गूढ… तरीही मनोरंजक !

>> प्रा. अनिल कवठेकर

आमीर खान प्रॉडक्शननिर्मित ‘तलाश’ हा चित्रपट 2003 ला येऊन गेला; पण प्रेक्षकांना तो फारसा कळला नाही. ‘प्रत्येक चित्रपट हा मनोरंजनासाठी पाहायचा असतो’ ही व्याख्याच मुळी चुकीची आहे. काही चित्रपट हे एक विलक्षण सुन्न करणारा अनुभव देऊन जातात, जो अनुभव अनेक दिवस आपल्या मनावर एक वेगळाच परिणाम करत असतो. असाच विलक्षण वेगळा अनुभव देणारा ‘तलाश’ होता.

‘तलाश’ म्हणजे शोध. प्रत्येक व्यक्तिरेखा कसला ना कसला शोध घेत आहे. सुरजन (आमीर खान) अपघात कसा झाला याचा शोध घेतोय. रोशनी (राणी मुखर्जी) मृत्यू पावलेल्या तिच्या मुलाच्या आत्म्याचा शोध घेतेय. तैमूर (नवाजुद्दीन) प्रेयसी निर्मलाबरोबर कुंटणखान्यातून पळून जाण्याच्या संधीचा शोध घेतोय. ज्या इमारतीत सुरजन राहतो त्या इमारतीतच राहणारी एक बाई दुखावलेल्या आत्म्यांचा शोध घेतेय. रोझीचा आत्मा मृत्यूनंतर मुक्तीचा शोध घेतोय. अरमान कोहलीची बायको आपल्या नवऱयाने आत्महत्या का करावी, त्याचं एखाद्या मुलीशी संबंध होते का, याचा शोध घेतेय. प्रत्येकाचा शोध चालू आहे आणि प्रेक्षक चित्रपट पाहताना काय घडलं असावं याचा शोध घेऊ लागतो. नायक-नायिकासोबत यातल्या सगळ्याच छोटय़ा छोटय़ा भूमिका तितक्याच महत्त्वाच्या आहेत. या चित्रपटाची कथा आणि पटकथा अगदी कडक आहे. चित्रपट वेगवान नाही तरी कथेला एक गती आहे आणि त्याच गतीने तो प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालतो. प्रत्येक घडलेली घटना विचार करायला लावते. चित्रपट पाहताना गोंधळून जावं आणि विचार करावा हेच दिग्दर्शकाला अपेक्षित आहे. मनात उडणारा गोंधळ हेच मनोरंजन आहे.

‘तलाश’ची कथा सगळ्या पात्रांना सहजपणे जोडत जाते. यातील कोणतंही पात्र वेगळं काढता येत नाही. प्रत्येक पात्र ही स्वतंत्र कथा आहे आणि ती प्रत्येक स्वतंत्र कथा या मूळ कथेशी सहजपणे जोडलेली आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र पटकथेची महत्त्वाची गरज बनलेलं आहे. अशा प्रकारचे दिग्दर्शन करण्यामध्ये रिमा कागदी यशस्वी झालेल्या आहेत. चित्रपट सुरू होतो आणि रात्रीची रंगीत मुंबई दिसू लागते. त्या रंगीत मुंबईच्या पार्श्वभूमीवर गाण्याचे शब्द ऐकू येतात… मुस्कान झुठी, है पहचान झुठी है… ‘मुंबईत जगणाऱया प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱयावरचे हास्य आणि दिसतो तसं त्याचं नसणं ही त्याची ओळख खोटी आहे’ अशा अर्थाचं हे गाणं पडद्यावर दिसू लागतं. मारहाणीच्या व्रणावर रंग फासून पुन्हा जगण्यासाठी उभ्या राहणाऱया शरीरपी करणाऱया महिला. गाणं संपता संपता रात्र वाढत जाते आणि पहाटेच्या नीरव शांततेत वरळी सीफेस दिसू लागतो. इतक्यात अत्यंत वेगाने येणारी कार अचानक समुद्राच्या दिशेने वळते आणि समुद्रात जाऊन कोसळते. पाण्यात बुडणारी कार दिसत असतानाच दिवस उजाडायला सुरुवात होते तेव्हा तिथे सुरजन सिंग शेखावत येतो.

 गुढत्व वाढवणाऱया त्याच्या जाड मिश्या, नियमाने वागणाऱया पोलीस इन्स्पेक्टरला शोभतील असे बारीक केस, अनेक दिवस न झोपल्यामुळे डोळ्यांमध्ये आलेला ताठरपणा अशा अवतारात आमीर खान आपल्याला दिसतो.

अरमान कपूरला गाडी चालवायला आवडत नाही, पण त्या दिवशी तो ड्रायव्हर घेत नाही आणि ज्या रस्त्यावर त्याचा अपघात झालाय, तो त्याच्या घराचा रस्ता नाही. मग प्रश्न उभा राहतो की, हा त्या रस्त्यावरून कुठे जात होता आणि त्याने अचानकपणे रस्ता रिकामा असताना गाडी का वळवली? त्याला रस्त्यावर नेमकं काय दिसलं? रस्त्याच्या कडेला असणारी माणसं सांगतात की, “आम्ही पाहिलं, रस्त्यावर कोणीही नव्हतं, पण गाडी डायरेक्ट समुद्राकडे वळली.” हा गुंता चित्रपट पाहण्याची उत्कंठा वाढवतो.

अरमान कपूरच्या मृत्यूची बातमी मुंबईच्या रेड लाईट एरियात समजताच तिथला दलाल शशी लगेच प्रेयसीला सोडून गावी जायला निघतो. शशीचा आणि अरमान कपूरचा काय संबंध आहे? अरमान कपूर हा चित्रपटसृष्टीत हिरो आहे आणि शशी हा एक सामान्य दलाल. शशी गावी निघताना मोबाइल नंबर बदलतो, जुनं कार्ड फेकतो. ते फेकलेलं सिमकार्ड चाणाक्ष तैमूर पायाच्या बोटांच्या साह्याने ताब्यात घेत शशीच्या हालचालीचा अंदाज घेतो. प्रश्नांवर प्रश्न निर्माण होत जातात आणि प्रेक्षक त्यात गुंतत जातो.

तैमूर (नवाजुद्दीन सिद्दिकी) रेडलाईट एरियात पडेल ते काम करणारा हरकाम्या मुलगा. पायाने लंगडा, पण अतिशय चाणाक्ष आहे. अवतीभवती घडणाऱया प्रत्येक गोष्टीवर त्याचं बारीक लक्ष असतं. चेहऱयाच्या हावभावातून आणि डोळ्यांच्या हालचालीतून नवाजुद्दीनने त्याचा हा चाणाक्षपणा, धूर्तपणा जबरदस्त रंगवला आहे. त्याचा वर्ण,   तेलकटपणातून तो एक चतुर असल्याचं लक्षात येतं. विशिष्ट पद्धतीने लंगडत चालण्याची लकब त्याच्या स्वभावाची छाप पडण्यास उपयुक्त ठरते. तो अशा एका संधीची वाट पाहतोय, ज्यामुळे त्याच्या पदरात काहीतरी पडेल आणि तो तिथून प्रेयसीला घेऊन बाहेर पडेल.

नायकाचे नाव सुरजन आहे (सुरजन म्हणजे सूर्यच), पण मनात निराशेचा काळोख आहे. पत्नीचं नाव रोशनी, पण तिच्या जीवनात अंधार आहे. अपघातात मूल गेल्याची दु:खी छटा संपूर्ण घरात पाहायला मिळते. नैराश्याचं घर दाखवण्यात कला दिग्दर्शक यशस्वी झाला आहे.

सुरजनची रात्रीची झोप हरवलेली आहे. तो मुलाची बॅट घेऊन रात्रीच्या अंधारात आपल्या बेडवर झोपून हलवतोय आणि त्याच वेळी त्यांचा मुलगा अपघातात कसा गेला ते प्रेक्षकांना स्पष्ट होतं. आपल्या मुलाच्या मृत्यूला आपणच जबाबदार आहोत असा पक्का समज त्याने करून घेतलेला आहे.

त्यांच्या इमारतीमध्ये एक अशी बाई आहे, जिच्या माध्यमातून आत्मे बोलतात. ती रोशनीला सांगते की, तिचा मुलगा करणला तिच्याशी बोलायचं आहे. या असल्या गोष्टीवर सुरजनचा विश्वास नाही. रोशनी विज्ञानाची विद्यार्थिनी आहे, पण एक मूल गमावलेली आईसुद्धा आहे. कुठल्या तरी मार्गाने मुलाविषयी मिळणारी माहिती तिला त्या बाईशी जोडते आणि ती त्या बाईच्या माध्यमातून करणच्या संपर्कात असल्याच्या समाधानात राहते.

सुरजन रात्रभर केसच्या संदर्भात फिरत असतो.  खरंतर त्या दोघांनाही जगायचे आहे, पण ते जगू शकत नाहीत. जगण्याचा आनंद घेऊ शकत नाहीत. आपण आपल्या मुलाच्या मृत्यूला दोषी आहोत ही अपराधीपणाची भावना घेऊन जगत आहेत आणि याचदरम्यान त्याला रोझी भेटते.

रोशनी हळूहळू मोकळी व्हायला लागलेली आहे. करणला आपल्या डॅडाशी बोलायचं आहे आणि म्हणून ती सुरजनला “आपण सिनेमा पाहायला जाऊ या” असं सांगते.

दोघे सिनेमा पाहायला जातात. सिनेमातल्या प्रत्येक वाक्याचा ती आनंद घेते आणि सुरजन ती बरी झालेली पाहून आनंदात असतो. चित्रपट संपल्यानंतर त्यांची भेट समरशी होते. समर त्याच्या आई-वडिलांबरोबर मॉलमध्ये आलेला असतो. समरला सुरजनने आणि रोशनीने अपघातात वाचवलेले असते. ते स्वतच्या मुलाला वाचवू शकत नाहीत. त्यामुळे समरला पाहिल्यानंतर साहजिकच सुरजनच्या आठवणी जाग्या होतात. तो त्यांच्याशी व्यवस्थितपणे बोलत नाही. या गोष्टीचा रोशनीला राग येतो. कारण तिने मुलाच्या मृत्यूशी समीरचा काही संबंध नाही हे स्वीकारलेले आहे, पण सुरजनने  ते अजूनही स्वीकारलेले नाही. रोशनीवर मानसोपचार चालू आहेत, पण खरी गरज कुणाला आहे ते या दृश्यानंतर प्रेक्षकांच्या लक्षात येतं.

सुरजन आपल्या मित्राला घेऊन घरी आलेला आहे आणि घरात रोशनी नाही. रोशनीने आपण कुठेतरी जात आहोत असे लिहिलेले आहे. सुरजन कपाटाचा दरवाजा उघडतो. तिथे तिची औषधं जशीच्या तशी असतात आणि तिथेच करणने आईशी साधलेल्या संवादाचे कागद असतात. ते सगळे कागद तो फेकून  देतो आणि त्या बाईच्या घरात जातो. तिथे रोशनी आणि सुरजन यांच्यात संघर्ष होतो.

तैमूर त्याला सापडलेले सिमकार्ड आपल्या मोबाइलमध्ये टाकून अंदाज घेत असतो. त्याला सुगावा लागतो आणि तो त्या व्यक्तीकडे वीस लाखांची मागणी करतो. पैसे देण्यासाठी रेल्वे स्टेशनवर बोलवतो. पण प्रत्यक्षात पैसे देणारा त्याच्यापेक्षा हुशार असल्यामुळे तैमूरच्या हातात पडलेले पैसे तो त्याच्या प्रेयसीला देऊन तिला “मी आलो वा नाही आलो तरी तुला पुढचा प्रवास करायचा आहे” असं सांगतो. जेव्हा तो मृत्यूच्या जवळ असतो तेव्हा त्याला तिथे पहिल्यांदा रोझी अर्थात सिमरन दिसते. तैमूरचा मृत्यू होतो. निर्मलाला पैसे मिळतात. ती दुःखी होते, पण पैसे पाहिल्यानंतर पुन्हा जीवन जगण्यासाठी सज्ज होते. एका क्षणात कॅमेरा हे सगळं सांगून जातो.

तैमूर केजरीवालला पैसे देण्यासाठी स्टेशनवर बोलवतो आणि त्याच्याकडून पैसे घेऊन या ट्रेनमधून त्या ट्रेनमध्ये, त्या ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर, प्लॅटफॉर्मवरून खाली असा प्रवास करतो. कारण त्याच्यामागे केजरीवालचे गुंड लागलेले असतात. हा सगळा प्रवास आपल्याला श्वास रोखून धरायला लावतो.

याचा शेवट विलक्षण सुन्न करणारा आहे. सुरजन आत्मा वगैरे प्रकार नाकारतो. रोशनी कोणाच्या तरी माध्यमातून आपल्या मुलाशी बोलते हा त्याला भ्रम वाटतो. त्यामुळे तो चिडतो. पण सुरजनला खुनाच्या शोधात रोझीला आत्माच मदत करत असतो. ती त्यालाच दिसते आणि कुणालाही दिसत नसते. तो तिच्याशी बोलत असताना इतरांना तो स्वतशी बोलतोय असं वाटतं. हा वेडा झालाय आणि जे सत्य त्याच्याकरिता सत्य असतं, इतरांकरिता भ्रम होतो. सुरजनचा सहकारी त्याला सांगतो की, तुला एफआयआरमध्ये ‘रोझीच्या आत्म्याने मदत केली’ असं लिहिता येणार नाही. तुला असेच लिहावे लागेल की, ‘तो एक अपघात होता.’

आतापर्यंत अनेक भयपटांमध्ये ‘आत्मा’ हा मानवाला त्रास देताना पाहिलेला आहे. हा पहिला चित्रपट असावा, ज्यात आत्मा दुखावलेला आहे आणि तो दुखावलेल्या व्यक्तींना मदत करतो. ‘जीवनामध्ये तुम्ही आयुष्यभर ज्या गोष्टीला कडाडून विरोध कराल तीच गोष्ट जीवन तुमच्याकडून करून घेते’ या एका ओळीवर आधारलेला ‘तलाश’ आहे आणि याचा अनुभव प्रत्येकाला येत असतो. फक्त आपल्याला आपल्या आयुष्याचं सिंहावलोकन करता यायला हवं.

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)