शिरीषायन – मोठ्यांच्या छोट्या गोष्टी : 28

शिरीष कणेकर

मी राजेश खन्नाच्या ऑफिसात अवेळी बसलो होतो. अवेळ हा शब्द त्याच्या डिक्शनरीतच नव्हता. रात्री झोपतात व दिवसा जागतात हे निसर्गनियम त्याने ऐकलेले नव्हते आणि ऐकले असले तरी त्याला मान्य नव्हते. कारण? कारण तो राजेश खन्ना होता. देवाने अख्खी दुनिया निर्माण केली व मग फुरसतीने राजेश खन्ना निर्माण केला. आपल्या या अद्भुत निर्मितीसमोर साक्षात देवानं लोटांगण घातलं, असंही जतीन खन्नाला (म्हणजे राजेश खन्नाला हो!) वाटत असणार. माणसांचे नियम व कायदेकानून आपल्यालाही लागू केले जावेत याची उद्विग्नता त्याच्या देखण्या चेहऱ्यावर दिसत असे. त्याचं लाल गोरेपण खरोखरच बघण्यासारखं होतं. त्याच्या पायांच्या टाचाही लाल होत्या. त्या कधी त्याला घासाव्या लागल्या होत्या?

असाच एकदा अवेळी रात्री/पहाटे तीनच्या सुमारास त्याचा दिल्लीहून फोन आला. मी दचकून उठलो? आता या वेळेला?
‘सुन बे’ पलीकडून ‘काका’ची देववाणी आली, ‘मी माझं मृत्युपत्र केलंय. ऐकतोयस ना? रात्रंदिवस झोपा काढत असतो, साला.’
‘ही काय वेळ झाली?’ मी माफक निषेध व्यक्त केला.
‘का बरं, या वेळेला कोणी मृत्युपत्र करू शकत नाही?’
‘करू शकतो, पण फोन नाही करू शकत.’

‘मला शहाणपणा नको शिकवूस. माझ्या मृत्युपत्राचा अखेरचा परिच्छेद तू मला सांग.’
‘असा कसा सांगणार? तुझं मृत्युपत्रच जर मला माहीत नाही, तुझा एकूण सूरच जर मला ठाऊक नाही, तू कोणाला काय ठेवलंस हे जर मला सांगितलेलं नाहीस तर मी मृत्युपत्राचा समर्पक शेवट कशाच्या बळावर करणार?’
‘फिर तू काहेका xx लेखक है?’ तो तिरसटून म्हणाला.

मी राजेश खन्नाला बऱ्यापैकी ओळखत होतो तरीही त्याची लेखकाची व्याख्या ऐकून मी सर्द झालो.
मी शेवटचा परिच्छेद म्हणून काहीतरी बरळलो. मलाही मी काय बोललो ते स्मरत नाही. त्यानं धड ऐकलं की नाही व ऐकलं असल्यास त्यानं मद्याच्या अमलाखाली ते काळजीपूर्वक उतरवून घेतलं की नाही हे कळायला मार्ग नव्हता.
‘याच्या बदल्यात तुझा आशीर्वाद बंगला माझ्या नावावर कर.’ मी त्याला नेहमीप्रमाणे डिवचलं.
‘तुझे मैं तो अठ्ठन्नी भी नहीं दुंगा.’ तो गरजला.

राजेश खन्नानं आपला शब्द खरा केला.
तर सांगत काय होतो, मी राजेश खन्नाच्या ऑफिसात अवेळी बसलो होतो. त्याच्या हातात ग्लास होता. माझ्या हातात बोलणं सोडून दुसरं काहीच नव्हतं.
‘काका, तुझी रोमॅण्टिक इमेज आहे. मग ‘देवदास’ करण्याचा मोह तुला कसा काय झाला नाही?’
‘एक तर ‘अमरप्रेम’ खूपसा ‘देवदास’च्याच लायनीवर होता आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुझ्या ‘गॉड’नं ‘देवदास’मध्ये जे काही करून ठेवलंय त्यानंतर कोणी शहाणा माणूस ‘देवदास’ करायला धजावेल असं मला वाटत नाही.’ राजेश खन्ना म्हणाला.

पण शाहरूख खान धजावला.‘धर्मेंद्र ‘देवदास’ करणार होता.’ मी माहिती पुरवली.
‘धर्मेंद्र?’ राजेश किंचाळला, ‘चल बे पारू म्हणत त्यानं पारूला फरफटत नेली असती.’
स्वतःच्याच विनोदावर खूश होऊन ‘काका’ बराच वेळ हसत होता. हातातील ग्लासातील मादक पेय हिंदकळत होते.
‘काका, तुझी आवडती नायिका कोण होती? लोक म्हणतात मुमताज.’
‘का रे बाबा, काय विचार आहे? एक नाव घेतलं तर बाकीच्या चिडणार नाहीत का? ते मला परवडणारं नाही.’ त्याच्या हातातला ग्लास पुन्हा हिंदकळत होता.

‘ज्यांचं नखदेखील आम्हाला दिसत नाही. त्या सौंदर्यवतींबरोबर तुझं अफेअर म्हणजे हेवा करावा तेवढा कमीच. ‘मी असुयेनं आसुसून म्हणालो.

या खेपेला त्याच्या हातातल्या ग्लासमधील थोडं पेय खाली जाजमावर पडलं.
मला एकच कळलं की कितीही प्यायला तरी तो या विषयावर बोलणार नाही. चांगलं आहे ना. त्या स्त्रियांची इज्जत सांभाळण्याचं उदात्त काम माझा मित्र करीत होता. त्याच्या अवगुणांची यादी करताना या दुर्मिळ गुणाची आवर्जून दखल घ्यायला हवी.

त्याच्या स्वभावाचा एक लोभसवाणा, गोड अनुभव मी कदापि विसरू शकणार नाही. त्याच्याकडे दुपारी बड्या हॉटेलातून मागवलेला भला-मोठा चार दारासिंग व दोन किंगकाँग खातील एवढा डबा यायचा. चिकन, मटण, फिश, बिर्याणी अशा रगमगीत डिशेसची रेलचेल असायची. ‘ग्रेव्ही’वर तेलाचा तवंग असायचा. एकदा मात्र डब्याच्या एका कप्प्यात मला मीठ व मिरपूड टाकलेल्या बटाट्याच्या उकडलेल्या फोडी आढळल्या. मला त्यांचे प्रयोजन कळेना.
‘ये क्या है?’ मी विचारलं.

‘साहेब, तुम्हाला पोटाचा त्रास आहे ना?’ रत्नागिरीहून आलेला ‘काका’चा स्पेशल कुक बाळकृष्ण म्हणाला, ‘बाकीच्या गोष्टी तुम्हाला खाणं शक्य नसेल तर तुम्हाला उपास घडेल. म्हणून ‘काकाजी’नी खास तुमच्यासाठी मला असा बटाटा करायला सांगितले.
मी चमकून राजेश खन्नाकडे पाहिले. आपण त्या गावचेच नसल्यासारखं भासवीत तो जेवत होता. नेकी कर और दर्या में डाल…

[email protected]