ऑस्कर अंदाज व निकाल

75

>> संतोष पाठारे

ऑस्कर पुरस्कार कोणाला मिळणार यावर ते पुरस्कार जाहीर होईपर्यंत चर्चा रंगत असतात. यावेळी मुख्य स्पर्धा होती ती ‘द शेप ऑफ वॉटर’, ‘द पोस्ट’, ‘डंकर्क’ आणि ‘थ्री बिलबोर्डस् आऊटसाइड एबिंग’, ‘मिसुरी’ या चित्रपटांमध्ये. मात्र शेवटी बाजी मारली ‘द शेप ऑफ वॉटर’ने…

ऍण्ड ऑस्कर गोज् टू…’ या वाक्यातील उत्कंठता हॉलीवूडच्या चित्रपटांवर प्रेम करणारे जगातील तमाम रसिक प्रेक्षक दरवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात अनुभवत असतात. भारतीय चित्रपटांना जाहीर होणारे राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर ऍवॉर्डस् या सर्वांपेक्षाही ऑस्कर पुरस्काराचं महत्त्व (थोडंसं अवाजवीच!) चित्रपटप्रेमींना अधिक वाटतं ही वस्तुस्थिती आहे. हॉलीवूडच्या चित्रपटांची मोहिनी आपल्या प्रेक्षकांवर गेल्या शंभर वर्षांपासून आहे. जागतिक सिनेमा म्हणजे हॉलीवूडचा सिनेमा असा एक गैरसमजही सर्वसामान्य प्रेक्षकांमध्ये आहे. हिंदुस्थानातील हिंदी व प्रादेशिक चित्रपटकर्त्यांमध्ये आपल्या चित्रपटाने ऑस्कर मिळवावं अशी सुप्त इच्छा असतेच! सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपटांच्या नामांकनामध्ये आशुतोष गोवारीकरांच्या ‘लगान’ने अंतिम फेरीत मिळवलेलं स्थान व संदीप सावंत यांच्या ‘श्वास’ची हिंदुस्थानतर्फे ऑस्कर मानांकनासाठी झालेली निवड यामुळे आपल्याकडील चित्रपटकर्त्यांच्या ऑस्कर अपेक्षा वाढीस लागलेल्या आहेत हे खरं; पण ऑस्कर पुरस्कार हे केवळ हॉलीवूडमध्ये निर्माण होणाऱया (प्रामुख्याने) व्यावसायिक चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी असलेले खासगी पुरस्कार आहेत याची जाणीव बहुतांशी प्रेक्षकांना नसते.

यंदाच्या ऑस्कर पुरस्कारामध्ये मुख्य स्पर्धा होती ती गिआर्मो डेल टोरोचा ‘द शेप ऑफ वॉटर’, स्टिव्हन स्पिलबर्गचा ‘द पोस्ट’, ख्रिस्तोफर नोलनचा ‘डंकर्क’ आणि मार्टिन डक्डोनाच्या ‘थ्री बिलबोर्डस् आऊटसाइड एबिंग’, ‘मिसुरी’ या चित्रपटांमध्ये. या सर्व चित्रपटांचे विषय वेगवेगळे होते, त्यांची कथनशैली वेगळी आणि नावीन्यपूर्ण होती. या सर्वांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट व दिग्दर्शनाचा पुरस्कार गिआर्मो डेल टोरोच्या ‘द शेप ऑफ वॉटर’ने पटकावला. ‘पॅन्स लॅबिरिन्थ’ या चित्रपटामुळे जगभरात प्रसिद्ध झालेल्या गिआर्मो डेल टोरोचा हा पहिलाच ऑस्कर पुरस्कार आहे.

वास्तव आणि अद्भुत यांचा अपूर्व मेळ घालण्याची गिआर्मो डेल टोरो याची हातोटी प्रशंसनीय आहे. ‘द शेप ऑफ वॉटर’मध्ये त्यांचं हे कौशल्य ठळकपणे जाणवतं. हा चित्रपट म्हणजे साधी सरळ प्रेमकथा आहे; पण हे प्रेम आहे मुकी असलेली इलायजा (सॅली हॉकिन्स) आणि अमानवी अँसेट (डक जोन्स) या दोन वेगवेगळय़ा जगात वावरणाऱयाचं! या प्रेमकथेला अमेरिका व रशिया यांच्यातील शीतयुद्धाची पार्श्वभूमी आहे. अमेरिकेतील एका गुप्त ठिकाणी असलेल्या सरायन प्रयोगशाळेतील साफसफाईचं काम करणारी इलायजा व त्या प्रयोगशाळेत प्रयोग करण्यासाठी आणलेला अँसेट हा केवळ पाण्यात जगू शकणारा अमानवी अँसेट यांच्यात निर्माण झालेल्या अनुबंधाची रोमॅंटिक कथा आपल्याला ‘द शेप ऑफ वॉटर’मध्ये पाहायला मिळते. पण या कथेला तत्कालीन राजकीय संदर्भ आहेतच आणि दुर्बल सुष्ट व बलवान दुष्ट यांच्यातील संघर्षाचीदेखील जोड आहे. या कथेची दिग्दर्शकाने केलेली वैशिष्टय़पूर्ण हाताळणी, त्याला अनुरूप अशी वातावरण निर्मिती व संगीत यामुळे ‘द शेप ऑफ वॉटर’ने सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन, संगीत व प्रॉडक्शन डिझाइन हे चार ऑस्कर पुरस्कार पटकावले.‘द शेप ऑफ वॉटर’ला सर्वाधिक टक्कर देणारा चित्रपट होता मार्टिन डक्डोनाचा थ्री बिलबोर्डस् आऊट साइड एबिंग, मिसुरी! सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठी नामांकन असलेल्या या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे नामांकन नव्हते ही आश्चर्य व खेदाचीच बाब होती. बलात्कारानंतर हत्या झालेल्या मुलीच्या आईने न्यायासाठी पोलीस यंत्रणेला दिलेले आव्हान असे आशयसूत्र असलेला हा चित्रपट ऑस्कर विनर असणार हा अंदाज खोटा ठरला; मात्र त्यातील प्रमुख भूमिकेसाठी फ्रान्सेस मँकडॉरमण्ड या अभिनेत्रीला मिळालेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार तिच्या अभिनयाला सलामी देणारा ठरला. मेरिल स्ट्रीप (द पोस्ट) आणि सॅली हॉकिन्स (द शेप ऑफ वॉटर) या अभिनेत्री स्पर्धेत असूनही फ्रान्सेस मॅकडॉरमण्डने हा पुरस्कार पटकावला. यातूनच त्या व्यक्तिरेखेचं सामर्थ्य अधोरेखित होतं. सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्यासाठी याच चित्रपटातील दोन अभिनेते वूडी हॅरेलसन आणि सँम रॉकवेल यांना नामांकन मिळणं ही बाबदेखील यंदाच्या ऑस्कर स्पर्धेतील वैशिष्टय़पूर्ण म्हणायला हवी. गरम डोक्याचा, आततायी वृत्तीचा पोलीस अधिकारी जॅक्सन डिक्सनचे पात्र उभे करणाऱया सॅम रॉकवेलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. सूडकथा असूनही व्यवस्थेतील माणसांची अंतरंग उलगडून दाखवणारा, उत्तम पटकथेने व दर्जेदार अभिनयाने खिळवून ठेवणारा ‘थ्री बिलबोर्ड आऊटसाइड एबिंग’, ‘मिसुरी’ या चित्रपटाला केवळ दोन ऑस्कर पुरस्कारांवर समाधान मानावे लागले तरीही तो या वर्षीच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे हे निर्विवाद!

तीन वेळा सर्वोत्कृष्ट अभिनयाचं ऑस्कर ऍवॉर्ड पटकावणाऱया डॅनियल डे लुईस या अभिनेत्याची भूमिका असणाऱया फॅण्टम थ्रेडला केवळ सर्वोत्कृष्ट वेशभूषा (मार्क ब्रिजेस्) या पुरस्कारावर समाधान मानावे लागलं. पन्नासच्या दशकातील लंडनमधील फॅशन डिझाईनर रेनॉल्ड वुडकॉकची व्यक्तिरेखा डॅनियल डे लुईसने रंगवली होती. पण यावेळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान गॅरी ओल्डमनने त्याच्या डार्केस्ट अवरमधील विन्स्टन चर्चिलच्या भूमिकेसाठी मिळवला.

ऑस्कर पुरस्कार कोणाला मिळणार यावर ते पुरस्कार जाहीर होईपर्यंत चर्चा रंगत असतात. गेल्या वर्षी ‘ला ला लॅण्ड’ऐवजी ‘मूनलाइट’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मिळालेला पुरस्कार अनेकांसाठी धक्कादायक ठरला होता. यावेळीसुद्धा मेमेन्टो, इन्सेप्शन, इन्टरस्टेलर देणाऱ्या ख्रिस्तोफर नोलनच्या ‘डंकर्क’कडून व ‘ज्युरासिक पार्क’ ते ‘शिंडलर्स लिस्ट’सारखे वैविध्यपूर्ण चित्रपट देणाऱया स्टिव्हन स्पिलबर्गच्या ‘द पोस्ट’कडून त्यांच्या चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या.

देशाच्या राजकीय व्यवस्थेमध्ये निर्भिड पत्रकारितेचं महत्त्व अधोरेखित करणारा ‘द पोस्ट’ व फ्रान्समधील डंकर्कच्या किनाऱयावर फ्रेंच आणि ब्रिटिश सैन्याची जर्मन सैन्याने कोंडी केल्यानंतर त्यांची सुटका करण्याचे झालेले प्रयत्न चित्रित करणारा ‘डंकर्क’ हे दोन्ही चित्रपट उल्लेखनीय असले तरीही त्यांना ऑस्कर स्पर्धेतील महत्त्वाचे पुरस्कार मिळाले नाहीत. डंकर्कच्या किनाऱयावरील एक आठवडा, एक दिवस व एक तास अशा काळाचे तुकडे जोडणाऱ्या पुरस्कारांनी चाहत्यांचे अंदाज अगदीच चुकवले नाहीत. गिआर्मो डेल टोरो, फ्रान्सेस मॅकडॉरमण्ड, सॅम रॉकवेल, गॅरी ओल्डमन यांच्या कामाचा योग्य तो सन्मान झाला याचा आनंद आहेच आणि पुढच्या वर्षीच्या ऑस्करची उत्सुकताही सुरू झाली आहे.

(लेखक प्रभात चित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या