सिनेमा : हर फिक्र को धुए में…

>> प्रा. अनिल कवठेकर

सकारात्मकता समजण्यासाठी, ती जाणण्यासाठी एक विशिष्ट दृष्टी प्राप्त करून घेतली पाहिजे. ही दृष्टी वाढवण्यासाठी चित्रपट, त्यातील गाणी, संवाद, दृश्ये हा प्रयत्न सातत्याने करत असतात. देव आनंद यांच्या 1961 साली प्रदर्शित झालेल्या ‘हम दोनो’ या चित्रपटातील ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया…’ हे साहिल लुधियान्वी यांनी लिहिलेले गीत गेली 61 वर्षे जगण्याची प्रेरणा देत आहे.

जीवन सकारात्मकतेने जगण्याची अनेक कारणे आहेत, पण सकारात्मकता म्हणजे नेमके काय, हे कधीही कोणी समजून घेत नाही आणि ते सुंदर जीवनाला नकारात्मकतेने भारून टाकतात. सकारात्मकतेचा विचार शोधताना आपल्या संपन्नतेसाठी आवश्यक असणारे विचार संपादन करता यायला हवेत. सकारात्मकता समजण्यासाठी, ती जाणण्यासाठी एक विशिष्ट दृष्टी प्राप्त करून घेतली पाहिजे. ही दृष्टी वाढवण्यासाठी चित्रपट, त्यातील गाणी, संवाद, दृश्ये हा प्रयत्न सातत्याने करत असतात. दोन-अडीच तास हे मनाचे मनोरंजन आहे, असे समजून आपण चित्रपट पाहतो आणि विसरून जातो.

देव आनंद यांच्या 1961 साली प्रदर्शित झालेल्या ‘हम दोनो’ या चित्रपटातील ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया…’ हे साहिल लुधियान्वी यांनी लिहिलेले गीत गेली 61 वर्षे आपल्याला जगण्याची प्रेरणा देत आहे.

या गीतातील सकारात्मकता आपण समजून घेऊया. ‘हम दोनो’मध्ये देव आनंद दुहेरी भूमिकेत आहे. एक सैनिक अधिकारी आणि दुसरा सामान्य माणूस. सैनिकाने आपल्या आयुष्यात जी सकारात्मकता जपलेली आहे, ती त्याच्या गाण्यातून प्रगट होते. ते आपल्याला सांगते की, आपणही तसा जगण्याचा प्रयत्न करायला हवा. असा विचार आपल्या मनात येतो आणि मनात आलेला विचार पक्का झाला की, आपणही तसेच जगायला लागतो. कवीचीसुद्धा अशाच इच्छा होती का? हे सांगता येणार नाही.

हिंदुस्थानच्या कुठल्या तरी सीमेवरच्या जंगलात, देव आनंद उभा आहे. सकाळची वेळ आहे आणि तो आता राऊंडला निघण्याच्या तयारीत आहे. त्याच्याकडे एक विशिष्ट ध्वनी असणारे लायटर आहे. जो चालू करताच त्यातून सुंदर ध्वनी यायला लागतो. बाजूला असलेल्या डबक्यामध्ये पाणी आहे. ते पाणी स्थिर आहे. त्या स्थिर पाण्यामध्ये त्याला त्याच्या प्रेयसीचे चित्र दिसते. त्या स्थिर पाण्याला हळुवारपणे हलवून तो ते चित्र नाहीसे करतो आणि गीत सुरू होते.

‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया…’

सिगारेटचा धूर बेफिकीरपणे आकाशात सोडून तो पुढची ओळ गातो,

‘हर फिक्र को धुए में उडाता चला गया…’

त्या डबक्यातले शांत पाणी म्हणजे नायकाचे मन आणि त्या शांत पाण्यात उमटलेले प्रेयसीचे चित्र म्हणजे त्याच्या मनातल्या तिच्या आठवणींचे चित्र. पण तो त्या आठवणींमध्ये गुंतून न पडता त्यांना हळुवारपणे नाहीसे करतो. आठवणीत गुंतणे म्हणजे दुःख आणि आठवणींना धुरासारखे हवेत उडवणे म्हणजे सकारात्मकता. हा नायक सैनिक आहे. त्यामुळे त्याला जीवनाकडे इतक्या सकारात्मकतेने पाहणे शोभते आणि मान्यसुद्धा होते. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाला गाण्यामध्ये मांडल्याचे या गाण्यातून जाणवते. कारण बुद्धाने सांगितल्याप्रमाणे दुःख आहे, आनंद आहे आणि ते सर्व अनित्य आहे. दुःख जाणार आहे आणि आनंदही संपणार आहे आणि या कडव्यामध्ये,

‘बरबादी यों का सोग मनाना फिजूल था
बरबादी यों का जश्न मनाता चला गया…’

इथे नायक म्हणतोय की, माझ्या वाटय़ालाही अपयश आले, दुःखाचे डोंगर कोसळले, पण मी त्याचा शोक करत बसलो नाही. कारण हे काही काळापुरतेच आहे. जे वाटय़ाला आले त्या जगण्याचा मी उत्सव केला आहे. अपयशाला, दुःखाला मी मनापासून स्वीकारलेले आहे. विचारांची मोठी बैठक तयार होते तेव्हा नकारात्मकता पचवणे शक्य होते असा विचार कवीने मांडला आहे.

जंगलातील ते छोटेसे डबके, पण कोणीही न ढवळल्याने त्यातील गाळ खाली बसून ते काचेसारखे स्वच्छ झालेले आहे. पारदर्शक झालेले आहे. त्याचा तळही स्पष्ट दिसत आहे. देव आनंदला पाण्यात भासमान दिसणारे प्रतिबिंब नाहीसे करायचे आहे, पण तो ते पाणी ढवळून काढत नाही, तर ते अलगदपणे हलवतो आणि आठवणींचा चित्रमय भास पुसून टाकतो.

जीवनातही सगळा खेळ आपल्या मनाचा असतो. त्या मनात अपयशाच्या, अपमानाच्या, निराशेच्या, पराभवाच्या स्मृतींची अनेक वादळे घोंगावत असतात. त्या मनाला त्या डबक्यातल्या पाण्यासारखे शांत करायला शिकायला हवे. म्हणजे सगळी वादळे हळूहळू तळाला जाऊन बसतील आणि मन स्वच्छ होईल. मनाला अशी विचारहीन शून्यत्वाची स्थिती येणे म्हणजेच जीवनातील खरी सकारात्मकता होय. ही सकारात्मकता खूप उच्च दर्जाची आहे. सकारात्मकता म्हणजे काय तर अपयशाकडे साक्षी भाव ठेवून पाहणे. माझ्याबाबतीत जे घडते आहे, ते घडताना मी त्याचा साक्षी आहे, पण त्या घडण्याचा माझ्या मनावर कोणताही परिणाम होत नाही याबाबत मात्र मी सजग आहे. असेच या कडव्याचे बोल व चित्रीकरण सांगत आहे.
पुढच्या कडव्यात गीतकार म्हणतो,

‘जो मिल गया उसी को मुकद्दर समज लिया
जो खो गया मै उसको भुला तो चला गया
हर फिक्र को धुए मे उडता चला गया…’

आपल्या अपेक्षा प्रचंड वाढलेल्या आहेत. जे मिळाले आहे त्यात आपण समाधान मानायला तयारच नाही. आपल्या दुःखाचे हेच कारण आहे आणि इथे मात्र कवी सांगतोय, जे मला प्राप्त झालेले आहे तेच माझ्या नशिबात होते आणि ते मी तसे स्वीकारलेले आहे. जे माझ्यापासून हिरावले गेले ते माझ्यासाठी नव्हतेच हे मी मान्य केलेले आहे. त्या गोष्टींना आता मी विसरत चाललेलो आहे. जे आहे त्याच्यातला पूर्ण आनंद मी घेत आहे.

आपले मात्र अगदी उलट आहे. आपल्याकडे जे नाही त्याचे दुःख आपण कवटाळून बसतो. आपल्याकडे जे आहे त्यात आनंद मानायला शिकणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आनंद प्राप्तीसाठी आणखी काय करता येईल याचा विचार करायला हवा; पण त्याच्या आधी जे प्राप्त आहे त्याचाही आनंदाने उपभोग घेता यायला हवा.

शेवटचे कडवे अतिशय महत्त्वाचे आहे. ते अध्यात्मिक पातळीवर जाणारे कडवे आहे. त्यातल्या प्रत्येक ओळीतून बुद्धाचे तत्त्वज्ञान स्पष्ट होते. बुद्धाने म्हटलेले आहे की, जीवनात ज्या पद्धतीने तुम्ही एखाद्याच्या जन्माचा उत्सव साजरा करता त्याच पद्धतीने तुम्ही एखाद्याच्या मरणाचा उत्सव साजरा करायला हवा, म्हणजे जन्म आणि मृत्यू या दोन्ही घटना त्याच मानसिकतेने आपण स्वीकारायला हव्यात. मग एक वेळ अशी येईल की, आनंद आणि दुःख यातला फरकच निघून जाईल. याच आशयाच्या या ओळी आहेत.

गम और खुशी मे फर्क ना महसूस हो जहां
मै दिल को उस मकाम पे लाता चला गया…’

आनंदाची गोष्ट झाली तर आपल्याला आनंद होतोच, मग दुःखाची गोष्ट झाली तर दुःख होणारच; पण आनंद झाल्यानंतरही मला त्याचे काही वाटत नाही जेव्हा अशी मनाची स्थिती येते तेव्हा तो माणूस अध्यात्माच्या एका उच्च पातळीवर गेलेला आहे असे समजायला हरकत नाही. नायक देव आनंद असे सांगतो की, मी स्वतःला एका अशा पातळीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहे, ज्या ठिकाणी दुःख आणि आनंद यात कोणताही फरक राहणार नाही आणि त्यासाठी आपल्यामध्ये साक्षी भाव हवा. कारण आनंदाची आपण जेव्हा मागणी करतो तेव्हा त्या आनंदाच्या दिशेने होणारा प्रवास हा दुःखाच्या मार्गावरूनच असतो; पण ज्या क्षणी आनंद आणि दुःख यातील भावनांचा अस्त होतो, त्यावेळी कोणाच्या प्रेमळ शब्दाने आनंद होत नाही आणि कोणी अपशब्द वापरले तरी त्याचा राग येत नाही. जीवनातील हीच खरी सकारात्मकता होय.

गाण्यातील प्रत्येक कडव्याची एक ओळ तीन वेळा गायली गेलेली आहे. ती यासाठीच की, तो विचार मनाला वारंवार सांगून मनाची तयारी करून घेत आहे. मनाची तयारी फार महत्त्वाची आहे. या ठिकाणी बुद्धाच्या जीवनातील एक गोष्ट मला आठवते, एकदा भगवान बुद्धांचे प्रवचन चालू होते तेव्हा एक माणूस तिथे आला व तो त्यांच्या अंगावर थुंकला. भगवान बुद्धांनी शांतपणे त्याच्याकडे पाहिले आणि त्याला म्हणाले, तुला अजून काही सांगायचे आहे का? तो माणूस रागाने निघून गेला. त्या माणसाला मारण्यासाठी आनंद उभा राहिला. तेव्हा भगवान बुद्धांनी त्याला हाताने शांत राहण्याची सूचना केली. दुसऱया दिवशी तो माणूस पुन्हा आला व भगवान बुद्धांचे पाय धरून रडू लागला. भगवान म्हणाले, ‘बाळा तुला अजून काही सांगायचे आहे का?’ तेव्हा तो शांत झाला. या बुद्धत्वाच्या प्राप्तीची पातळी म्हणजे आनंद तसेच दुःखाच्या पलीकडे जाण्याची मनाची तयारी होय.

अत्यंत उच्च दर्जाची सकारात्मक ऊर्जा देणारे हे गाणे आपल्याला जगण्याचा संदेश देणारे संगीतमय प्रवचन आहे आणि हे प्रवचन एक सैनिक देतोय. ज्याने मृत्यूला स्वीकारून जगण्याचे काwशल्य प्राप्त केलेले आहे. त्यामुळे हे साधू-महात्म्यांच्या प्रवचनापेक्षा अधिक खरे वाटणारे आहे. जीवनाच्या सकारात्मतेचे मार्गदर्शन करणारे आहे म्हणून पटणारे आहे. फक्त त्या गाण्यातल्या शब्दांशी आपल्याला बोलता यायला हवे. तेव्हाच ते शब्द आपल्याला त्याचा अर्थ, त्याचे सौंदर्य हळुवारपणे उलगडून दाखवतील. या सकारात्मकतेमध्येच जगण्याचा आनंद आहे. समाधान आहे आणि जीवन समजून घेण्याचे भानदेखील आहे. म्हणून आयुष्यभर साथ देणारे हे एक अजरामर गीत आहे.
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)