कस्टर्ड खाताना…

>> वैद्य सत्यव्रत नानल

दुधापासून बनणारा हा नवीन पदार्थ अनेक घरांमध्ये बनवला आणि वापरलाही जातो. आयुर्वेदानुसार याचे फायदे आणि नियम काय? उपयोग कसा करता येतो ते आज समजून घेऊ या 

  • चवीला गोड आणि पचायलाही गोड, थंड असे हे कस्टर्ड अनेकांना आवडते. याने शरीरात कफ वाढतो आणि वात व पित्ताचे शमन होते.
  • शरीरातील जलीय आणि पार्थिव घटक जसे रक्तधातू, मांस, मेदधातू, शुक्रधातू यांची चांगली वाढ आणि पोषण कस्टर्ड खाल्ल्याने होते.
  • रक्ताल्पता, वजन कमी असणे, कुपोषण, शुक्रधातू विकृती अशा रोगांमध्ये फायदा होतो.
  • पोट साफ होत नसेल, मळ बनत नसेल तर कस्टर्ड खाण्याने फायदा होतो.
  • रक्त कमी असेल तर दुधाचे बरेच पदार्थ खाण्याने फायदा होतो. कस्टर्डनेही हा फायदा होतो.
  • कुपोषित व्यक्ती, टीबी होऊन गेलेले रोगी, ज्यांचे वजन वाढत नाही अशांनी कस्टर्ड जेवणासह नियमित खावे. दोन-तीन महिन्यांत फायदा दिसतो.
  • शुक्रधातू पुरुष आणि स्त्राr दोघांमध्येही उपयुक्त असतो. गर्भधारणा होण्यासाठी उत्कृष्ट बीज तयार होणे अत्यावश्यक असते. आठवडय़ातून दोन-तीन वेळा जेवणासह एक वाटी कस्टर्ड खाल्ल्याने फायदा होतो.
  • स्त्रीमध्ये पाळीच्या वेळी रक्तस्राव जास्त होण्याची सवय असेल तर त्यामुळे बरेच वेळा शरीरात रक्त कमी बनते. अशा वेळी कस्टर्ड खाल्ल्याने फायदा होतो.
  • कस्टर्ड हे पचनास थोडे जड असते. त्यामुळे उत्तम पचनशक्ती असेल तरच खावे. तसेच नियमित आणि उत्तम प्रतीचा व्यायाम केल्याने सर्वाधिक फायदा होतो.
  • तोंड येणे यामध्ये चघळून खाल्ल्यास अधिक लाभदायी.
  • आम्लपित्तामध्ये जळजळ, आग होत असता फायदा होतो.
  • खूप तहान लागत असेल तर फायदा होतो.
  • वाताचे आणि पित्ताचे रोग असतील तर कस्टर्ड पथ्यात कसे खावे हे प्रत्येकाने आपापल्या वैद्यांना विचारावे.
  • कोरडय़ा, वाळवंटी प्रदेशात कस्टर्डसारखे दुधापासून बनणारे पदार्थ उत्तम फायदेशीर ठरते.

 निषेध

  • सर्दी, दमा, कफाचे रोग, सायनसचे त्रास, कानाचे रोग, डोळय़ांचे रोग यामध्ये कफाचा जोर असेल तर कस्टर्ड खाऊ नये.
  • अपचन, भूक कमी लागणे, जुलाब लागण्याची सवय, ग्रहणी रोग असेल तर खाऊ नये.
  • हृद्रोग, सूज येण्याची सवय असेल तर खाऊ नये.
  • मूत्रवह संस्थेचे रोग असतील, मूतखडे होणे वगैरे त्रास असतील तर खाऊ नये.
  • चरबी किंवा स्थूलता, मेदोरोग असेल तर खाऊ नये.
  • दमट, समुद्रसपाटीपासून जवळ असलेल्या देशात नित्य वापराला योग्य नाही.
  • मद्यपानानंतर खाऊ नये. यासोबत किंवा एकत्र करून फळांचे प्रकार खाऊ नयेत. अनेक रोग निर्माण होतात.
  • एकावेळी जास्त खाऊ नये. खायचे असेल तर 100 ते 150 ग्रॅमपर्यंत भूक बघून खावे हे बरे.

[email protected]