आपल्या मुलांचं करीयर

199

>>प्रसाद शिरगावकर

जग जसं बदलत गेलं तसं करीअरच्या संधी असलेली ग्लॅमर असलेली क्षेत्रंही बदलत गेली. यातल्या कोणत्याही बदलाचं कोणीही भाकीत करू शकलं नव्हतं. जगाच्या बदलाचा हा वेग अफाट वाढत असताना आणखी दहा वर्षांनी काय होऊ शकेल, कोणत्या क्षेत्रात करीअरच्या संधी असतील आणि कोणत्या करीअरला ग्लॅमर असेल हे आज सांगता येणं निव्वळ अशक्य आहे.

हल्ली मुलं आठवी-नववीत गेली की पालकांना त्यांच्या करीयरचे वेध लागतात. हे लागायचं कारण म्हणजे बारावीनंतर द्याव्या लागणाऱया वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांच्या कोचिंग क्लासेसचे पालकांना फोन यायला लागतात. ‘तुमचा मुलगा-मुलगी आमच्याकडे आले तर पाच वर्षे घासून तयारी करून घेऊन त्यांना ‘टॉप’ कॉलेजमध्ये हमखास ऍडमिशन मिळवून देऊ’, अशी वचनं फोनवर मिळायला लागतात. आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळून त्यांचं करीयर उत्तम व्हावं असावं असं सगळ्याच पालकांना वाटत असतं. शिवाय ‘टॉप’च्या कॉलेजेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी असलेल्या आणि वाढत चाललेल्या प्रचंड जीवघेण्या स्पर्धेचीही पालकांना जाणीव असते. या स्पर्धेमध्ये आपली मुलं मागे पडू नयेत म्हणून पालक आपल्या मुलांना आठवी-नववीपासूनच बारावीनंतरच्या परीक्षांच्या कोचिंग क्लासेसना घालताना दिसत आहेत अन् मुलंही आठवी-नववीपासूनच आठवडय़ाचे 6 ते 20 तास बारावीनंतरच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करताना दिसत आहेत. हे सारं प्रामुख्याने इंजिनीयरिंग किंवा मेडिकलच्या ‘टॉप’ कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी सुरू असलेलं दिसतं.

ही सर्व तगमग बघून मला अनेक प्रश्न पडतात. आठवी किंवा नववीत म्हणजे वयाच्या तेराव्या-चौदाव्या वर्षीच आपल्याला डॉक्टर किंवा इंजिनीयरच बनायचं आहे हे मुलांचं खरोखर ठरलेलं असतं का? हे करीयर म्हणजे काय हे त्यांना माहीत असतं का? हे करण्याची क्षमता आणि मुळात आवड आपल्याला आहे का हे त्यांनी तपासलेलं असतं का? पौगंडावस्थेतलं प्रचंड उत्साह आणि ऊर्जा असलेलं हे वय असतं. रोज नवं काहीतरी करावंसं वाटणं, करून बघावंसं वाटणं. रोज नवी स्वप्नं बघणं आणि स्वतःला, स्वतःच्या क्षमतांना explore करून बघण्याचं हे वय असतं. या वयात त्यांच्या भविष्याची दिशा ठरवून त्या चाकोरीत त्यांना ढकलून देणं योग्य आहे का?

‘आपली मुलं हुशार आहेत फक्त ती कष्ट करत नाहीत’ असं बहुसंख्य पालकांना वाटत असतं. आळशीपणामुळे त्यांच्या संधी जायला नकोत असंही वाटत असतं. याशिवाय शिक्षण आणि करीयरच्या स्पर्धेत टिकण्यासाठी भरपूर मेहनत करायला हवी असा त्यांचा आग्रह असतो. पालक म्हणून हे सगळं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. यात एकच अडचण अशी आहे की, करीयरची जी दिशा आपल्याला आज योग्य वाटते ती आजपासून दहा वर्षांनीही योग्य असणार आहे का याचा कोणी विचार करताना दिसत नाही. असं बघा, आठवीमध्ये ठरवलेल्या परीक्षेची पाच वर्षे तयारी करायची आणि समजा हवं ते कॉलेज/शाखा मिळाली की पुढची किमान पाच वर्षे शिकून पदवी मिळवायची. म्हणजे त्या क्षेत्रात नोकरी किंवा व्यवसाय करायची वेळ येईल तेव्हा आजपासून दहा वर्षे झालेली असणार. आपण आपल्या मुलांना त्यांची आवड, निवड, कल, क्षमता वगैरे काही न बघता ज्या करीयरच्या मार्गाला लावतो आहोत ते आज ग्लॅमरस असेल, पण दहा वर्षांनीही असेल का याचा आपण विचार करतो का?

आपल्याच भूतकाळातली उदाहरणे बघितली तर आपल्या आईवडिलांच्या लहानपणी म्हणजे साधारण 60-70 वर्षांपूर्वी सरकारी नोकरीला खूप ग्लॅमर होतं. क्लास वनपासून क्लास फोरपर्यंत कोणतीही सरकारी नोकरी मिळणं हे लोकांना अहोभाग्य वाटायचं. अशी नोकरी मिळावी म्हणून लोक जिवाचा आटापिटा करायचे. आपल्या लहानपणी म्हणजे साधारण 30-40 वर्षांपूर्वी हे ग्लॅमर डॉक्टरकी आणि इंजिनीयरिंग या क्षेत्रांना आलं होतं. आपण डॉक्टर किंवा इंजिनीयर व्हावं हे बहुसंख्य मुलांचं (किंवा खरंतर त्यांच्या पालकांचं) स्वप्न असायचं. ही दोन्ही प्रचंड प्रतिष्ठा आणि अर्थप्राप्तीची संधी असलेली क्षेत्रं होती तेव्हा. अर्थात, सरकारी नोकरीचं ग्लॅमरही फारसं कमी झालं नव्हतं. पण कोणत्याही जनरल सरकारी नोकरीऐवजी UPSC/MPSC करून वरच्या क्लासची सरकारी नोकरी करावी असं लोकांचं ध्येय असायचं. नव्वदीच्या दशकात अचानक IT क्षेत्राची चलती झाली. Computer Engineers, Electronic Engineers ना अचानक खूप महत्त्व मिळायला लागलं. ज्यांनी मूलभूत शिक्षणासाठी ही क्षेत्रं निवडली होती त्यांची चांदी झालीच, पण ज्यांनी या क्षेत्रात उडी मारली त्यांचीही चांदी झाली.

जग जसं बदलत गेलं तसं करीअरच्या संधी असलेली ग्लॅमर असलेली क्षेत्रंही बदलत गेली. यातल्या कोणत्याही बदलाचं कोणीही भाकीत करू शकलं नव्हतं. सध्या तर जगाच्या बदलाचा हा वेग अफाट वेगानं वाढतो आहे. असं असताना आणखी दहा वर्षांनी काय होऊ शकेल, कोणत्या क्षेत्रात करीअरच्या संधी असतील आणि कोणत्या करीअरला ग्लॅमर असेल हे आज सांगता येणं निव्वळ अशक्य आहे.

आपल्या आईवडिलांच्या लहानपणी ग्लॅमरस असलेल्या सरकारी नोकऱया, आपल्या लहानपणी ग्लॅमरस असलेली डॉक्टरकी-इंजिनीयरिंग आणि गेली 10-20 वर्षे अफाट ग्लॅमरस असलेली IT/ITES क्षेत्रांतली करीअर्स ही सारीच आज अत्यंत स्पर्धात्मक झालेली आहेत आणि त्यातल्या संधींना ओहोटी लागलेली दिसत आहे. या सगळ्या क्षेत्रांना law of marginal returns लागू होऊन त्या क्षेत्रांत जाण्यासाठी कराव्या लागणाऱया कष्टांपेक्षा त्यातून मिळणाऱया परताव्याचं मूल्य कमी कमी होऊ लागलं आहे.

हे असं सगळं असताना पालकांना जे आज योग्य वाटत आहे अशा करीअरच्या चाकोरीत मुलांना त्यांनी जग आणि स्वतःच्या क्षमता ाxज्त्दा करण्याच्या वयातच ढकलून देणं योग्य आहे का हा प्रश्न मला पडतो. शिवाय ही चाकोरी सोडून ‘मला अमुक तमुक व्हायचं आहे’ असं सांगणाऱया आपल्या मुलांना ‘ते तू करच किंवा करू नकोस’ हे कोणत्या आधारावर सांगावं हेही मला समजत नाही. ‘बारटेंडर’ बनण्यापासून ते ‘गिटारिस्ट’ बनण्यापर्यंत काहीही स्वप्नं आहेत आपल्या पुढच्या पिढीची. त्या स्वप्नांना आपण आपल्या लहानपणच्या जगाच्या तथ्यांच्या आधारावर का नाकारायचं हे मला समजत नाही.

एक नवं जग आकाराला येतंय. ते कसं असेल, काय असेल हे आपल्याला माहीत नाही. त्यात कोणते करीयर चॉइस उत्तम ठरतील हेही आपल्याला माहीत नाही. हे जग आपल्या आजच्या लहानग्यांचं असणार आहे. या नव्या जगातल्या आपल्या लहानग्यांवर आपण आपले पूर्वग्रह आणि निर्णय का लादायचे?

मुलांना त्यांच्या क्षमता आणि आवडीनिवडी explore करून बघण्यासाठी वातावरण आणि संधी देणं हे पालक म्हणून आपलं काम आहे, करीअरची चाकोरी आखून देणं हे नाही. हे आपण करू शकलो तर त्यांच्या क्षमते आणि आवडीनुसारचं करीअर ते निवडतीलच.

(लेखक मुक्तस्रोत तंत्रज्ञानामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे प्रशिक्षक आणि वक्ते आहेत़)

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या