
>> नीती मेहेंदळे
एखादं गाव भूगोल, इतिहास…दोन्ही विषयांत इतकं समृद्ध असतं की, अगदी पैकीच्या पैकी गुण! गावात तटबंदीयुक्त वाडा म्हणावं तर आहे, गावाला स्वतचा असा संपन्न इतिहास आहे. त्याचं भौगोलिक स्थान चिपळूण, कराड वगैरे सध्याच्या प्रसिद्ध शहरांपासून दूर असलं तरी नीट पाहिलं तर मोक्याच्या ठिकाणी आहे. चारी बाजूंनी फेर धरून डोंगर आहेत. दोन-तीन किल्ले आहेत, बऱ्याच गुंफा आहेत, प्राचीन मंदिरं आहेत. कोयनेचं सदैव दाट वनराईने नटलेलं खोरं आहे आणि त्यातला राखीव वन विभाग पण आहे. या भूभागात अनेक दुर्मिळ वनस्पती व जीव विशेष आढळतात. इतकेच नव्हे तर साक्षात समर्थ रामदासांनी वास्तव्य करून अमर केलेली रामघळ तिथेच आहे. कोळकेवाडी आणि जंगली जयगडसारखे दुर्गम दुर्ग इथेच आहेत.
पाटण हे सातारा जिह्यातलं ऐतिहासिक गाव कराडपासून फक्त 35 कि.मी. आणि चिपळूणपासून 65 कि.मी. असं मध्येच वसवलेलं आहे. गावात ब्रह्मेश्वर, हरेश्वर, मोरेश्वर इ. देवालये आहेत. गावाच्या बाहेरून चाळकेवाडीला जाणाऱया मार्गावर एक फाटा लागतो. धारेश्वर हे त्या फाटय़ावरचं अजून एक पुरातन शिवमंदिर अगदी डोंगरात वसलेलं आहे. एका प्रशस्त गुंफेत धारेश्वराचं वसतिस्थान आहे. मंदिरात काही जुन्या घडणीचे नंदी तसेच काही प्राचीन मूर्ती मांडून ठेवलेल्या आहेत. धारेश्वरला जाण्याचा रस्ता अतिशय रमणीय आहे आणि पावसाळ्यात तिथे सुंदर धबधबाही दिसतो.
केरा आणि कोयना नद्यांचा संगम म्हणजे पाटण! केरा ही लहानशी नदी कोयनेची उपनदी इथे तिला येऊन मिळते. तिची धार पकडून उत्तरेस जात राहिलं तर तामकणे गावात पाटणची बौद्ध आणि शैव लेणी लागतात. बौद्ध लेणी एका बाजूला आणि शैव लेणी त्याच्या विरुद्ध दिशेला आहेत. या अजूनही बऱयाच गुंफा सापडतात, पण त्यामध्ये विशेष मूर्तिकाम नसलं तरी हा एक प्राचीन दस्तऐवज आहे हे महत्त्वाचे. पाटण लेण्यांच्या व्यतिरिक्त येरफळे आणि डिगेवाडी लेणी पण पाटणच्या अगदी शेजारीच आहेत.
पाटणची महत्त्वाची खूण म्हणजे पेशवेकालीन सरदार पाटणकरांचा वाडा. गावात गावाच्या नावावरून आडनाव असणाऱया एकेकाळच्या सरदार पाटणकरांचा इतिहासकालीन वाडा आहे. गावात अजूनही जुने वाडे आहेत, पण उत्तम अवस्थेत असा हा एकच. वाडय़ात प्राचीन राममंदिर आहे आणि बऱयाच पेशवेकाळ आणि त्यानंतरचा काळ दर्शवणाऱया खुणा वाडय़ात दिसतात.
पाटणहून कराड – चिपळूण मार्गावर चिपळूणच्या दिशेने जात राहिलं तर काही किलोमीटरवर रस्त्याच्या एका बाजूला दाते गड आणि विरुद्ध बाजूला गुणवंत गड असे दोन गुणी तसेच फारसे परिचित नसलेले किल्ले उठून दिसतात. या किल्ल्यांचं वैशिष्टय़ म्हणजे त्यांना असलेली पायऱयांची विहीर. गंमत म्हणजे पायऱयांची विहीर जशी दाते गडावर आहे तशी गुणवंत गडाजवळ चाफेर गावातही आहे. गुणवंत गडाच्या पायथ्याशी मात्र सिद्धेश्वराचं प्राचीन मंदिर आहे. मंदिर अगदी लहानखुरं असलं तरी जुन्या बांधणीचं आहे. मंदिराच्या बाहेरच्या भिंतीला टेकवून पुष्कळ वीरगळ ठेवलेले दिसतात. एरवी वीरगळात योद्धा लढतो, कामी येतो आणि मग स्वर्गात जाऊन शिवाची पूजा करतो. सहसा एरवी न आढळणारी एक गोष्ट इथे दिसते. वीरगळात तो गणपतीची पूजा करताना दिसतो. एवढेच नव्हे तर गुणवंत गडाच्या पायथ्याच्या गावाचं नावही मोरगिरी असे आहे. इथे गणेशाचा वास असावा ही श्रद्धा दिसून येते.