ठसा – न्या. कृष्णा अय्यर

>> अॅड. प्रतीक राजूरकर

देशाच्या विधी आणि न्यायिक वर्तुळाला दक्षिण हिंदुस्थानने अनेक रत्ने दिली. त्यापैकीच एक वैद्यनाथपुरम रामा अय्यर कृष्णा अय्यर हे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. 99 वर्षांच्या आयुष्यात कृष्णा अय्यर यांनी राजकीय, विधी, न्यायिक आणि सामाजिक क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळाच ठसा उमटवला आहे. प्रत्येक क्षेत्रातील त्यांचे योगदान अनन्यसाधारण असेच म्हणावे लागेल. केरळ विधानसभेतील अपक्ष आमदार, मंत्री, उच्च व सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश, सामाजिक चळवळीतील एक अग्रगण्य नेतृत्व अशी न्या. कृष्णा अय्यर यांची ख्याती आहे. न्यायाधीश म्हणून त्यांनी दिलेले निकाल, निवाडे यांचे साहित्यिक ठेवा म्हणून मान्यवरांनी केलेले वर्णन न्या. कृष्णा अय्यर यांचे वेगळेपण अधोरेखित करणारे आहे. त्यांच्या अनेक महत्त्वपूर्ण निकालांपैकी मेनका गांधी विरुद्ध पेंद्र सरकार हा निकाल स्वायत्तता आणि जगण्याच्या अधिकारांचे संरक्षण करणारा मैलाचा दगड ठरतो.

तामीळ ब्राह्मण कुटुंबात कृष्णा अय्यर यांचा 15 नोव्हेंबर 1915 रोजी जन्म झाला. वडील रामा अय्यर हे व्यवसायाने वकील असल्याने कृष्णा अय्यर यांना वकिलीचा वारसा घरातूनच प्राप्त झाला. पुढे कृष्ण अय्यर यांनी त्याची व्याप्ती वाढवत तो तळागाळातील सामान्य गरीब वंचितांपर्यंत वाढवली. वडिलांसमवेत 1938 साली कृष्णा अय्यर यांनी वकिली व्यवसायास सुरुवात केली. 1948 साली पोलीस कोठडीत झालेल्या एका मृत्यूविरोधात आंदोलनातील सहभागामुळे कृष्णा अय्यर यांना एक महिना तुरुंगात जावे लागले. 1952 साली कृष्णा अय्यर हे थालास्सेरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले. नंबुद्रिपाद यांच्या मंत्रिमंडळात कृष्णा अय्यर यांनी गृह, विधी, तुरुंग, सामाजिक न्याय खात्यांचे मंत्रीपद भूषविले. मंत्रीपदावर असताना गरीबांना विधी सेवा, कामगार कायदे, तुरुंग सुधारणा यांसारखे महत्त्वाचे बदल कृष्णा अय्यर यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात घडले. 12 जुलै 1968 रोजी त्यांची उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. पाचच वर्षांत न्या. कृष्णा अय्यर यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती असाधारण अशीच म्हणावी लागेल. 14 नोव्हेंबर 1980 साली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून न्या. कृष्णा अय्यर निवृत्त झाले. सर्वोच्च न्यायालयाचे 7 वर्षे आणि 4 महिने न्यायाधीश असलेल्या कार्यकाळात न्या. कृष्णा अय्यर यांनी 700 वाचनीय अशा निकालांचे लेखन केले. या निकालांचे वर्णन करताना सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश के. एम. जोसेफ यांनी नुकतेच साहित्यिक रत्ने असा उल्लेख करत न्या. कृष्णा अय्यर यांचा न्यायाधीश आणि विचारसरणीची तोंडभरून स्तुती केली.

निवृत्तीनंतरही न्या. कृष्णा अय्यर यांनी स्वतःला चळवळीत झोकून दिले होते. लिखाणातून, आंदोलनातून त्यांच्यातील कार्यकर्ता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. अनेक सामाजिक आंदोलनांत ते सहभागी होत होते. गरजूंना आवश्यक कायदेशीर मदत करणे यांसारख्या सामाजिक कार्यात ते निरंतर गुंतलेले असत. 1987 सालच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत न्या. अय्यर विरोधकांचे उमेदवार होते. त्यांच्या विरोधात आर. वेंकटरामण राष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्यांचे विविध क्षेत्रांतील कार्य बघता त्यांना पेंद्र सरकारकडून 1999 साली पद्मविभूषण या नागरी पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या अखेरच्या दिवसाअगोदर काही आठवडे ते सामाजिक कार्यात सक्रिय होते. वयाची 99 वर्षे उलटूनही त्यांची समाजाविषयीची तळमळ तरुण होती. 4 डिसेंबर 2014 रोजी वार्धक्याने त्यांचे कोची येथे निधन झाले. न्या. कृष्णा अय्यर यांचा एका शतकाचा प्रवास जरी 2014 साली थांबला असला तरी त्यांचे निकाल आणि कार्य पुढील अनेक शतके बोलके आणि प्रेरणादायी ठरतील.