स्पर्धा परीक्षांना पर्याय काय?

>> स्वरूप पंडीत

काही आठवडय़ांपूर्वी एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱया विद्यार्थ्यांनी संभाजीनगर आणि पुणे येथे मोर्चे काढले. पदांची संख्या वाढवावी, कारभारात पारदर्शकता आणली जावी, परीक्षागृहातील हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने घेतली जावी, पीएसआय-एसटीआय व असिस्टंट या पदांसाठीच्या परीक्षा एकत्रित जाहिरातीद्वारे न घेता स्वतंत्र घेतल्या जाव्यात या आणि अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या. यानिमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित झाले. राज्यसेवा परीक्षेद्वारे कारकीर्द करू पाहणाऱया तरुणांच्या स्वप्नाळूपणावर, अशा तरुणांना आपल्याकडे वळविणाऱया मार्गदर्शक संस्थांच्या आर्थिक गणितांवर आणि राज्य शासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आली. हे मुद्दे न नाकारता स्पर्धा परीक्षांद्वारे कारकीर्द घडविण्याचे स्वप्न पाहणाऱया या तरुणांसमोरील आव्हानाच्या मुळाशी जाण्याचा केलेला हा प्रयत्न.

मला नोकरीतून नेमके काय मिळायला हवे? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण केला आहे कधी? उत्तम पैसा, समाजात प्रतिष्ठा, भरपूर दौरे, मुबलक सुट्टय़ा, शक्य झाल्यास आपला, आपल्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांचा मेडिकल इन्शुरन्स, दिवाळी बोनस… यादी न थांबणारी आणि वाढतच जाणारी असते. पण त्या पलीकडे स्वतःला जरा खोदून विचारलं तर लक्षात येतं की सत्ता, अधिकार, निर्णयस्वातंत्र्य, काम करण्याची मोकळीक, कौटुंबिक स्थैर्य, नियमित-आकर्षक वेतन आणि सामाजिक प्रतिष्ठा… नोकरीची निवड करताना बहुधा युवा वर्गाचे हे निकष असतात. मग प्रश्न उरतो की सध्याच्या विद्यापीठीय शिक्षणाद्वारे, पदव्यांद्वारे, त्या शिक्षणातून मिळणाऱया कौशल्यांच्या आधारे वरील गोष्टी मिळवता येतात का? बहुधा या प्रश्नाचे उत्तर सकारात्मक मिळत नाही आणि यातच सरकारी परीक्षांविषयीच्या आकर्षणाचे मूळ दडलेले आहे.

नव्वदीच्या दशकात महाराष्ट्रातील तरुण सरकारी सेवांकडे वळत नाही अशी तक्रार कानी येत असे. तिथपासून सुरू झालेला हा प्रवास सध्या विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रातील तरुण राज्य सेवा परीक्षांचाच विचार का करतो इथवर येऊन ठेपला आहे. त्याला पार्श्वभूमीही तशीच आहे. एकीकडे एमपीएससी परीक्षार्थींनी केलेले आंदोलन तर दुसरीकडे केवळ 69 जागांची भरती दाखविणारी एमपीएससीची जाहिरात. यामुळे अनेक प्रश्नांचे मोहोळ उठले आहे. या परीक्षांकडे वळण्याएवढय़ा या परीक्षा आकर्षक आहेत का, परीक्षा सोप्या नाहीत असे सगळे म्हणतात तरीही एवढे विद्यार्थी या परीक्षांकडे का वळतात, विद्यापिठीय परीक्षांचा अभ्यास करताना कंटाळलेले विद्यार्थी या परीक्षांचा अभ्यास कसा झेपवतात, यामागे राज्यातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणाऱया क्लासेसचे काही अर्थकारण दडलेले आहे का, या परीक्षार्थींचे भविष्य काय… एक ना अनेक. आपण एकेका प्रश्नाचा वेध घेण्याचा प्रयत्न करू.

उत्तरांच्या शोधात
जागतिकीकरणानंतर खासगी क्षेत्रांमधील नोकऱयांचे दालन उघडले खरे, पण २००७-०८ मधील अमेरिकेतील सबप्राइम क्रायसिसनंतर अभियांत्रिकी व आयटीसहित अनेक क्षेत्रांमधील रोजगारांवर कुऱहाड कोसळली. एकीकडे महत्त्वाकांक्षी, जगाकडे पाहणारा, सुशिक्षित आणि स्वप्नाळू तरुण वर्ग उभा राहत होता तर त्याचवेळी सामाजिक प्रतिष्ठा असलेल्या रोजगाराच्या संधी, स्थैर्य व उत्तम वेतन देणाऱया बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील नोकऱया कमी होत होत्या. अशा वेळी काही घटकांची गरज होती. व्यावसायिक क्षेत्रात आदर्श-रोड मॉडेल उभे राहणे, किमान पाच ते सहा वर्षांची नोकरीची शाश्वती, उत्तम वेतन, नोकऱयांसाठी खर्चिक शिक्षणासाठी आवश्यकता नसणे, कला-वाणिज्य-विज्ञान अथवा अन्य कोणत्याही शैक्षणिक पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्याला ती संधी समानरीत्या उपलब्ध असणे आणि सर्वांत मुख्य म्हणजे नोकऱयांना ग्लॅमर असणे. शिवाय अशा नोकऱयांपर्यंत पोहोचायचे कसे याचे मार्गदर्शन करणारी यंत्रणा उपलब्ध असणे. स्पर्धा परीक्षांमधील सेवा संधींच्या दृष्टीने हे सर्व घटक गेल्या काही वर्षांत आपल्याला जुळून आलेले पाहावयास मिळाले.

परीक्षा आकर्षक नसल्या, त्यासाठी भरपूर अभ्यास करावा लागणार असला तरीही परीक्षांची तयारी करताना मिळणारे चौफेर ज्ञान, मित्रवर्तुळामध्ये वाढणारे वजन, वर्तमानात बेरोजगार असलो तरीही काहीतरी भव्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे हे समाजात सांगितल्यानंतर मिळणारा मान, पालकांना आपल्या स्वप्नाळू व मेहनती पाल्याविषयी मिळणारे आश्वासक समाधान आणि अगदी ३३-३५ व्या वर्षीही करीयर नव्याने सुरू करण्याची संधी या बाबी मुलांना कष्ट करण्यास किंवा अन्य नोकऱया शोधण्यापासून परावृत्त करण्यास पुरेशा होत्या.

स्पर्धा परीक्षा अर्थव्यवस्था व बदलांचे वारे
या परीक्षा देणाऱया परीक्षार्थींच्या संख्येमुळे स्पर्धा परीक्षा अर्थव्यवस्था जोमाने फोफावत गेली. प्रकाशक, पुस्तक विक्रेते, नोटस् लिहिणारे लेखक, झेरॉक्स प्रती काढणारे दुकानदार, वाचनालये-अभ्यासिका चालवणारे, त्यादृष्टीने आपले राहते गाव सोडून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी निवासाची-भोजनाची व्यवस्था पुरवणारे, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणारे क्लास, वृत्तपत्रे व नियतकालिके विक्रेते अशांची मोठी अर्थव्यवस्था यातून उभी राहिली. त्यातून तरुणांना मोहविणाऱया जाहिराती येऊ लागल्या. जाहिरातींमुळे वृत्तपत्रांमधूनही या परीक्षांविषयीचे मार्गदर्शन करणारे साप्ताहिक स्तंभ उभे राहिले. त्याला ग्लॅमरस आणि कर्तबगार अधिकाऱयांच्या अनुभव कथनाची, संवादाची जोड मिळाली.

त्याचवेळी केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग या दोन्ही आयोगांकडून होणाऱया भरतीचे आकडेही वाढले. २००६-०७ मध्ये ४०० ते ५०० जागांच्या घरात असणारा भरतीचा आकडा त्यानंतरच्या काही वर्षांत थेट दुपटीवर पोहोचला. खुद्द राज्य शासनानेही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी केंद्रे, शिष्यवृत्त्या सुरू केल्या. त्यामुळे या क्षेत्रात वाढीव संधी मिळत राहतील अशी खात्री इच्छुकांमध्ये निर्माण झाली.

आणखी एक महत्त्वाची बाब. स्पर्धा परीक्षांमधील अभ्यासक्रमामध्ये असलेले अनेक उपघटक हे प्रामुख्याने कला शाखेच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असलेले दिसतात. दुर्दैवाने कला आणि मानव्य शाखांकडे स्वतंत्र हिंदुस्थानात म्हणावे असे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे या शाखांमधून अभ्यास करणाऱया, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या आकर्षक व सामाजिक प्रतिष्ठा असणाऱया संधी फारशा उपलब्ध झाल्या नाहीत. ही परिस्थिती बदलत असली तरीही चित्र पूर्णपणे आश्वासक नाही. स्वाभाविकच या शाखेच्या विद्यार्थ्यांचा कल स्पर्धा परीक्षांकडे राहिला. उद्योगविश्वात नोकऱयांसाठी लागणारी कौशल्ये विद्यापिठीय शिक्षणातून मिळत नसल्यामुळे अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना थेट रोजगार देणे शक्य होत नाही. त्यामुळेच या विद्यार्थ्यांनाही प्रशिक्षण द्यावे लागते. आणि मग ते अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना दिले काय किंवा विज्ञान शाखेच्या, ते सारखेच ठरते. अशी उद्योग जगतातील जाणकारांची तक्रार असल्यामुळे अभियांत्रिकी वा विज्ञान क्षेत्रातील उमेदवारांचा ओढा वाढला.

१८ वर्षांच्या भविष्याची गुंतवणूक
परीक्षेच्या बदलत्या स्वरूपामुळे अभियांत्रिकी व व्यवस्थापन शाखेच्या विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात अधिक झुकते माप मिळत असल्याची विद्यार्थ्यांची सप्रमाण धारणा झाली. त्यामुळे समान संधी मिळत नसल्याचे सांगत विद्यार्थी आंदोलन उभे राहिले, तर दुसरीकडे या परीक्षा देण्याच्या वाढीव संधी मिळाव्यात यासाठी तरुण आक्रमक झाला. यामुळे स्पर्धा परीक्षांमधील कारकीर्द हा राजकीय आखाडय़ाचा विषय झाला. त्यावेळी एमपीएससीने खुल्या वर्गासह अन्य वर्गांसाठीचे कमाल पात्रता वय पाच वर्षांनी वाढवले. आधीच मोजक्या पदांसाठी असलेली ही स्पर्धात्मक परीक्षा त्यातील या बदलामुळे अधिक चुरशीची झाली. वयाच्या १९-२० व्या वर्षापासून शासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणारा तरुण आता हे स्वप्न अगदी ३८ व्या वर्षापर्यंत पाहू लागला.

या सगळय़ा पार्श्वभूमीवर अन्य शासकीय उपक्रम, आस्थापने, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे या व अशा सेवांमध्ये सरकारला, व्यवस्थेला वा समाजाला आयकॉन उभे करता आले नाहीत. त्यामुळे अन्य पर्यायांकडे वळण्यापासून तरुण वंचित राहिला.

घोडा का अडला, भाकरी का करपली आणि पान का पडले या तीनही प्रश्नांचे उत्तर बिरबलाने ‘ते न फिरवल्याने’ असे दिले होते. एमपीएससी आंदोलन का झाले, या मुलांना पर्यायी रोजगाराच्या संधी का नाहीत आणि शासनाला या क्षेत्रातून उभ्या राहणाऱया मनुष्यबळाचे ओझे का हाताळावे लागणार आहे या तीनही प्रश्नांचे उत्तरही ‘ते न फिरवल्याने’ असेच आहे. आता ते चित्र फिरवणे आपल्या हाती!

[email protected]
(लेखक ओआरएफ मुंबई येथे असोसिएट फेलो या पदावर कार्यरत आहेत.)

स्पर्धा परीक्षांना पर्याय उभा करण्यासाठी काय करता येईल?‘
– महारोजगार हे वृत्त संकेतस्थळ, एम्प्लॉयमेंट न्यूज हे साप्ताहिक यांचा योग्य तो प्रसार करणे.
– भविष्यवेधी दृष्टीने किमान सहा ते सात वर्षांनी रोजगारांसाठी आवश्यक तो कौशल्य समूह कोणता असेल, त्यासाठी काय तयारी करावी लागेल याची नियमित अंतराने माहिती देणे.
– आगामी पाच वर्षांचा अंदाज बांधत संभाव्य सरकारी पदे किती असतील याची आगाऊ माहिती प्रकाशित करणे.
– एक्सपोनेंशियल टेक्नॉलॉजी व आर्टिफिशियल टिलिजन्सच्या काळात रोजगारांच्या नवीन शक्यतांचे मॅपिंग करून त्यादृष्टीने नियमित अभ्यासक्रम अद्ययावत करणे.
– शिक्षण, अभ्यासक्रम व तंत्रज्ञान यांच्यातील गतीचे समीकरण सांभाळणे.
– विविध इंटर्नशिप प्रोग्रॅमद्वारे खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील रोजगारांची माहिती युवकांपर्यंत पोहचविणे. (मुख्यमंत्री इंटर्नशिप कार्यक्रम हे याचे उत्तम उदाहरण)
– देशातील थिंकटँक व तरुणाई यांच्यातील भाषेसहित सर्व अडथळे दूर करून त्यांना एकमेकांशी जोडणे.
– युवकांनी आपापला कल ओळखून स्पर्धा-परीक्षांव्यतिरिक्तचे पर्याय ओळखणे, त्यासाठी स्वतःला सज्ज करणे.
– रोजगाराच्या अन्य संधींना प्रतिष्ठा व ग्लॅमर मिळवून देणे.

आपली प्रतिक्रिया द्या