मुद्दा : लोकसंख्येचा भस्मासुर आणि प्रबोधनाची गरज

260

>> नागोराव सा. येवतीकर

सध्या हिंदुस्थानची लोकसंख्या 1 अब्ज 34 कोटी झालेली आहे. लोकसंख्येच्या बाबतीत चीनच्या खालोखाल असलेला आपला हिंदुस्थान येत्या काही वर्षांत पहिल्या क्रमांकावर येईल, ही बाब निश्चितच अभिमानास्पद नाही. या लोकसंख्यावाढीमुळे देशातील जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लोकांची वस्ती वाढून जंगल कमी होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे ढासळत चालला आहे. हिंदुस्थानातील बहुसंख्य लोकांचा व्यवसाय शेती आहे, परंतु या शेतीवरदेखील घरांचे अतिक्रमण वाढत आहे. अन्नधान्य उत्पादन लोकसंख्येच्या तुलनेत कमी प्रमाणात होत आहे. अर्थात लोकसंख्यावाढीमुळे राष्ट्रीय विकासाच्या साधनांवर त्याचा विपरीत परिणाम होऊन राष्ट्रीय विकासाला खीळ बसत आहे. मानवी कल्याणासाठी निर्माण होत असलेल्या प्रत्येक योजना असफल होताना दिसत आहेत. महागाईचा डोंगर आकाशाला गवसणी घालत आहे. त्यामुळे देशातील सर्वसामान्य मानवजातीचा जीवन जगण्याचा स्तर खालावत चालला आहे. याबाबतीत आज खरेच चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. यास अनेक कारणे आहेत. आजही समाज छोटे कुटुंब ठेवण्यास तयार नाही. ‘हम दो हमारे दो’ हे शासनाचे ब्रीद आहे. मात्र याबाबतीत जनता अजूनही अनभिज्ञ आहे. गरीब आणि अशिक्षित लोकांना छोटय़ा कुटुंबाचे महत्त्व अजूनही कळले नाही. गरीबांच्या घरातील मुले कुटुंबाच्या कमाईमध्ये भर टाकतात, मदत करतात. जितकी जास्त मुले तितकी जादा कमाई करता येते. त्यामुळे मुले म्हणजे त्यांना एक प्रकारे वरदानच वाटतात. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त स्त्रिया अशिक्षित आणि निरक्षर आहेत. मुले म्हणजे देवघराची फुले असे ते समजतात. त्याचसोबत जन्मलेली सर्व अपत्ये जगतातच याचीदेखील त्यांना खात्री नसते. म्हणून ही मंडळी दोनच्या वर अपत्यांना जन्म देतात. ही अवस्था अशीच चालू राहिली तर हिंदुस्थानातील लोकांचे जीवन जगणे असह्य होईल यात शंका नाही. ही बाब त्या प्रौढ माणसांना समजावून सांगणे, पटवून देणे अवघड आहे, परंतु भावी काळात प्रौढ बनणाऱया आजच्या शाळकरी मुलांना या लोकसंख्यावाढीच्या समस्येबाबत जाणीव करून दिल्यास ही मुले भावी काळात छोटे कुटुंब ठेवण्याकडे लक्ष देतील.

शाळेतील मुलांना शिकविण्याची जबाबदारी अर्थात शिक्षकांची असते. आज लोकसंख्या वाढत चालल्यामुळे जनता कोणकोणत्या संकटांचा मुकाबला करीत आहे? याची जाणीव मुलांना अगदी सहज देता येईल. त्यासाठी एखादा स्वतंत्र विषय ठेवण्यात यावा असे काही नाही. अभ्यासक्रमात अंतर्भूत असलेल्या घटकांतून मुलांना याबाबत अवांतर माहिती दिल्यास त्यांच्यात सजगता निर्माण होईल. लोकसंख्यावाढ झाल्यामुळे समाजात कशा प्रकारे असमतोल निर्माण झाला आहे हे चित्र विद्यार्थ्यांसमोर उभे केल्यास भविष्यात काही अंशी तरी ते नक्की विचार करतील. याबाबतीत एक चलचित्र जे की दूरदर्शन वाहिनीवर दाखविले जात असे ते आठवते. एका फिश टँकमध्ये दोन मासे होते आणि त्यांना खाण्यासाठी भरपूर धान्य होते. काही दिवसांनी त्यात काही मासे वाढले आणि त्यामुळे अगोदर जे धान्य भरपूर होते असे वाटत होते ते बरोबर होऊ लागले. पुन्हा काही दिवसांनी त्यात मासे वाढले आणि धान्य कमी पडू लागले. त्यानंतर असा एक दिवस आला की, फिश टँकमध्ये मासे भरपूर वाढले आणि धान्य मिळविण्यासाठी प्रत्येक मासा धावपळ करू लागला. त्यात त्या फिश टँकचा स्फोट झाला. सारे मासे जमिनीवर पडले आणि काही क्षणांत मृत्युमुखी पडले. यातून मुलांना खूप चांगला संदेश देता येऊ शकतो. असे काही माहितीपट मुलांना दाखविले तर अनुकूल परिणाम होईल. आज समाजात अशिक्षित कुटुंबात पाच अपत्ये दिसून येतात तसे सुशिक्षित कुटुंबातदेखील दिसून येते. तेव्हा प्रश्न पडतो की, या शिक्षणाचा काय फायदा झाला? शालेय जीवनात त्यांना लोकसंख्या विषयक मार्गदर्शन मिळाले नाही. त्यामुळे ते छोटे कुटुंब ठेवू शकले नाहीत. जास्त अपत्य असणाऱया घरातील सुखसोयीचे चित्र आणि कमी अपत्य असणाऱया घरातील सुखसोयींचे चित्र या दृश्यावरून मुलांच्या मनावर या समस्येच्या बाबतीत प्रभाव टाकता येईल. लोकसंख्येच्या समस्याबाबत प्रबोधन करणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षकांनी हे काम स्वेच्छेने मनावर घेऊन प्रामाणिकपणे केल्यास पुढील दहा वर्षांत चित्र थोडय़ाफार प्रमाणात बदललेले दिसेल. विद्यार्थी गुरुजींची आज्ञा कधीच मोडत नाहीत. त्यामुळे शिक्षकांनी लोकसंख्या शिक्षणात स्वतःला झोकून द्यावे. तरच देशाचा अर्थात आपला विकास शक्य आहे.