दिल्ली डायरी – बिहारमधील बंडखोरीचा ‘चिराग’!

>> नीलेश कुलकर्णी  

दिवंगत केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय राजकारणात प्रदीर्घ काळ महत्त्वाचे नेते राहिलेले रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीमध्ये आणि पासवान परिवारात फूट पडली आहे. रामविलास यांचे बंधू पशुपती पारस यांनी रामविलास यांचे चिरंजीव चिराग यांच्याविरोधात वेगळी चूल मांडली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी संधी साधून चिराग यांच्या विधानसभा निवडणुकीतील पाडापाडीचा वचपा काढला आहे. दुसरीकडे चिराग यांना बळ दिलेल्या भाजपनेही बिहारमधील सत्तासमतोलाचा विचार करीत चिराग यांना साथ दिलेली नाही. बिहारच्या राजकारणातील हा बंडखोरीचाचिरागआणखी काय करतो हे भविष्यात दिसेलच.

बिहारमधील राजकारणाने आणखी एक वळण घेतले आहे. तेथील एक मोठे नेते रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीमध्येच नव्हे, तर परिवारातही उभी फूट पडली आहे. ही फूट दुसऱया कोणी नाही, तर रामविलास यांचे बंधू पशुपती पारस यांनीच पाडली आहे. त्या पक्षाच्या सहापैकी पाच खासदारांनी पशुपती यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र गट स्थापन केला आहे. चिराग यांच्या विरोधातील या गटाला लोकसभेत अधिकृत गट म्हणून मान्यताही मिळाली आहे. राजकारणात उपकाराची परतफेड उपकाराने होतेच असे नाही याची प्रचीती सध्या चिराग घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना चिराग रामाचा अवतार मानतात आणि स्वतःला त्यांचे ‘हनुमान’ समजतात. मात्र या आधुनिक हनुमानाचे घर फुटत असताना त्यांच्या मदतीला कोणीही धावले नाही. चिराग हे पक्षात एकाकी पडल्याने रामविलास यांच्या जागी केंद्रीय मंत्री करू, हे भाजपने दिलेले आश्वासनही आता हवेत विरलेले आहे.

सध्या एकाकी पडलेल्या चिराग यांना बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने मोठे बळ दिले होते. पाडापाडी करून नितीशबाबूंपेक्षा जास्त जागा जिंकायच्या आणि बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री बसवायचा हे भाजपचे धोरण होते. या निवडणुकीच्या काळातच रामविलास पासवानांचे निधन झाले. त्या सहानुभूतीचाही चिराग यांना फायदा होईल असा भाजपचा होरा होता. भाजपच्या पाठबळाच्या जोरावर चिराग यांनी नितीशबाबूंचे किमान 32 उमेदवार पाडले. चिराग यांना एकाही जागेवर पक्षाचा चिराग पेटवता आला नाही हा भाग अलहिदा! या पाडापाडीची बक्षिसी म्हणून केंद्रात मंत्रीपदाचे गाजर चिराग यांना दाखविण्यात आले होते. मात्र, पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर देशातील राजकीय माहोल बदलला. चिराग यांना मंत्री केले तर बिहारमधील सत्तेवर उदक सोडावे लागेल, अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे भाजपने लोकजनशक्तीमधील घडामोडींकडे दुर्लक्षच केले. नितीशबाबू व चिराग यांचे चुलते पशुपती पारस हे जुने यारदोस्त. नितीशबाबूंनी योग्यवेळी वचपा घेत पासवानांचा पक्ष फोडला. यावेळी भाजपाने घेतलेली बघ्याची भूमिका ही चर्चेचा विषय ठरली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात नितीशकुमारांच्या संयुक्त जनता दलाला सरकारमध्ये सामील करून घेणार असल्याची दिल्लीत जोरदार चर्चा आहे. त्याच जोडीला आता अधिकृत पक्ष म्हणून मान्यता मिळालेल्या लोक जनशक्ती पक्षाचे पशुपती पारस हेदेखील नितीशकुमारांच्या पाठिंब्याने केंद्रात मंत्री होतील, असे बोलले जात आहे. हा सगळा प्रकार चिराग पासवान यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो, हा धडा यानिमित्ताने चिराग यांनी गिरवायला हवा.

नवीनबाबूंचे ‘सुरक्षित अंतर राखा’

patanayakओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक मध्यंतरी चांगलेच चर्चेत आले होते. कोरोना काळात केंद्रावर आर्थिक भार असल्याने राज्यासाठी केंद्राकडे मदत मागणार नाही, अशी बाणेदार वगैरे भूमिका त्यांनी घेतली होती. अर्थात त्यामागेही राजकारण होते हे आता उघड झाले आहे. शांतपणे काम करण्याची नवीनबाबूंची एक खासियत आहे. वडिलांचे निधन झाल्यानंतर नवीनबाबू अपघाताने राजकारणात आले आणि इतके घट्ट पाय रोवून उभे राहिले की, सध्याच्या घडीला ओडिशात त्यांच्या आसपासच्या उंचीला पोहचेल असा नेता कोणत्याच राजकीय पक्षात नाही. ओडियासारखी मातृभाषा अवगत नसतानाही नवीनबाबूंनी जनमानसावर विलक्षण पकड बसवली आहे हे विशेष! नवीन पटनाईक हे संयमी वृत्तीचे नेते असले तरी शेवटी राजकारणी आहेत. विशेषतः दिल्लीमध्ये कोणी नेता पक्षात मोठा होऊ नये याकडे त्यांचा नेहमीच कल राहिला आहे. बिजू जनता दलामध्ये एकापेक्षा एक सरस विद्वान नेते असताना त्या पक्षाच्या नेत्यांना कधीही राष्ट्रीय स्तरावर मंत्री वगैरे म्हणून काम करण्याची संधी मिळाली नाही. याचे कारण म्हणजे नवीनबाबूंनी नेहमीच काँगेस व भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांपासून दूर राहण्याचे अंगिकारलेले ‘सुरक्षित अंतर राखा’ हे धोरण. त्यामुळे भृतहेरी मेहताब, तथागत सत्पथी, पिनाकी मिश्रा यांच्यासारख्या नेत्यांचे कॅलिबर काही कामाला आले नाही. भाजपने पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर नवीनबाबूंशी जवळीक साधण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र, नवीनबाबूंनी भाजपचा प्रयत्न पाल झटकावी अशा पद्धतीने झटकून लावला आहे. लोकसभेचे उपसभापतीपद मेहताब यांना देण्याची चाल भाजपकडून रचली गेली होती; मात्र नवीनबाबूंनी भाजपचा प्रस्ताव काही स्वीकारलेला नाही. बिगर भाजप व बिगर काँग्रेसी आघाडीचा चेहरा होण्याचा नवीनबाबूंचा एक भविष्यकालीन मानस आहे असे म्हणतात. त्यातूनच नवीनबाबूंनी ‘सुरक्षित अंतर राखा’ हे धोरण अवलंबले असावे.

‘मेट्रोमॅन’ पुन्हा चर्चेत…

shreedharanराजधानी दिल्लीसह अनेक ठिकाणी मेट्रो रेल्वेच्या यशस्वी उभारणीचे जनक म्हणून ई. श्रीधरन यांच्याबद्दल सर्वांनाच आदर आहे. दरम्यानच्या काळात श्रीधरन यांनी भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून केरळच्या विधानसभा निवडणुकीत उडी मारली होती; मात्र या निवडणुकीत भाजपचा पुरता फडशा पडला. दुर्दैवाने देशाचे मेट्रोमॅन असलेल्या श्रीधरन यांनाही दारुण पराभव पत्करावा लागला. हे सगळे घडल्यानंतर तरी श्रीधरन या राजकीय जंजाळातून बाहेर पडतील आणि एक सन्मानाचे निवृत्तीचे जीवन शानदारपणे व्यतीत करतील असे वाटत होते. मात्र, एकीकडे पंचाहत्तरी पार केलेल्या नेत्यांना ‘मार्गदर्शक मंडळा’त पाठविण्याचा सध्याच्या भाजप नेतृत्वाने धडाका लावलेला असताना ऐंशी पार करूनही श्रीधरन यांच्या खांद्यावरचे जबाबदारीचे ओझे काही हलके होताना दिसत नाही. केरळच्या निवडणुकीनंतर भाजपच्या काही नेत्यांकडे हवालाचे घबाड सापडले. त्यावर भाजपच्या शिरस्त्याप्रमाणे त्या पक्षाने एक समिती नेमली. सज्जन वृत्तीचे श्रीधरन आता या हवाला घोटाळय़ाची चौकशी इमानदारीने करत आहेत. राज्याचे माजी पोलीस महासंचालक जेकब थॉमस व माजी आयएएस सी. बी. आनंद बोस हेही या तपास समितीमध्ये श्रीधरन यांना मदत करत आहे. श्रीधरन यांच्यासारख्या निस्पृह माणसावर भाजप नेत्यांच्या हवालाच्या पैशाची चौकशी करण्याची वेळ आली आहे. आता त्यातच श्रीधरन यांची लक्षद्वीपच्या प्रशासकपदी नेमणूक करा, अशी मागणी लक्षद्वीपच्या भाजप नेत्यांनी केली आहे. पंतप्रधानांचे आवडते प्रफुल्ल खोडा पटेल यांनी नजीकच्या काळात घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे लक्षद्वीपमध्ये प्रचंड असंतोष आहे. हा गोंधळ दूर करण्यासाठी श्रीधरन यांच्यासारख्या सक्षम माणसाला नेमा, अशी मागणी पुढे येत आहे. खरे तर श्रीधरन यांनी आता थांबायला हवे. तेच त्यांच्या हिताचे ठरेल.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या