शिवाजी मंदिरातील ‘चाय पे चर्चा’

>> रजनीश राणे

सचिन तेंडुलकरला आपण अहो-जाहो म्हणतो का? म्हटलं तर पहिल्यांदा जिभेला आणि नंतर कानाला कसंतरीच वाटतं. अर्थात सचिनचा एकेरी उल्लेख करणे यात आदर जेवढा असतो त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रेम असते. आपलेपणा असतो. शिवाजी मंदिरच्या दुसऱ्या मजल्यावरील कॅण्टीनमध्ये चहाची किटली भरणाऱ्या ‘बाळू’चेही तसेच आहे. दादरच्या शिवाजी मंदिरच्या मेकअप रूममध्ये गेली ४० वर्षे हा बाळू ‘चाय पे चर्चा’ करत आहे आणि घडवत आहे. त्याचे पूर्ण नाव बाळू मारुती वासकर. त्याचे आडनाव वासकर आहे हे मलासुद्धा कित्येक वर्षांनी पहिल्यांदाच समजले. शिवाजी मंदिरच्या मेकअप रूममध्ये विंगेत नाही तर तीस बाय चाळीस फुटांच्या प्रोसिनियम थिएटरमध्ये काम करतात ते रंगकर्मी. बाळू मात्र रंगधर्मी आहे.

नाटकाच्या मध्यंतरात कलाकार-तंत्रज्ञांना चहा पाजणे हे त्याचे ‘काम’ असले तरी या मार्गाने रंगभूमीची सेवा करणे हा त्याचा ‘धर्म’ आहे. वयाच्या बाराव्या वर्षी तो कोल्हापूर सोडून मुंबईत आला. तेव्हा शिवाजी पार्क जिमखान्याच्या कॅण्टीनचे कंत्राट लक्ष्मण कदम यांच्याकडे होते. त्यांनी बाळूला कॅण्टीनमध्ये नोकरी दिली. नंतर शिवाजी मंदिरात कॅण्टीन चालवणारे यशवंत नारायण राणे यांनी त्याला उचलले आणि इंटरव्हलमधील चहावाटपाची जबाबदारी त्याच्याकडे सोपवली. तेव्हापासून त्याचा प्रवास दुसरा मजला ते मेकअप रूम असा सुरूच आहे. आता हे कॅण्टीन नाना काळोखे चालवतात. कंत्राटदार बदलले, पण बाळूचा चहा काही बदलला नाही. बाळू हा बदललेल्या मराठी रंगभूमीचा आणि प्रेक्षकांच्या बदललेल्या अभिरूचीचा जिवंत साक्षीदार आहे. डॉ. काशीनाथ घाणेकर त्याला बाळकोबा म्हणून हाक मारायचे, तर यशवंत दत्त त्याचा बंडय़ा म्हणून पुकारा करायचे. आताच्या पिढीतली कलावंत त्याला मामा नाहीतर काका म्हणून हाक मारतात. घाणेकर, शरद तळवलकर, राजा गोसावी, डॉ. श्रीराम लागू, दत्ता भट, बाळ कोल्हटकर यांचा तो ‘खास’ माणूस होता. त्यांनी एक ‘चहावाला’ म्हणून कधीच त्याच्याकडे पाहिले नाही. नव्या पिढीतील सिद्धार्थ जाधव जेव्हा रंगभूमीवर एकदमच नवखा होता तेव्हा त्याने ‘मुलगा वयात येताना’ या नाटकाच्या मध्यंतरात त्याला ‘चहावाला’ अशी हाक मारली होती. तेव्हा रागिणी सामंत या बुजुर्ग अभिनेत्रीने सिद्धार्थला बाळूची ‘खरी’ ओळख सांगितली होती. सिद्धार्थला आपली चूक समजली. तेव्हापासून तो बाळूला ‘काका’ म्हणतो आणि त्यांची दोस्तीही ‘जिगरी’ झाली आहे. हा किस्सा सांगताना बाळू रंगभूमी आणि रंगकर्मींचे ऋणही व्यक्त करतो. त्याच्या मोठय़ा मुलीचे लग्न होतं तेव्हा आर्थिक अडचण निर्माण झाली. साहजिकच आहे, पगार ११-१२ हजार, त्यात दोन मुली आणि एक मुलगा असा संसाराचा गाडा. मुलीचे लग्न करायचे कसे अशा विवंचनेत असतानाच मोहन जोशी, शरद पोंक्षे, रमेश भाटकर, अरुण नलावडे असे अनेक कलाकार आर्थिक मदतीला धावून आले आणि लग्न धूमधडाक्यात झाले. बाळूकाका हा उत्तम नाटय़समीक्षक आहे हे शिवाजी मंदिरातील त्रिकालाबाधीत सत्य आहे. (तथाकथित) समीक्षकांसारखे त्याला ‘हा भूमिकेत शोभून दिसला, नेपथ्य उत्तम होते’ असे काही सांगता येत नाही, पण नाटक चालणार की पडणार हे तो पहिला अंक बघून सांगतो आणि घडतेही तसेच, नाटक पडतेही तसेच. त्याचा रंगभूमीचा अभ्यास नाही. म्हणजे त्याला ग्रीक थिएटर किंवा गेला बाजार एक्सिपिरिमेंटल थिएटर असलं काही ठाऊक नाही, पण त्याला ‘नाटक’ ठाऊक आहे, अगदी पक्कं! त्याला प्रेक्षकांना काय हवे ते माहीत आहे म्हणूनच नाटकाच्या तालमीत त्याला आवर्जून बोलावले जाते, पण तो जात नाही.

नाटक बदलले तसे प्रेक्षकही बदललेत असे त्याचे प्रामाणिक मत आहे. पूर्वी लेखक, नाटय़संस्था आणि कलाकार यांच्या जिवावर नाटके चालायची. चंद्रलेखा, कलावैभव अशा संस्था होत्या. तेव्हा तिकीट मिळविण्यासाठी झुंबड व्हायची. काहीजण रात्रीच येऊन शिवाजी मंदिरच्या गेटवर पथारी पसरायचे. आता स्थितीच बदलली. नाटकाचे पहिल्या दिवशी बुकिंग होताना कठीणच बनले आहे. जमाना ऑनलाइन बुकिंगचा आहे, अशी खंत बाळू व्यक्त करतो. आता प्रेक्षक नाटक नाही तर ‘सेलिब्रिटी’ बघायला येतात अशी टिप्पणी करताना त्याच्यातील ‘समीक्षक’ डोकावतो. पूर्वीचे कलाकार रंगभूमीची ‘सेवा’ करायचे. आताच्या पिढीतील कलाकारांमध्ये तसे काही दिसत नाही. टीव्ही मालिकांच्या शूटिंगमधून वेळ काढणार आणि नाटक करणार. मग कसली आलीय सेवा? हा त्याचा खंतावलेला प्रश्न आहे.

काहीही असले तरी बाळू हा तमाम नाटकवाल्यांचा सुपरस्टार आहे. म्हणूनच सुधीर भट यांनी दोन-तीन वर्षांपूर्वी त्याचा शिवाजी मंदिरात सर्व कलाकारांच्या उपस्थितीत जंगी सत्कार केला होता आणि त्याला एक लाखांची थैलीही दिली होती. अनंत भालेकर यांनी तेव्हा सगळा भार उचलला होता. काशीनाथ घाणेकर पुरस्कार, आनंद अभ्यंकर पुरस्कार, झी नाटय़ गौरव असे सन्मानाचे पुरस्कार बाळूला मिळाले आहेत. त्यावरून बाळू काय चीज आहे याचा अंदाज यावा. अण्णा सावंत, भालचंद्र चव्हाण आणि इतर विश्वस्तांनी शिवाजी मंदिरचे सर्व दरवाजे माझ्यासाठी सताड उघडे ठेवले होते. म्हणूनच मला रंगमंच सोडून सर्व ठिकाणी ‘एन्ट्री’ करता आली असे तो आवर्जून सांगतो. बाळू हे खरेच अजब रसायन आहे. त्याला सर्व सेलिब्रिटी ओळखतात, त्याच्या खांद्यावर हात ठेवून गप्पाही मारतात, पण बाळू मात्र आजही गरीबच आहे… परिस्थितीने आणि स्वभावानेही!

शिवाजी मंदिरला नाटक बघायला गेलात तर भरत जाधवसाठी टाळ्या वाजवताना त्यातील एक टाळी बाळूसाठीही वाजवा. जमलंच तर त्याला भेटा, त्याच्यासोबत सेल्फीही काढा… कारण तोच खरा रंगभूमीवरील सेलिब्रिटी आहे… मजा येईल!

– rajanishrane@gmail.com