हिमयुगास सुरुवात झाली आहे

>> श्रीनिवास औंधकर

सध्या उत्तर हिंदुस्थानात मोठय़ा प्रमाणात धुळीच्या वादळाने थैमान घातले आहे. त्याचवेळी सूर्याच्या पोटात मोठे भगदाड पडल्याने निर्माण झालेल्या सौरवादळाचाही तडाखा पृथ्वीला सहन करावा लागणार आहे. सर्वसाधारणपणे सूर्यावर सौर डाग कमी होत गेले की धुळीची वादळे, बर्फवृष्टी, गारपीट, प्रचंड थंडी असे प्रकार वाढीस लागतात. सध्या सूर्यावरील सौरडाग कमी होत आहेत. हिंदुस्थानसह जगातील अनेक देशांत जे अनपेक्षित पर्यावरणीय बदल होत आहेत त्यामुळे छोटय़ा हिमयुगाची सुरुवात झाली आहे असे म्हणायला हरकत नाही. हे छोटे हिमयुग २०३२ ते २०४२ पर्यंत असू शकते.

११ वर्षांच्या प्रत्येक सौर साखळीमध्ये सूर्यावर दरवर्षी किती सौर डाग निर्माण झाले होते याची माहिती दर्शविणारा हा आलेख! दर मागच्या ११ वर्षांच्या सौर साखळीच्या काळाच्या तुलनेत पुढील ११ वर्षांच्या सौर साखळीच्या काळात सौर डागांचे प्रमाण कमी कमीच होत असल्याचे दिसून येत आहे.

सध्या उत्तर हिंदुस्थानात मोठय़ा प्रमाणात धुळीचे वादळ घोंगावते आहे. त्यामुळे त्याठिकाणी मोठय़ा प्रमाणात बर्फवृष्टी आणि गारपीट होत आहे. संपूर्ण हिंदुस्थानचे लक्ष या वादळाकडे लागलेले असतानाच आणखी एका बातमीने लक्ष वेधून घेतले आहे, ती म्हणजे सूर्याच्या पोटाला मोठे भगदाड पडले असून त्यामुळे निर्माण झालेल्या मोठय़ा सौर वादळाने पृथ्वीवरील उपग्रहीय यंत्रणा ठप्प पडणार आहे. या दोन्ही घटना लोकांना भयचकित करणाऱया तर आहेतच, शिवाय निसर्गाच्या प्रकोपापुढे मानवी प्रयत्न किती खुजे ठरतात हेही दाखवून देणाऱया आहेत. अर्थात निसर्गाच्या रौद्ररूपापुढे मानवी प्रयत्न किती थिटे पडतात या विचारापेक्षा मानवात असलेला अचूक ज्ञानाचा अभाव हेच कारण अधिक संयुक्तिक आहे असे म्हणावे लागेल.

सूर्यावरील सौरवादळे असोत वा पृथ्वीवरील धुळीची वादळे या दोन्ही गोष्टींची समग्र आणि अचूक माहिती आपल्या आणि देशोदेशीच्या शास्त्र्ाज्ञ, संशोधकांपासून अगदी या क्षेत्रातील व्यावसायिकांपर्यंत सर्वांना माहीत आहे. ही माहिती सामान्य माणसापर्यंत पोहोचत नाही, पोहोचली तरी ती पुरेशी नसते किंवा सारे काही घडून गेल्यानंतर ही माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचते असे म्हणायला हरकत नाही. एपूण काय तर अचूक माहितीच्या अभावामुळे सामान्य माणसाच्या मनात अशा गोष्टीबाबत संभ्रमावस्था निर्माण होते. त्यातून चुकीची, अज्ञान वाढवणारी परिस्थिती मात्र उद्भवते.

उत्तर हिंदुस्थानात गेल्या आठवडाभरापासून धुळीची वादळे, बर्फवृष्टी आणि गारपीट होत आहे. हिंदुस्थानातील आणि एपूणच पृथ्वीवरील वातावरणात झपाटय़ाने बदल होत आहे. हा बदल नेमका काय आहे आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत हे आपण पाहेले पाहिजे. साधारणतः सूर्यावर प्रत्येकी ११ वर्षांची सौरडाग निर्माण होण्याची आणि कमी होत जाण्याची साखळी असते. सूर्यावर सौरडाग निर्माण होण्याची संख्या कमी होत गेली की, पृथ्वीवर वैश्विक किरणांचा शिरकाव अधिक प्रमाणात होतो. पृथ्वीवर वैश्विक किरणांचा मारा वाढला की, विषुववृत्ताच्या पट्टय़ात ढग तयार होण्याची प्रक्रिया वाढत जाते. त्यातून या पट्टय़ात पावसाचे प्रमाण वाढते.

सूर्यावरील सौरडागांची सध्या २४वी साखळी सुरू आहे. ही २४वी साखळी सन २०२0मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. २०२0मध्ये पुढील ११वर्षीय २५वी सौर साखळी सुरू होणे अपेक्षित होते. प्रत्येक सौर साखळीच्या प्रारंभी सूर्यावरील सौर डागांची संख्या शून्यापासून वाढत जाते आणि ५ ते ६ वर्षांनंतर कमाल पातळी गाठल्यानंतर सौर डागांची संख्या कमी होत जाते. जेव्हा सौर डागांची संख्या वाढत जाते तेव्हा सूर्यावर वर्षाला २००  पेक्षा अधिक सौर डाग असू शकतात आणि जेव्हा सौर डागांची संख्या कमी होत जाते तेव्हा सौर डागांची संख्या शून्य असू शकते. सूर्यावरील सौर डागांची संख्या, आकारमान, सौर डाग टिकण्याचा कालावधी घटत जातो तसेच सूर्यावर सौर डाग नसल्याच्या दिवसांची संख्याही वाढत जाते. सध्या सौर साखळी क्रमांक २४ची वाटचाल ही सौर डाग कमी होत जाण्याची आहे.

इतिहासाचा विचार करता सन १५६० ते १६०० आणि १७९० ते १८३० या प्रत्येकी ४० वर्षांच्या कालावधीत सूर्यावर सौर डाग अत्यंत कमी होते आणि या ४० वर्षांच्या दोन टप्प्यांत छोटी छोटी हिमयुगे पृथ्वीवर अवतरली होती. आता सौर साखळीची पुढील ४० वर्षांची वाटचाल पाहता आगामी छोटय़ा हिमयुगाची सुरुवात झाली आहे असे म्हणायला हरकत नाही. परिणामी गेल्या काही वर्षांपासून युरोप, अमेरिका, रशिया, सैबेरिया आणि चीनसारख्या उत्तर धृवाजवळ असलेल्या देशांमध्ये मोठय़ा प्रमाणात थंडी वाढत आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिकेसारख्या देशांमध्ये गेल्या २0 वर्षातील सर्वात नीचांकी तापमान होते. एवढेच नव्हे तर सहारासारख्या वाळवंटात बर्फवृष्टी होत आहे. अशी बर्फवृष्टी झाल्याची नोंद ४0 वर्षांपूर्वीची आहे. उत्तर हिंदुस्थानातही मोठय़ा प्रमाणात बर्फवृष्टी, गारपिटीच्या घटना घडताना दिसत आहेत. अमेरिकेच्या नायगारापासून श्रीनगरच्या दल सरोवरापर्यंत पाणी गोठण्याची प्रक्रिया सगळीकडे घडलेली आहे. उत्तर ध्रुव ते चीनपर्यंतच्या प्रदेशात गोठण्याची प्रक्रिया होण्याचा अर्थ जगाची वाटचाल ग्लोबल वॉर्मिंगकडे नव्हे, तर ग्लोबल पुलिंगकडे होत आहे. साधारणतः २०१२मध्येच या छोटय़ा हिमयुगाला प्रारंभ झालेला असून सौर साखळीतील प्रतिवर्ष सौर डागांची घटत जाणारी संख्या पाहता आगामी छोटे हिमयुग २०३२ ते २०४२ पर्यंत असू शकते.

आता सध्या जी धुळीची वादळे येत आहेत, त्याची कारणे आणखी वेगळी आहेत, ज्याला आपण ध्रुवीय वारे किंवा पश्चिमी विक्षोपीय वारे म्हणतो, ते वारे गेल्या आठवडाभरापासून उत्तर हिंदुस्थानातून वाहत आहेत. या वाऱयाच्या प्रदेशात साधारणतः दोन किमी उंचीवर उणे ५० ते उणे ४० तापमान आहे. त्यामुळे उत्तरेत ही वादळे आणि बर्फवृष्टी सुरू आहे. साधारण ११ मे नंतरचे चार-पाच दिवस पुन्हा सामान्य वातावरण होईल किंवा उष्णतेची लाट येईल व १५ मे या तारखेपासून पुन्हा दोन-तीन दिवस ध्रुवीय वारे याच भागातून वाहतील. दुसरे महत्त्वाचे असे की, बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागरात ढगांची निर्मिती होत आहे. त्यामुळे दक्षिण हिंदुस्थानातून उत्तरेकडे सरकत जाणाऱया ढगांमुळे महाराष्ट्रासह दक्षिण पूर्वोत्तर हिंदुस्थानातील बऱ्याच भागात मान्सूनपूर्व किंवा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा आणखी काय काय घडते हे तर येणारा काळच सांगेल. मात्र हिमयुगास सुरुवात झाली आहे आणि ‘धुळीच्या वादळाच्या हाका सावधपणे ऐका’ असेच आपले धोरण असणे हिताचे ठरणार आहे.

सोलर मिनिममच्या काळात वैश्विक किरणांचा पृथ्वीवरच्या वातावरणात शिरकाव वाढल्यामुळे पृथ्वीवरील वातावरण थंड होण्याच्या प्रक्रियेला गती मिळत आहे. त्यामुळे आता वारंवार शीतलहरी येऊ लागल्या आहेत. पक्ष्यांच्या स्थलांतराच्या रूपाने त्याचे आपल्याला प्रत्यंतर मिळू लागले आहे. हे पक्षी पूर्वी उत्तर ध्रुव ते युरोप सैबेरियात दिसत होते, ते आता प्रथमच हिंदुस्थानात दिसून येऊ लागले आहेत, तर उत्तर हिंदुस्थानात नेहमी येणारे पक्षी आता दक्षिण हिंदुस्थानपर्यंत स्थलांतरित होऊ लागले आहेत. पीक पद्धतीतील बदलाची गरज निर्माण झाली आहे. एकेकाळी उत्तर हिंदुस्थानातील पीक म्हणून मक्याला महत्त्व होते. आता जालना, संभाजीनगर हे जिल्हे त्याच मक्याचे हब झालेले आहे. जी जी पिके उत्तर हिंदुस्थानमध्ये चांगली येत होती, ती आता महाराष्ट्र आणि दक्षिण हिंदुस्थानात घ्यावी लागणार आहेत. महाराष्ट्रातील म्हणून मान्यता पावलेली पिके आता अधिक दक्षिणेकडील राज्यात घ्यावी लागणार आहेत. ही २०१२ पासून २०३२ ते ४२ पर्यंत (दीर्घकाळ) चालणारी आपत्ती आहे. अशा वेळी पारंपरिक पिकेच घेणार असा अट्टहास करणे म्हणजे स्वतःचे नुकसान करून घेणे आहे. मात्र परिस्थिती ओळखून पावले उचलली तर जगातील सर्व महासत्ता हिमयुगात गोठावत असताना हिंदुस्थानला मात्र स्वतःची प्रगती करण्याची आणि महासत्ता होण्याची मोठी संधी आहे.

(लेखक एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, संभाजीनगरचे संचालक आहेत.)

aundhkar_s@yahoo.com

(शब्दांकन – संजय मिस्त्री)