ध्येय प्राणिमात्रांच्या संरक्षणाचे, डब्ल्यूडब्ल्यूए : ठाण्याच्या तरुणांचे कौतुकास्पद काम

>> स्वरा सावंत

वन्य प्राणी आणि मनुष्यातला संघर्ष आपल्याला काही नवीन नाही… प्राण्यांनी मनुष्यावर केलेले हल्ले रोज आपल्या कानावर येत असतात… या संघर्षात दुवा बनून प्राणी मात्रांना समजून घेण्याचे काम ठाण्याची डब्ल्यूडब्ल्यूए म्हणजेच वाईल्ड वेलफेअर असोसिएशन ही तरुणांची संस्था करतेय. तुम्ही जगा आणि आम्हाला जगू द्या असा प्राणीमात्रांचा संदेशच जणू ते आपल्या पर्यंत पोहचवत आहे. 12 ऑगस्टला जगभरात साजऱ्या होणाऱ्या युथ दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊया या तरुणांच्या ध्येयवेड्या कामाविषयी….

पॉकेटमनी काढून पिक्चर, मित्रांसोबत कल्ला करण्याच्या वयात ठाण्याच्या दोन तरूणांना मुक्या प्राणिमात्रांसाठी काम करण्याच्या ध्येयाने झपाटले. उपवन येऊर परिसरात राहणाऱ्या आदित्य पाटील आणि अनिकेत कदम या मित्रांनी मग ही भूतदया आपल्या एरियातील प्राण्यावर दाखवायला सुरुवात केली. वय वर्ष अवघे 15… तेव्हा नववीत शिकणाऱ्या या मुलांनी येऊरच्या जंगलातुन येणारे प्राणी रेस्क्यू केले. साप ससे मुंगूस आणि बरच काही. लोकांमध्ये असलेला द्वेष कमी करण्यासाठी त्यांनी प्राण्यांविषयी असलेले प्रेम जागृत करण्याचा विचार केला. घराघरात येणारे साप सरडे मुंगूस याची माहिती दिली. प्राण्यांना समजून घ्या… त्यांना मारू नका… असा संदेश दिला.

वन्य जीवांसाठी काम खूप करायचं होतं. पण दिशा मिळत नव्हती. यावेळी वनविभागाने साथ दिली आणि डब्ल्यूडब्ल्यूए ही संस्था आकाराला आली. 2013 साली अधिकृत संस्था नावारूपाला आली आणि काम सुरू झाले. सुरुवातीला रेस्क्यू पर्यंत मर्यादित असलेले हे काम संरक्षण संवर्धनापर्यंत येऊन पोहोचले. मित्र, त्यांचे मित्र असे सभासद एकत्र आले. सध्या या संस्थेत 11 कोअर कमिटी तर 70 ऍक्टिव्ह मेम्बर आहेत. आतापर्यंत रेस्क्यूचे कोणतेही शिक्षण न घेता सापाबरोबरच बिबट्या, हरीण, मगर,मगरीची पिल्लं, घुबड, माकड, फ्लेमिंगो, घार हे प्राणी पक्षी संरक्षित केले आहेत. पकडलेल्या प्राण्यांचे मोबाईल अँपवरून रजिस्ट्रेशन होते फॉर्म भरून त्याची माहिती वन विभागाला जाते आणि मग त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले जातात.

या व्यतिरिक्त सामाजिक भान जपत या टीमने आपले समाजाप्रती असलेले दायित्व वारंवार सिद्ध केले आहे. कधी केरळमध्ये 15 दिवसांचे मदतकार्य, नगरला उसाच्या शेततले बिबटे पकडून तर कधी चिपळूण पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ही टीम सरसावली आहे. यामुळेच कौतुकाची एक थाप प्राणी सुरक्षा आणि संवर्धनासाठी द्यायलाच हवी.

ट्रांसिस्ट सेंटरचे घर

प्राणी रेस्क्यू केल्यानंतर त्याला ठेवण्यासाठी जागेची गरज होती. लहान सहन प्राणी घरी ठेवता येत होते पण मोठे प्राणी जसे बिबट्या मगर यांना उपचारासाठी जागा हवी होती. याची गरज लक्षात घेऊन ट्रांसिस्ट सेंटरची कल्पना सुचली. या विचारातून संस्थेचे पाहिले ट्रांसिस्ट सेंटर मानपाडा येथे करण्यात आले आहे. 20 टक्के क्षमतेने हे सेंटर सुरू झाले असून येथे माकड हरीण असे प्राणी आहेत. केवळ फंड नसल्याने ट्रांसिस्ट सेंटरचे काम अर्धवट पडून आहे. प्रत्येक युनिटला जाळी गेट नसल्याने प्राणी निघून जाण्याचा धोका असतो. म्हणून या सेंटरचे काम पूर्ण होण्यासाठी हे तरुण दिवसरात्र एक करत आहेत.

लीगल टीमचे काम कौतुकाचे

असोसिएशनच्या लीगल टीममध्ये काम करण्यासाठी 10 जणांचा ग्रुप आहे. वन्य प्राण्यांचा बाजार त्यांची अवैध रित्या होणारी विक्री थांबवण्यासाठी ही टीम काम करते. कासव, मांडूळ साप, खवले मांजर, प्राण्यांच्या कातडीची तस्करी असे 45 हुन अधिक यशस्वी छापे राज्याबाहेर जाऊनही टीमने टाकले आहे. 2019 मध्ये मारलेल्या एका छाप्यात मुंगूसच्या केसांपासून बनवलेले 35 हजार पेंटिंगच्या ब्रशचा साठा जप्त करण्यात आला होता, ही महत्त्वाची रेड असल्याचे आदित्य पाटीलने सांगितले.

हुशार मगरीची महिनाभर हुलाहुल

2020 मध्ये मुलुंडच्या एका बांधकाम बंद पडलेल्या साईटवर मगर रेस्क्यू करण्याचा पहिल्यांदा योग आला. या जागी अनेक वर्षे पाणी साचून खोल तळे झाले होते त्यात आठ फुटाची मोठी मगर होती… हे आमचे पहिलेच मगरीचे रेस्क्यू होते. टीमने त्या साईट वर तंबू ठोकला. कसं करायचं याचे प्लांनिंग झाले. पिंजरा लागला… बाजूला खड्डा खोदून खाण्याचे आमिष दाखवले… आणखी एक दोन ट्रॅप लावले, पण ती हुशार मगर काही केल्या येतच नव्हती. यासाठी स्पेशल डिझाईन केलेला पिंजरा तयार केला. दिवस रात्र शिफ्ट लावून आम्ही सीसीटीव्ही ने मगर मॉनिटर करत होतो. अखेर या चतुर मगरीने महिनाभर हुलकावणी देत जाळ्यात अडकायला वेळ घेतला. या अनुभवातून खूप शिकायला मिळाले, यानंतर मात्र वर्षभरात 7 रेस्क्यू ऑपरेशन अगदी सहज शक्य झाले.

हवा मदतीचा हात

शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उभ्या केलेल्या या संस्थेला प्राणिमात्रांची जपणूक करण्यासाठी मदतीचा हात हवा आहे. सेल्फ कॉन्ट्री ने सुरू असलेले हे काम मोठ्या प्रमाणात होण्यासाठी हे तरुण झटत आहेत. सेमिनार मार्गदर्शन शिबिराच्या देणगी तुन सध्या काम सुरू असून मदतीसाठी आवाहन करताना या मुलांनी हेल्पलाईन क्रमांक दिला आहे. ईच्छकानी 9757322901 / 02 / 03 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.