बुद्धिमान गुंतवणूकदार

>> प्रवीण धोपट

‘द इंटेलिजंट इन्व्हेस्टर’ हे पुस्तक झटपट श्रीमंत होण्याच्या क्लृप्त्या सांगत नाही तर शिस्त, प्रत्यक्ष अनुभव आणि योग्य दृष्टिकोन याद्वारे आपल्या संपत्तीत संयमितपणे आणि दीर्घकालीन वाढ करण्याची मात्रा देते.

बेंजामिन ग्रॅहॅम यांनी लिहिलेले ‘द इंटेलिजंट इन्व्हेस्टर’ या पुस्तकाला इन्व्हेस्टिंगच्या दुनियेत बायबल म्हणून संबोधले जाते. हे पुस्तक म्हणजे केवळ तत्कालीक उपाय नाही, तर सार्वकालिक अभिजात आहे. 1949 साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाने आर्थिक आणि गुंतवणुकीच्या दुनियेतील जगाचा कानाकोपरा व्यापला आहे.

‘द इंटेलिजंट इन्व्हेस्टर’ हे असे एक पुस्तक आहे की, जे केवळ गुंतवणुकीची माहिती देत नाही तर गुंतवणूकदाराला एक प्रकारचे शहाणपण बहाल करते. त्यामुळेच ग्रॅहॅम यांना ‘फादर ऑफ व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ असेही म्हटले जाते. हे पुस्तक वाचल्यानंतर गुंतवणूकदाराची दृष्टी बदलते आणि तो स्टॉक मार्केटकडे काळजीपूर्वक आणि हुशारीने पाहायला लागतो.

या पुस्तकाने गुंतवणूकदारांचे दोन भाग स्पष्ट करून ठेवले आहेत. जे आजही लागू होतात आणि भविष्यातही तेच राहतील. एक म्हणजे डिफेंसिव्ह म्हणजे थोडासा सावध असलेला आणि दुसरा धाडसी म्हणजेच एंटरप्रायसिंग प्रकारातला असतो. सावध गुंतवणूकदार फार कष्ट न घेता कमी जोखीम घेऊन गुंतवणूक करणारा, तर धाडसी गुंतवणूकदार अधिक वेळ देऊन, अधिक चिकित्सा करून निर्णय घेणारा गुंतवणूकदार असतो. बेंजामिन ग्रॅहॅम यांनी आपल्या पुस्तकात दोन्हीही प्रकारच्या गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन केले आहे.

संपूर्ण पुस्तकभर ग्रॅहॅम यांनी सुरक्षिततेची मर्यादा हा अनोखा कन्सेप्ट मांडला आहे. ज्यामुळे ग्राहकाला कोणतीही मालमत्ता खरेदी करताना तिच्या मूळ किमतीला विकत घेण्याची आणि होणाऱया संभाव्य नुकसानीपासून वाचण्याचे तंत्र शिकवते. या पुस्तकात त्यांनी मार्पेटच्या सायकॉलॉजीचाही अभ्यास केला आहे. गुंतवणूकदारांच्या मानसिकतेचा गुंतवणुकीच्या निर्णयावर कसा परिणाम होतो याचेही दाखले दिलेले आहेत.
बेंजामिन ग्रॅहॅम यांनी आपल्या ‘द इंटेलिजंट इन्व्हेस्टर’वर एक पात्र उभे केले आहे ते म्हणजे मिस्टर मार्केट. ज्या पात्राचा स्वभाव काहीसा मूर्खासारखा, लॉजिक नसलेला, इररॅशनल आणि भावनिक आहे. ग्रॅहॅम यांनी या पात्राला आपला मित्रच नव्हे, गुरू बनवा आणि त्याच्या मूर्खपणाचा फायदा घ्या असे सांगितले आहे.

वॉरन बफेट यांनीसुद्धा या पुस्तकाला गुंतवणुकीच्या विश्वातले सर्वोत्तम पुस्तक म्हटले आहे. ज्या व्यक्तीला मार्केट म्हटल्यावर भीती वाटते, ज्याला मार्केट म्हटल्यावर नकारात्मक विचार येतात, ज्याला मार्केट कठीण, जटिल वाटते किंवा ज्याचे मार्केटविषयी काही ग्रह आहेत त्यांनी ‘द इंटेलिजंट इन्व्हेस्टर’ हे पुस्तक वाचायलाच हवे.

(लेखक दीपंकर फिनकॅप इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. येथे गुंतवणूक सल्लागार आहेत)