच काहीसं माझ्या बाबतीत झालं होतं. माझा दिवस, रात्र, माझी दुपार, संध्याकाळ… फक्त तुझ्याच आठवणीत जायची आणि मी त्या हरवलेल्या मनाला जपत पुढे पुढे जात होतो. कधीतरी एका वळणावर आपल्यालाच आपला शोध लागेल आणि मग पुन्हा मन माझ्यासारखं वागू लागेल अशा आशेवर जगत आयुष्यातली प्रत्येक संध्याकाळ सरत होती. परवा तूच कुठेतरी हरवलीस. आपण एकत्र एका वाटेवर चालत असताना तूच कुठेतरी माघार घेतलीस आणि मग त्या संध्याकाळी सगळं होत्याचं नव्हतं झालं. तू असं काही करण्यामागे काही कारणं असतीलसुद्धा, पण त्याचा विचार करायचीसुद्धा शक्ती आता माझ्यात नाही. कारण माझं सर्वस्व माझ्या मनात होतं आणि माझं मन तुझ्यात. आता तू हरवलीस म्हटल्यावर मनाचं काय? सगळय़ा आठवणी सैरावैरा धावू लागल्या आणि आपली ओळख पटवून देऊ लागल्या. तेव्हा क्षणभर त्या आठवणीच तुला शोधून तुझं मन वळवून तुला परत आणतील माझ्या वाटेवर अशी आशा होती, पण तीसुद्धा फोल ठरली. कारण अचानकपणे आपल्या सहप्रवाशाला सोडून जाणाऱयाला आठवणींचं काही सोयरसुतक नसतं. आठवणीनंतर आपण घालवलेले काही हळवे क्षण खंबीर होऊन तुला शोधण्याचा प्रयत्न करू लागले, पण त्यांनासुद्धा यश आलं नाही. कारण हळव्या भावनांवर फिदा होऊन जवळ येणारी माणसं त्या भावनांचा पालापाचोळा करून निघून जातात. त्या पालापाचोळय़ात आपण शोधत बसतो आपले जुने क्षण.

हळूहळू आपल्याला जाणीव होऊ लागते. आता आपल्यासोबत कुणीच नाही. सैल आठवणी, थिजलेले क्षण, भिजलेले डोळे, अस्वस्थ करणारं संध्येचं सुरंगी आभाळ आणि आपल्या असंख्य गोष्टी, असंख्य गप्पा, सुनी संध्याकाळ, त्या संध्याकाळी तू सोडून गेल्यावर मनात आलेलं वादळ, त्या वादळात निर्माण झालेला पालापाचोळा आणि विचार, फक्त विचार. किती आठवणी जपल्या होत्या, किती साठवणी रेंगाळत होत्या. किती आसवं आणि किती भावना मनात खूप दिवसांपासून एका कोपऱयात बंदिस्त होत्या. त्या सर्व एका क्षणात विरून गेल्या आणि आता त्या वादळी आठवणी घेऊन जगत राहायचं जन्मभर? असंच एखादं वादळ होऊन कधीतरी घोंगावत जायचं कुठेतरी कुणाच्या तरी मनात जागा शोधत? निसर्गातली वादळं एकवेळ परवडतात. ती येतात, सगळं नष्ट करून जातात, पण पुन्हा निसर्ग नव्या पालवीने नवं विश्व निर्माण करू लागतो, पण मनातलं वादळ शमवायला आपल्यासारख्या एका मनाची गरज असते. असं मन येतं आणि पुन्हा आपलं मन भरारी घेऊ पाहतं, पण एका मनानेच वादळ निर्माण केलेलं असतं. त्यामुळे नव्या मनाची मैत्री म्हणजे नव्या वादळाचं आव्हान मनातल्या मनात स्वीकारून हात पुढे करावा. जमलं तर साताजन्माचं मनोमीलन नाहीतर पुन्हा एक नवं वादळ…