नाकातील गाठी अन् आयुर्वेदीय चिकित्सा

>> वैद्य सत्यव्रत नानल

नाकाच्या आत गाठ? होय. हा प्रकार अनेकांना होतो, पण पटकन लक्षातच येत नाही. ज्यांना समजतो त्यांना त्यावर काहीही इलाज नाही असे सांगितले जाते. वाढलेल्या गाठी कापून टाकणे हाच एक सल्ला असतो, तोही आवश्यकता असेल तरच ईएनटी सर्जन्स देतात. लहान मुलांपासून ते मोठय़ा माणसांपर्यंत सर्वांना अशा गाठी नाकात आढळतात. या गाठी म्हणजे काय, हा रोग आहे का, या गाठी का तयार होतात आणि त्यावर नेमके उपचार कोणते यावर आयुर्वेद काय म्हणतो ते आपण आज पाहू या…

कोणतीही गाठ म्हणजे कॅन्सर असा एक समज आहे. पण तो चुकीचा आहे. नाकातील गाठी म्हणजे नाकपुडीच्या आत मांसाची वाढ होत जाते. त्यामुळे श्वास घेताना हवाच शिरत नाही. अपूर्ण श्वास घेत गेल्यामुळे मग पुढे जाऊन त्रास सुरू होतात.

हा रोग नसून शरीरात होणाऱया इतर चुकीच्या घडामोडींचा एक परिणाम आहे. यामागे मोठे कारण म्हणजे वारंवार सर्दी होणे. अतिरिक्त कफ तयार झाला तर तो शरीरात छातीपासून ते डोक्यापर्यंतच्या भागात साठतो. या साठलेल्या कफामुळे या भागातील रक्ताभिसरणात अडथळा निर्माण होतो. अवयवांना रक्तपुरवठा कमी होते आणि मग विविध आजार निर्माण होतात, असे आयुर्वेद सांगतो. याचपैकी एक म्हणजे नाकाच्या आत मांसाच्या गाठी वाढणे. यांना संस्कृतमध्ये नासार्श आणि इंग्रजीत नेझल पॉलीप म्हणतात.

हे आहेत दुष्परिणाम…

पॉलीप वाढल्याने नाकाच्या मधील हाडावरही दाब वाढतो. नाकाचे हाड वाकडे होते. त्यामुळे नाकाचा आकारही बदलतो. या सर्वांमागे सर्दी वारंवार होणे हे फार मोठे कारण आहे. मुलांमध्ये याचे प्रमाण भरपूर दिसते. असे झाल्यास अपूर्ण श्वास घेतल्याने ताकद कमी होते. मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासावर याचा वाईट परिणाम होतो. सवयी बदला आणि आरोग्य टिकवा, नेझल पॉलीपपासून स्वतःला दूर ठेवा.

नाकात पॉलीप वाढणे, सायनस बंद होणे, अपूर्ण श्वास, दम लागणे, चक्कर येणे, डोकेदुखी, डोळय़ांचे रोग, चष्मा लागणे, कानाचे रोग असे अनेक प्रकार यामध्ये मोडतात.

 उपाय काय?

या गाठी नाकात एका रात्रीत तयार होत नाहीत. हळूहळू मोठय़ा होत जातात. त्यामुळे त्यावरील उपचार विविध पद्धतीने करावे लागतात. त्या गोष्टी खालीलप्रमाणे-

  • रोज सकाळी दात घासण्यापूर्वी जीभ साफ करावी. जीभ साफ करून एक कोरडा उम्हासा येईल असे पहावे. त्याने घशामध्ये रात्रभर साठलेला कफ, लाळ वगैरे सर्व बाहेर काढता येते. दात घासताना कडू, तिखट किंवा तुरट पदार्थांचा वापर करावा. जसे गुळवेल, कडुलिंब, खैर यांपैकी कोणत्याही वनस्पतीची करंगळी एवढी लांब काडी वापरता येते.
  • दात धुतल्यावर हळद, मीठ आणि गरम पाण्याने रोज गुळण्या कराव्यात.
  • पंचकर्म प्रकारांपैकी काही प्रकार घरीच रोज करता येतात. त्यापैकी एक म्हणजे प्रतिमर्ष नस्य. यामध्ये तूप, तीळ तेल, राई तेल यापैकी एक प्रकार घेऊन तीन-तीन थेंब प्रत्येक नाकपुडीतून आतून हळुवारपणे जिरवावा आणि प्रत्येक थेंबानंतर पाचवेळा दीर्घ श्वसन करावे. एका नाकपुडीतून थेंब लावून दीर्घ श्वास घ्यावा आणि सावकाशपणे तोंडाने सोडावा. याने सर्व अवयवांचे, इंद्रियांचे पोषण होते आणि नाकपुडीमध्ये पॉलीपचा आकारही कमी होतो.
  • दही, केळी, सीताफळ, पेरू, स्ट्रॉबेरी, ब्लू बेरी, रास्पबरी अशी सर्व कहारी आंबट फळे खाणे बंद करावे. तळलेले मासे नियमित खाऊ नयेत.
  • पॉलीपसाठी सर्जरी करणे हा उपाय अशाच वेळी विचारात घ्यावा. जिथे त्यांच्यामुळे नाक आतून पूर्ण व्याप्त आहे आणि त्यामुळे श्वास अडून थोडय़ाशा कष्टानेदेखील दम लागत असेल. मग मात्र सर्जरी करून वाढलेले पॉलीप कापून टाकावेत आणि नंतर ते पुन्हा वाढू नयेत म्हणून वरील सांगितलेले सर्व प्रकार करायला सुरुवात करावी.

 [email protected]