शिरीषायन: मोठय़ा लोकांच्या छोटय़ा गोष्टी

>>शिरीष कणेकर

एका कवयित्रीनं उषाताई मंगेशकरांची टीव्हीवर मुलाखत घेतली होती. त्याबद्दल आम्ही बोलत होतो.
‘अगदीच सुमार होती.’ कोणी न विचारता परखड बोलायचं या माझ्या ब्रीदाला जागून मी म्हणालो.
‘अगदी अगदी..’ उषाताई तत्काळ सहमत झाली. ‘मी कव्वाली गायिका असल्यागत तिचे सगळे प्रश्न होते.’
‘अशा लोकांची मुलाखत घेण्यासाठी तुम्ही का शिफारस करता?’ मी पुढचा परखड प्रश्न विचारला.
‘संबंध पडतात हो.’ बेडरूममधून हॉलमध्ये प्रवेश करत लता उषाऐवजी उत्तरली.

‘संबंध अपनी जगह, व्यवसाय अपनी जगह..’ मी पांडित्य पाजळले. ‘दीदी, आपले संबंध उत्तमच आहेत नं? तुम्ही करण दिवाण व मनहर देसाई या शुंभांबरोबरही द्वंद्वगीते गायलाय, मग मीच काय पाप केलंय? आपणही द्वंद्वगीत गाऊया. बघा अनाऊन्समेंट कशी वाटते? …अब सुनिये लता मंगेशकर और शिरीष कणेकर को फिल्म…’

‘नक्की गाऊ.’ लता म्हणाली, ‘लोकांना तरी कळू दे की, सुरात कसे गातात ते!’
त्यानंतर जो आवाज आला तो माझी हवा गेल्याचा होता.
मी विमानातून अमेरिकेला चाललो होतो. (सायकलवरून जाण्याचा माझा आधीचा बेत काही तांत्रिक अडचणींमुळे मला रद्द करावा लागला होता. सायकलला पासपोर्ट-व्हिसा वगैरे काही लागत नाही, फक्त हवा भरायचा पंप लागतो. डबल-सीटही जाता येते.) विमानात ‘बाबुजी’ सुधीर फडके असल्याचे मला कळले. जावं का उठून त्यांना भेटायला? काय पडल्येय, ते आले का तुला भेटायला? त्यांना कदाचित मी फ्लाइटवर आहे हे माहीत नसेल. असं कसं माहीत नसेल? सगळय़ांना माहित्येय, मी सेलिब्रिटी आहे. बस झाला मध्यमवर्गीय चोंबडेपणा, मी आडमुठेपणे बसून राहिलो. तासा दोन तासांनंतर काय झालं कुणास, मी त्यांना शोधत गेलो. आम्ही भेटलो आणि गप्पा मारल्या.

‘अहो, मी मगाशी तुम्हाला भेटायला येऊन गेलो.’ बाबुजी प्रसन्नपणे म्हणाले, ‘तुमचा डोळा लागला होता. म्हटलं उगीच डिस्टर्ब करू नये.’
मी मनोमन खजील झालो. मला माझ्या कोत्या मनाची लाज वाटली. मी कसला डोंबलाचा सेलिब्रिटी? खरे ते सेलिब्रिटी, पण वागणं बघा किती मऊसूत आहे ते. असं स्वतःला मोठं म्हणवून माणूस मोठा होत नसतो. तो माझ्यासारखाच छोटा राहतो.

न्यूयॉर्कला विमान थांबल्यावर उतरताना माझ्या अंगावरून जाताना बाबुजी म्हणाले, ‘चलतो कणेकरसाहेब. भेटू या.’
कणेकरसाहेबांची वाचा बसली होती.
माझ्या ‘फटकेबाजी’च्या एकपात्री प्रयोगाला मी सचिन तेंडुलकरला शिवाजी मंदिरला प्रमुख पाहुणा म्हणून पाचारण केले होते. त्याच्याबरोबर त्याचं अवघं कुटुंबच आलं. मला त्यात आनंदच होता, पण झालं काय, की दस्तुरखुद्द उत्सवमूर्तीलाच बसायला सीट मिळत नव्हती. शेवटी तो पहिल्या रांगेतल्या शेवटच्या टोकाच्या खुर्चीवर जाऊन बसला. प्रमुख पाहुणा कोपऱयात?
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आम्ही स्टेजच्या मागल्या भागात बोलत बसलो होतो. सचिन थोडा बावरलेला दिसत होता.

‘स्टेजवर जाऊन बोलायचं या कल्पनेनंच माझे पाय लटपटतायत.’ सचिन म्हणाला.
‘अरे, तुझे पाय माझ्या क्षेत्रात लटपटतायत.’ मी बळे बळे हसून म्हणालो, ‘इथे माझे तर माझ्याच क्षेत्रात लटपटतायत. मला पॅडस् बांधून विकेटवर पाठव. मी टमरेल घेऊन धावत सुटेन.’

सचिनने ओठ विलगले. तो थोडा रिलॅक्स झाल्यासारखा वाटला. स्टेजवर गेल्यावर तो रिलॅक्सच होता. माझ्या प्रश्नांना तो दिलखुलास उत्तरे देत होता. आधी जाणवलेल्या टेंशनचा मागमूसही नव्हता.
क्षणभर माझ्या मनात आलं की, आपणही विकेटवर जाऊन पाहायचं का?

त्या काळात प्रा. अनंत भावे व मी गप्पांचा कार्यक्रम करायचो. आमचा नाशिकला कार्यक्रम होता. नाशिकला जाऊन वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांना न भेटणं म्हणजे आगऱयाला जाऊन ताजमहाल न बघण्यासारखं होतं. मी मात्र भेटायला अनुत्सुक होतो. कारण कवितेतलं मला ठोदेखील कळत नव्हतं. (व आजही कळत नाही.)

आम्ही गेलो. पाच मिनिटांत शिरवाडकरांनी आम्हाला हसवून सोडलं. ‘मी कॉलेजात असताना क्रिकेट खेळायचो.’ ते सांगू लागले, ‘आमच्या कर्णधाराला दोन प्रश्न कायम पडायचे. फलंदाजी असेल तर या शिरवाडकरला किती खाली पाठवायचं व क्षेत्ररक्षण असेल तर शिरवाडकरला कुठे लपवायचं…?’
आम्ही हसत हसत शिरवाडकरांच्या घरातून बाहेर पडलो.
[email protected]