दीर्घायु भव : बहुगुणी कढीपत्ता

>> वैद्य सत्यव्रत नानल

जेवताना ताटात एखादे पान आले तर काढून टाकणे किंवा चावून खाणे यापलीकडे आपल्या लक्षातही राहत नाही असा कढीपत्ता. कोथिंबीर घेताना फुकट मिळतो, असा लक्षात राहणारा कढीपत्ता यापलीकडे सामान्य लोकांना फार माहिती नसते. आयुर्वेदानुसार कढीपत्त्याचे अनेक फायदे करून घेता येतात. कसे ते पाहू या आजच्या लेखात…

1) अजीर्णाच्या कफज प्रकारात पुढील लक्षणे दिसतात तेव्हा कढीपत्ता वापरावा. तोंडाला गोड, तुरट, खारट चव जाणवत राहणे.  अन्नावर वासना नसणे.  फार भूक न लागणे.  बोलताना तोंडात जास्त लाळ सुटणे.  तोंडाला घाण वास येणे. अशी सर्व लक्षणे असतील तर कढीपत्ता 7-8 पाने धुऊन स्वच्छ करून घ्यावीत. तोंडात घेऊन चघळावीत. गिळू नयेत. चघळून चघळून रस घ्यावा, चोथा थुंकून टाकावा. तोंडाला चव येते, भूक जाणवू लागते आणि हिरडय़ांमध्ये जंत असतील तर तेही मरतात.
2) कढीपत्त्याची पाने चघळून खाल्ल्याने हिरडय़ा सोलवटणे, दात किडणे, हिरडय़ांमध्ये जंत होणे प्रकार आटोक्यात येतात आणि बाकीच्या पथ्य आणि औषधासही पटकन गुण येतो.
3) अजीर्णामुळे फारच त्रास होतात त्यावेळी उलटय़ा होणे, पोटात जळजळ होणे, तोंडात लाळ सुटणे त्रास होतात. अशा वेळी दोन चमचे कढीपत्त्याच्या पानांचा, लिंबाचा रस दोन चमचे, खडीसाखर एक चमचा घेऊन एकत्र करावे. दर अर्ध्या तासाने अर्धा अर्धा चमचा चघळून खावे. पित्ताचा त्रास होत असलेल्यांनी मात्र वैद्यांच्या सल्ल्याने उपाय करावेत.
4) खरूज, नायटा, गजकर्ण, ओला इसब अशा क्षुद्र त्वचारोगात त्वचेवर खाज, वेदना असते तिथे कढीपत्ता पानांची ताजी चटणी करून लावावी.
5) हातापायांची जळजळ, डोके, कपाळ यामध्ये तापानंतर आलेला हल्लखपणा, डोळ्यांची जळजळ होत असेल तर कढीपत्ता रात्रभर पाण्यात भिजवावा, दिवसभर या पाण्याने डोळे, डोके, पोट, हातापायांचे तळवे यावर घडय़ा ठेवाव्यात.
6) लघवीला जळजळ होत असेल, त्याने ओटीपोटात दुखत असेल तर याच पाण्याने ओटीपोटावर घडय़ा ठेवाव्यात. हे पाणी थोडे प्यायल्याने लघवीची जळजळही कमी होते.
7) आव पडण्याची सवय असेल तर कढीपत्त्याची पाने सुकवून त्याची चटणी बनवावी आणि जेवणात खावी.
8) मुका मार लागून सूज येणे, दुखणे, सांधे सुजणे आणि दुखणे यामध्ये कढीपत्ता पानांची ताजी चटणी करून त्यात थोडे थोडे हळद आणि सैंधव मीठ मिसळावे आणि या मिश्रणाच्या पोटल्या गरम करून त्याने शेकावे.
9) लहान मुलांना किंवा मोठय़ा माणसांना जंतांचा त्रास कधीही होऊ शकतो. अशा वेळी कढीपत्ता पानाची ताजी चटणी गुळात मिसळून मटारच्या आकाराची गोळी बनवावी आणि रोज सकाळ, संध्याकाळ द्यावी.
अशा प्रकारे कढीपत्ता म्हणजे झाडाचा एक साधासोपा प्रकार, जो आपल्या घरात कायमच पडलेला असतो. त्याचे आपल्याला असे अनेक फायदे करून घेता येतात.

[email protected]