दिल्ली डायरी – केंद्रातील सरकार आणि ‘केजरीवाल फोबिया’

>> नीलेश कुलकर्णी  

केंद्रातील विद्यमान सत्ताधारी स्वतःला सर्वशक्तीमान समजत असले तरी दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याबद्दलचा ‘फोबिया’ त्यांच्या मनातून जायला तयार नाही. आजवर केजरीवालांसोबत केंद्रीय सरकारने अनेक नायब राज्यपालांचा कलगीतुरा लावून दिला. आता केजरीवाल यांच्या सिंगापूर यात्रेला कोलदांडा घालण्यात आला आहे. केजरीवाल गुजरातमध्ये ‘खेलो होबे’ करू शकतात. त्यामुळेच येनकेन प्रकारेण त्यांच्याभोवती वादाची मफलर आवळण्याचा दिल्लीकरांचा प्रयत्न आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्रातील भाजप सरकार यांच्यातील संघर्ष आणि कलगीतुरा नवीन नाही. नायब राज्यपालांच्या माध्यमातून भाजप सरकारने केंजरीवाल यांना अनेकदा अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. आता त्यांच्या सिंगापूर दौऱ्याला कोलदांडा घातला गेला आहे. एका समिटसाठी केजरीवाल सिंगापूरला जाणार होते. मात्र त्यात अडथळे निर्माण करण्यात आले. हे कोत्या मनोवृत्तीचे निदर्शक आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीत केजरीवाल आणि त्यांचा आम आदमी पक्ष भाजपला आव्हान देऊ शकतो हे लक्षात आल्याने केजरीवाल आणि त्यांचा ‘आप’ यांचा जीव चिमटीत पकडण्याचा दिल्लीच्या सर्वशक्तिमान सत्ताधीशांचा प्रयत्न आहे. अर्थात त्यामागचे कारण आहे ते गुजरातच्या विधानसभा निवडणुका. केजरीवाल दिल्ली, फार फार पंजाबपुरते मर्यादित होते तोवर ठीक होते, मात्र केजरीवालांच्या राष्ट्रीय राजकारणातल्या महत्त्वाकांक्षा वाढल्या. विशेषतः गुजरातच्या विधानसभा निवडणुकीसाठी केजरीवालांसाठी ताकद पणाला लावली आहे. दिल्लीकरांना दिलेली ‘फुकट’च्या आश्वासनांची खैरात केजरीवालांनी गुजरातमध्ये द्यायला सुरुवात केली आहे. हार्दिक पटेलांसारखा पाटीदार नेता भाजपमध्ये गेल्यानंतर भाजपला विधानसभेसाठी तसे तगडे आव्हान नव्हते.

काँग्रेसची अवस्था गलितगात्र आहे, मात्र विरोधी पक्षाची ही स्पेस भरून काढत केजरीवालांनी भाजपच्या नाकात दम केला आहे. मुळातच गुजरातमधील अनेक वर्षांची असलेली ऍण्टी इन्कमबन्सी आणि मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांची सुमार कामगिरी यामुळे भाजपचे टेन्शन वाढले आहे. विजय रूपाणींच्या काळात गुजरातमध्ये भ्रष्टाचाराचा कळसाध्याय गाठला होता. त्यानंतर सामाजिक समीकरणांचा विचार करून पाटीदार समाजाच्या पटेलांना कोणाच्याही ध्यानीमनी नसताना मुख्यमंत्रीपदी नेमण्यात आले. मात्र त्यामुळे फारसा फरक पडलेला दिसत नाही. गुजरातच्या गेल्या विधानसभा निवडणुकीतच सत्ताधाऱ्यांची सत्ता टिकवताना दमछाक झाली होती. आता त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.

केजरीवाल गुजरातमध्ये ‘खेलो होबे’ करू शकतात. त्यामुळेच येनकेन प्रकारेण त्यांच्याभोवती वादाची मफलर आवळण्याचा दिल्लीकरांचा प्रयत्न आहे. एकीकडे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे ढोल वाजवायचे आणि दुसरीकडे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकारावर गदा घालायची, असा दुटप्पी कारभार सध्या सुरू आहे.‘केजरीवाल फोबिया’तून दिल्लीकर कधी बाहेर पडतात तोवर अजून काय काय घडते हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

नायडूंची खंत

व्यंकय्या नायडू यांना मावळते उपराष्ट्रपती म्हणून सन्मानपूर्वक निरोप देण्यात येईल. व्यंकय्या तसे संघ स्वयंसेवक. एकेकाळी ते आडवाणींचे हनुमान म्हणून ओळखले जायचे. उपराष्ट्रपती आपल्याकडे पुढे जाऊन राष्ट्रपती होतात हा परिपाठ असतानाही व्यंकय्यांना ती संधी नाकारण्यात आली. भाजपाध्यक्ष, केंद्रीय मंत्री, राज्यसभा सभापती अशा विविध भूमिका व्यंकय्यांनी लीलया पार पाडल्या. लौकिकार्थाने ते मासलीडर नसले तरी दाक्षिणात्य असूनही शाब्दिक कोटय़ा आणि भाषेवरची पकड, समोरच्याची फिरकी घेण्याची सवय यामुळे व्यंकय्या कायमच मीडियाचे आवडते नेते असायचे. भाजपचे 11 अशोका रोड हे जुने मुख्यालय असताना व्यंकय्यांच्या पत्रकार परिषदा गाजायच्या. पत्रकारांशी वैयक्तिक संबंध राखण्याची त्यांची हातोटी होती. अशा ‘मीडिया फ्रेंडली’ व्यंकय्यांवर उपराष्ट्रपती झाल्यापासून ‘प्रोटोकॉल’मुळे पत्रकारांशी संवाद साधताना मर्यादा यायच्या. मात्र पत्रकारांना उपराष्ट्रपतीपदावरून पायउतार होताना दाक्षिणात्य व्यंजने असणारी पार्टी द्यावी, असा व्यंकय्यांचा मानस होता. तशी तयारीही त्यांनी केली होती. मात्र सध्याच्या राज्यकर्त्यांच्या ‘नावडती’च्या यादीत पत्रकार असल्याने व्यंकय्यांना  इच्छा असूनही पत्रकारांसाठी मेजवानी आयोजित करता आली नाही. ही खंत त्यांनी खासगीत बोलूनही दाखवली. उपराष्ट्रपतीपदाच्या जबाबदारीतून पूर्णपणे मुक्त झाल्यानंतर व्यंकय्या पुन्हा एकदा पत्रकारांसोबतची गप्पांची मैफल रंगवतात काय, याची वाट पाहावी लागेल.

[email protected]