विशेष – ऑस्ट्रेलियाचं अनुकरणीय पाऊल

>> शहाजी शिंदे

समाज माध्यमांचा उदय झाल्यानंतर त्यांची उपयुक्तता आणि फायदे लोकांच्या चटकन लक्षात आल्याने त्यांचा प्रसार आणि पसारा पाहता पाहता वाढत गेला. कोरोना महामारीच्या काळात लहान मुले मोबाइल आणि सोशल मीडियाशी घट्ट चिकटली गेली. त्यामुळे मुलांचा क्रीनटाईम वाढून डोळ्यांचे तर नुकसान होत आहेच; पण कुणाचेच नियंत्रण नसलेल्या या महासागरात असंख्य प्रकारची चुकीची माहिती, बीभत्स गोष्टी मुलांसमोर येत आहेत. यातून मुलांची आकलन शक्ती कमी होण्याबरोबरच कौटुंबिक सुसंवाद, सामाजिक संबंध हरपत चालले आहेत. अलीकडेच ऑस्ट्रेलियाने अशाच काही संकटांची-समस्यांची दखल घेत 16 वर्षांखालील मुलांना समाज माध्यमे वापरण्यावर बंदी आणणार असल्याची घोषणा केली आहे. हा निर्णय योग्य आहे की अयोग्य?

आास्ट्रेलियन सरकारने 16 वर्षांखालील किशोरवयीन मुलांना सोशल मीडियाच्या वापरावर घातलेल्या बंदीचा निर्णय जगभरात चर्चिला जात आहे. या निर्णयावर जगभरात विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. ऑस्ट्रेलियन सरकारने हा कायदा पारीत केल्यानंतर ऑस्ट्रेलियन मुले इन्स्टाग्राम, टिकटॉक, फेसबुक आणि एक्स यांचा वापर करू शकणार नाहीत. मुलांमध्ये वाढत चाललेला हिंसाचार आणि गुन्हेगारी वृत्ती तसेच सायबर बुलिंगसारख्या प्रकारापासून संरक्षण देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे तेथील सरकारचे म्हणणे आहे. मुलांमधील मोबाइलच्या व्यसनामुळे समाजाची मोठी हानी होत असल्याचे ऑस्ट्रेलियन सरकारचे मत असून केवळ त्या देशातीलच नव्हे, तर जगभरातील लाखो-करोडो जणांनी याला सहमती दर्शवली आहे. सोशल मीडियाचा अमर्याद वापर मुलांना हिंसक बनवत आहे. त्यांच्या वर्तणुकीत खूप मोठा फरक होत आहे. एकीकडे लहान मुलांमध्ये गुन्हेगारीची प्रवृत्ती वाढत आहे, तर दुसरीकडे सोशल मीडियाच्या सततच्या वापरामुळे बालिका आणि किशोरवयीन मुलींच्या वर्तणुकीतही फरक पडला आहे. सोशल मीडियावरील हिंसाचार, आक्रमकता, अश्लीलता आणि ब्लॅकमेलिंगला बळी पडलेल्या मुली बहुतांशी गप्प राहतात. त्यामुळे केवळ त्यांच्या अभ्यासावरच परिणाम होत नसून व्यक्तिमत्त्वावरही प्रतिकूल परिणाम होत असल्याचे मत ऑस्ट्रेलियन सरकारने मांडले आहे. त्यानुसार त्यांचा सोशल मीडियावरील प्रवेश बंद केला नाही तर भविष्यात या पिढीचे मोठे नुकसान होईल, अशी भीतीही व्यक्त केली आहे.
असे असले तरी ऑस्ट्रेलियन समाजातील एक घटक या बंदीच्या विरोधात आहे. डिजिटल कम्युनिकेशनच्या या युगात सोशल मीडियावर बंदी घातल्यास त्याचा प्रतिगामी परिणाम होऊ शकतो, असे त्यांचे मत आहे. कोरोनाच्या काळात शिक्षणात सोशल मीडियाने मोठी भूमिका बजावली. आताही काही प्रमाणात शाळांमध्ये मोबाइल फोनचा वापर अभ्यासासाठी आणि शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी केला जातो. अशा स्थितीत लहान मुले आणि किशोरवयीन मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवल्यास नुकसान होईल, असाही युक्तिवाद केला जात आहे. आजच्या डिजिटल युगात ही मुले सोशल मीडियापासून लांब राहिल्यास भविष्यात आत्मविश्वासाने राहू शकणार नाहीत, असा या गटाचा दावा आहे. यापूर्वी मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचे युरोपियन युनियनचे प्रयत्न अपयशी ठरले होते. कारण टेक कंपन्यांनी त्याला विरोध केला होता.

ऑस्ट्रेलियन सरकारचे म्हणणे आहे की, कायदा बनल्यानंतर त्याचे उल्लंघन करणाऱया मुलांना शिक्षा ठोठावण्यात येईल, पण प्रश्न असा आहे की, मुले आणि किशोरवयीन मुले कायद्याचे उल्लंघन करत आहेत हे कसे कळणार? कारण आज बहुतांश मुले आपल्या पालकांच्या नावाने लॉगइन होऊन सोशल मीडियाची मुशाफिरी करतात. तसेच या निर्णयाला बगल द्यायचीच झाली आणि पालकांची त्याला संमती असेल तर घरातील प्रौढ व्यक्तींच्या नावाने सोशल मीडिया अकाऊंट सुरू करून मुले ते वापरू शकतात.

ऑस्ट्रेलियन सरकारच्या या प्रस्तावाचे हिंदुस्थानात अनेक पालकांनी स्वागत केले आहे. इन्स्टाग्राम, यूटय़ूब आणि एक्सच्या व्यसनामुळे मुले आणि किशोरवयीन मुलांच्या मानसिक विकासावर आणि निर्णय क्षमतेवर परिणाम होत असल्याचे त्यांचे मत आहे. सोशल मीडियाचा सर्वात वाईट परिणाम किशोर आणि तरुणांवर होत आहे यात शंकाच नाही. सोशल मीडिया मुलांच्या आणि किशोरवयीनांच्या वर्तनावर आणि विचारांवर कसा प्रभाव पाडत आहे याबद्दल अनेक अहवाल आले आहेत. सोशल मीडियाच्या सततच्या वापरामुळे मुले हिंसक, चिडखोर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीची बनत आहेत. रील्स बनवून यूटय़ूबवर अपलोड करण्याचे व्यसन किती घातक आहे, हे रील्स बनवताना होणाऱया अपघातांवरून दिसून येते. या वेळी छठपूजेच्या दिवशी नद्यांच्या काठावर रील्स बनवताना अनेक तरुण बुडाल्याची घटना घडली.

आज मुळातच मोबाइल हे व्यसन बनले आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत तरुण-तरुणींचे डोळे मोबाइलवर चिकटलेले असतात. घरातील मुलं तर मोबाइलशिवाय जेवायलाही नकार देतात, ही लाखो पालकांची तक्रार आहे. आई-वडील त्यांच्यासमोर हतबल आणि असहाय्य दिसतात, पण सोशल मीडियावरून प्रसारित होणारी हिंसाचाराची दृश्ये आणि अश्लील व्हिडीओ यामुळे अनेक जटिल प्रश्न उद्भवत आहेत.

हिंदुस्थानात शहरांमधील विभक्त कुटुंबातील मुलांना मोबाइल आणि सोशल मीडियावर सहज प्रवेश असतो. कारण नोकरी करणारे पालक असल्याने त्यांची ती गरज बनून गेलेली असते, पण आपली मुलं काय पाहत आहेत आणि शिकत आहेत याचा मागोवा ठेवण्याचे कष्टही अनेक पालक घेत नाहीत. मोबाइल आणि सोशल मीडियाचा प्रभाव फक्त शहरांमध्येच मुलांवर होत आहे असे नाही. ग्रामीण भागातील मुले आणि किशोरवयीन मुलांमध्येही याचा प्रसार झाला आहे. खेडय़ापाडय़ांतील किशोरवयीन मुलींनाही मोबाइल आणि सोशल मीडियाचे व्यसन लागले आहे. पैसे कमावण्यासाठी बाहेर पडणारे बरेच लोक त्यांच्या बायकोला त्यांच्याशी बोलण्यासाठी अँड्रॉईड फोन देतात, पण त्यांच्याकडून तो स्मार्टफोन लहान मुलांच्या हातात पडतो आणि पाहता पाहता मुलाला त्याचे व्यसन जडून जाते. अनेक वेळा रडणाऱया मुलांना शांत करण्यासाठी पालक त्यांना मोबाइल देतात. मुलांच्या मोबाइलच्या व्यसनामुळे अनेक पालक नैराश्यात जातात. मुलांना यापासून दूर ठेवण्यासाठी काय करावे हे त्यांना समजत नाही.

राष्ट्रीय बाल सुरक्षा आयोगाने मध्यंतरी केलेल्या सर्वेक्षणांती पालकांकडून लहान मुलांना दिला जाणारा मोबाइल त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतो असे निरीक्षण नोंदवले होते. आयोगाच्या मते, देशातील केवळ दहा वर्षांची मुलंदेखील इन्स्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅटसारख्या सोशल मीडियावर अकाऊंट तयार करत आहेत. देशातील सहा राज्यांत केल्या गेलेल्या सर्व्हेनुसार, 10 वर्षे वयोगटातील 38 टक्के मुलांचं फेसबुकवर आणि 24 टक्के मुलांचं इन्स्टाग्रामवर अकाऊंट आहे. लाखो मुलं स्मार्टफोनच्या अधीन झाली असून त्यांना सोशल मीडियावर वेळ घालवण्याची सवयच लागली आहे. या सर्व्हेमध्ये दिल्ली, हैदराबाद, मुंबई, भुवनेश्वर, रांची आणि गुवाहाटीसारखी शहरं सामील होती. सर्व्हेमध्ये 8 ते 18 वर्षांतील 30.2 टक्के मुलांकडे आधीपासूनच स्मार्टफोन असल्याचे समोर आले. तसेच अनेक मुलांनी आपल्या आई-वडिलांच्या फोनवरून सोशल मीडिया अकाऊंट बनवल्याची माहितीही उघड झाली. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर अकाऊंट ओपन करण्यासाठी कमीत कमी 13 वर्षे वयाची मर्यादा आहे, परंतु अनेकांचं वयाच्या दहाव्या वर्षीच सोशल मीडिया अकाऊंट आहे. यावरून मुलांमधील सोशल मीडियाप्रेम कोणत्या पातळीवर पोहोचले आहे याची कल्पना येते.

आज सातवी-आठवीच्या मुलांचे व्हॉटसअॅपवर ग्रुप्स आहेत आणि तेथे ही मुले-मुली कसल्याही विषयावर चर्चा करत असतात. यामध्ये अगदी प्रपोज करण्यापासून ते लैंगिक विषयांचा समावेश असतो. पालकांनी चुकून जरी त्यामध्ये लक्ष घातल्यास मुले क्षणार्धात हिंसक बनतात. इतकेच नव्हे, तर अशा ग्रुप्सना पासवर्ड टाकून लॉक करण्याची क्लृप्तीही मुलांना अवगत आहे. अप्रगल्भ वयात घडणाऱया या गोष्टी कदाचित त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱया ठरू शकतात याची सुतराम कल्पनाही त्या बिचाऱयांना नसते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोशल मीडियावर रील्स पाहण्यात तासन्तास वेळ घालवणाऱया मुलामुलींचा कुटुंबाशी संवादच हरपत चालला आहे. घरामध्ये आजी-आजोबा, बहीण-भाऊ, आईवडील सर्व जण असले तरी मुले मोबाइल घेऊन एकटीच बसलेली असतात. यातून निर्माण होणाऱया कौटुंबिक दुरावलेपणामुळे, एकाकीपणामुळे मुलांमधील उत्साह पातळी कमी होत चालली असून नैराश्य येण्याचे प्रमाण वाढले आहे.

ही सर्व वस्तुस्थिती लक्षात घेता मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी सोशल मीडियावर पूर्णपणे बंदी घालण्याचा ऑस्ट्रेलियन सरकारचा निर्णय चुकीचा कसा म्हणता येईल? आज ऑस्ट्रेलियाच नव्हे, तर अमेरिकेसह अनेक देशांमध्ये लहान मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी आणण्याच्या प्रयत्नात आहेत ते उगीच नाही !
(संगणक प्रणाली तज्ञ आहेत)