फुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू!

>> शिरीष कणेकर

आमच्या ‘भाटिया ए’ बिल्डिंगमधील पोरंटोरं किंवा म्हातारेकोतारे ‘भाटिया बी’ बिल्डिंगमधल्या पोराटोरांशी किंवा म्हाताऱ्याकोताऱ्यांशी मधल्या चौकात कचकड्याचा बॉल व प्लॅस्टिकच्या बॅटने खेळत असले आणि हा सामना टीव्हीवर दाखवत असले तर मी खुर्चीला गोंद लावल्यागत चिकटून बसून एकटक बघत बसेन. गॅस बंद करायलादेखील उठणार नाही. वाजू देत कुकरच्या शिट्टय़ा. रांधा, वाढा, उष्टी काढा एवढाच माझ्या जीवनाला अर्थ आहे का? क्रिकेटचं वेड म्हणायचं की काय? कुलदीप यादवनं अप्रतिम गुगलीवर फलंदाजाची दांडी गुल केली आणि त्याच क्षणी यमाचं बोलावणं आलं तर मी कातावून त्याला म्हणेन, ‘‘थांब ना एक मिनिट बाबा, तेवढा ‘अॅक्शन रिप्ले’ बघतो; मग निघायचंच आहे.’’

क्रिकेट प्राणप्रिय नसलेला मी स्वतःला आठवतच नाही. ब्रॅडमन-बिडमनच्या गोष्टी मी समवयीन मुलांत अशा सांगायचो (पक्षी – फेकायचो) की, जणू ब्रॅडमन आमच्याच मजल्यावर राहत होता आणि त्याचा मुलगा जॉन आणि मी जणू लंगोटीयार होतो. बाय द वे, कायम हात धुऊन मागे लागलेल्या ‘ब्रॅडमन’ या आडनावाला विटून जॉननं आपलं आडनाव ‘ब्रॅडसन’ असं बदलून घेतलं होतं. माझा मुलगा आडनाव कधी बदलतोय याची मी वाट बघतोय. माझी लोकप्रियता ब्रॅडमनपेक्षा कमी तर भरत नसेल? बंडलबाजी एवढी रक्तात असल्यावर मी क्रिकेट-समीक्षक नसतो झालो तरच नवल.

माझा मुलगा म्हणतो की, पपा सामन्याचा प्रत्येक बॉल बघतात व नंतर रात्री हायलाइटस्ही तेवढेच आसूसून बघतात. टीव्ही अधूनमधून आपले जुने सामने दाखवतात. तेही मी प्रथमच बघत असल्यागत बघतो. त्यातून ते आपण जिंकलेले सामनेच दाखवत असल्यामुळे पाहिल्यावर निराशा पदरी येण्याची शक्यताच नसते. आता इंग्लंडमध्ये आपण चार कसोटी सामने हरलो व एकच जिंकलो. तोच परत परत दाखवतात. बाकी कोणी सांभाळत नसेल, पण टीव्हीवाले आपल्या भावना कशा सांभाळतात पहा. आधुनिक तंत्रज्ञान वापरून आता त्यांनी आयडियाबाजी करून आपण हरलेले सामनेदेखील जिंकलेले करून दाखवावेत. वेस्ट इंडीजविरुद्ध राजकोटच्या पहिल्या कसोटीत आपण 649 धावांचा डोंगर उभा केला त्यात के. एल. राहुलनं भोपळा काढला, त्यानं द्विशतक ठोकलं असं नाही दाखवता येणार?

हिंदी चित्रपटांप्रमाणेच क्रिकेट हा असा विषय आहे की, ज्यात सगळय़ांना सगळं कळतं. सुरुवातीची काही वर्षे या दोनच विषयांवर मी वॉशिंग्टनच्या कुऱहाडीसारखी लेखणी चालवीत असल्यानं माझी फारच गोची व्हायची. म्हणजे कुठंही पाऊल टाकलं तरी ते हटकून कुणाच्या तरी शेपटीवर पडायचं. पुढे पुढे मला असं वाटायला लागलं की, अनिल धवन व पार्थसारथी शर्मा यांनाही फॅन्स असू शकतात की काय? आज अनिल धवनला ते सेटवरही येऊ देणार नाहीत आणि पार्थसारथी शर्माला मॅच बघायलाही आत सोडणार नाहीत. अन् ‘वक्त का तकाजा’ म्हणून आम्हाला त्याच्यावर लिहावं लागायचं (आणि तुम्हाला वाचायला लागायचं. चला, एकमेकांविषयी सहानुभूती बाळगू या). साठ साली (आईचा घो! म्हणजे अठ्ठावन्न वर्षांपूर्वी उम्रीगर व मांजरेकर – संजयचे बाबा – या हिंदुस्थानच्या सर्वोत्कृष्ट जोडीनं पाकिस्तानविरुद्ध ब्रेबॉर्न स्टेडियमवर सबंध दिवसाच्या खेळात 150 धावा काढल्या होत्या. मी स्टेडियममध्ये डुलक्या काढत होतोच, पण अंपायरही झोपले असावेत अशी मला दाट शंका आहे. तो एक टुकूटुकू खेळण्याचा काळ होता आणि आता हा काळ आलाय जेव्हा रोहित शर्मा व ऋषभ पंत मारत सुटतात. तो एक काळ होता जेव्हा रामचंद्र, अबीद अली व एकनाथ सोलकर नवा चेंडू घ्यायचे आणि आता असा काळ आहे की, वेगवान गोलंदाजांचा आपल्याकडे ताफा आहे. बोलो बोलो, कुछ तो बोलो…

माझं क्रिकेटवरचं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. सामना चालू असताना कोणी आलं किंवा फोनवरून अघळपघळ बोलायला लागलं की, मला ‘भ’च्या बाराखडीतल्या शिव्या द्याव्याशा वाटतात. क्रिकेटवरचं लेखन मात्र खूपच कमी झालंय. झाला सामना की, खरडा काहीतरी हे मला जाचक वाटायला लागलंय. आय हॅव कम अ लाँग वे बेबी. तीच गोष्ट ‘यादों की बारात’सारख्या लोकप्रिय सदराची. त्या काळात अनोळखी माणसं रस्त्यातही विचारायची – ‘‘पुढल्या रविवारी कोणावर आहे?’’ आजही अमिताभ ते अनुपम खेर, परेश रावल ते ओम पुरी, शबाना ते स्मिता पाटील, अरुणा इराणी ते देवेन वर्मा अशा अनेक गुणवंतांवर ‘यादों की बारात’ लिहिणे अतिशय सोपं आहे (मदतीला ‘गुगल’ही आहे. तेव्हा नव्हतं), पण पुन्हा तेच. मी ते मागे टाकलंय. मी खूप पुढे निघून आलोय. तेच तेच करण्यात मला रस नाही. वेगळेपण मला जमतंय की नाही, वाचकांनी ठरवायचंय.

मैं अकेला चला था जानिबे मंजिल मगर
लोग साथ आते गये कारवाँ बनता गया

क्रिकेटवरून आठवलं. माझी बालपणीची ब्रॅडमनविषयीची लोणकढी आमच्याच जे. जे. हॉस्पिटलच्या कंपाऊंडच्या टीममध्ये सॉलिड खपली होती. मोहनला मात्र बरेच प्रश्न पडले होते. त्यानं मला विचारलं, ‘‘पण, ब्रॅडमन इतक्या रन्स कसा काढायचा?’

‘‘सांगतो’’ मी त्याला कोपऱयात नेऊन कुजबुजल्या आवाजात म्हणालो, ‘‘कुठे बोलू मात्र नकोस. अरे, ब्रॅडमननं आफ्रिकेतून एक सुरमा आणला होता. तो डोळय़ात घालून ब्रॅडमन फलंदाजीला उतरला व त्यानं गोलंदाजाच्या डोळय़ात पाहिले की, त्याच्या हातून फुलटॉस पडे. मग काय, ब्रॅडमन तडकवायचा.’’

मोहनचे डोळे चमकले. तो सुरमा मिळविण्यासाठी मोहन आफ्रिकेला नाही तरी काळबादेवीला जायला निघाला होता (नेहमी माझी लेग स्टंप उडवायचा, साला!)
फुलटॉसवर बाद होणारे फलंदाज पाहिले की, माझ्या मनात येतं – ‘‘फुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू..!’’

ताजा कलम – मायरा कारखानीस (कारखानीस आडनावाच्या बाईचं पहिलं नाव मायरा? कदाचित नवसानं झाली असेल किंवा महाउद्योगपती विक्रम साराभाई – सॉरी, सरंजामे यांनी तिला नोकरीवर ठेवताना तिचं पुन्हा बारसं केलं असेल. तर सांगत काय होतो, मायरा कारखानीस ईशा निमकरचा जेवढा राग राग करते त्यापेक्षा मी जास्त करतो (संदर्भ – ‘तुला पाहते रे’ ही ‘झी’वरची ताजी आचरट मालिका) निर्माताद्वयी केतकर पतीपत्नी यांना मध्ये घातलंत तर मुकेश अंबानी चुरगळलेले कपडे घालून चाळीतल्या तुमच्या खोलीत घाण्याच्या तेलाचा डबा स्वतः उचलून घेऊन येईल. तरीही मी मालिका बघतो एवढय़ावरून माझ्या आयुष्यात किती पोकळी व रिकामपण असले पाहिजे, तुम्ही बघा. एक विनंती – यापुढे ‘तुला पाहते रे’ या मालिकेवर लिहिण्याची सुपारी मला देऊ नये. त्यापेक्षा भिंतीला तुंबडय़ा लावायला सांगा किंवा विक्रमच्या गाडीत त्याच्या खांद्यावर मान टाकून ईशा झोपते तसे घरी झोपावे. विलास झेंडेप्रमाणे नवनवीन जाकिटे घालून घारीप्रमाणे घिरटय़ा घालाव्यात. मालिकेतील ईशाच्या आईचे खरे वडील निळू फुले असते तर म्हणाले असते – ‘‘अरे, वाड्यावर नेऊन झोडा रे यांना.’’

खानदानी विक्रमसाठी त्याची खानदानी आई त्यांच्या कर्जतच्या खानदानी बंगल्यात जेवणाचा खास खानदानी मेनू ठरविते. तो असा असतो – पुरणपोळी, अळूवडी व आंबट वरण! छान छान, आता एवढं कोणीतरी मला सांगा. अळूवडी आंबट वरणात बुडवून खायची की पुरणपोळी? निमकर रिलॅक्स व्हावेत, त्यांना आपल्याविषयी जवळीक वाटावी यासाठी विक्रम त्यांना साडी नेसून का दाखवत नाही? शिळ्या पोळीचा लाडू खाण्यापेक्षा ही ‘साडी डिप्लोमसी’ जास्त चांगली ठरली नसती का?

मालिका भलेही दीडदमडीची असेल, पण दीडदमडी भी बहोत बडी चीज होती है बाबू…

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या