दिल्ली डायरी – लोकसभा निवडणुकीने ‘महाशक्ती’ला दिलेला धडा!

>> नीलेश कुलकर्णी  

मोदींच्या राजकीय आयुष्यातील सर्वाधिक कठीण निवडणूक, असे यावेळच्या लोकसभा निवडणुकीचे वर्णन करावे लागेल. मोदींच्या लाटांमध्ये लाखोंच्या मताधिक्याने निवडून आलेल्या भाजप उमेदवारांना यावेळी मोदी गॅरंटी नकोशी झाली होती. अमित शहा यांच्या तर सभा लावू नका, असे सांगण्यापर्यंत वेळ भाजपच्या उमेदवारांवर आली. हा लोकसभा निवडणुकीने महाशक्तीला दिलेला धडा आहे.

मोदींना जनतेने पुन्हा प्रेमाने निवडून द्यावे, अशी त्यांची गेल्या दहा वर्षांतली कामगिरी नाही. ज्या ज्या घटकांनी मोदींना यशोशिखरावर नेले त्यांना त्यांना नेस्तनाबूत करण्याचे काम मोदींनी केले. ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून वगैरे ते घडले त्या संघाची आम्हाला आता गरजच नाहीये, अशी कृतघ्न भूमिका त्यांनी घेतली. या मोदीनीतीमुळे संघ सध्या दक्ष आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी संघाच्या शाखांवर वरवंटा फिरवला होता. मात्र भाजपकडे पर्याय नसल्याने मोदींना प्रमोट करावे लागले. आता मोदी भाजप, संघ व संघटना या सगळय़ांनाच वरताण झाले आहेत.

नरेंद्र मोदी सत्तेवर आले ते अच्छे दिनचे आश्वासन देऊन. मात्र देशात दहा वर्षांत अच्छे दिनचा कवडसाही कुठे पडला नाही.  मध्यमवर्गाला गरीब आणि उच्च मध्यमवर्गाला मध्यमवर्गीय बनविण्याची करामत मोदींच्या आर्थिक धोरणाने केली. राम मंदिराचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाचा. त्यात मोदींचे काडीचेही योगदान नसताना त्याचे श्रेय घेण्याचा खटाटोप झाला. जनतेला एक वेळा मूर्ख बनविता येते. मात्र अनंतकाळासाठी मूर्ख बनविता येत नाही. त्यामुळेच या निवडणुकीत जनतेनेच मोदींचा घाम काढला. मोदींच्या राजकीय आयुष्यातील सर्वाधिक कठीण निवडणूक, असे यावेळच्या लोकसभा निवडणुकीचे वर्णन करावे लागेल. मोदींच्या तथाकथित निर्माण केलेल्या लाटांमध्ये लाखोंच्या मताधिक्याने निवडून आलेल्या भाजप उमेदवारांना या वेळी मोदी गॅरंटी नकोशी झाली होती. मोदींच्या विरोधातील रोषाचा फटका आपल्याला बसू शकतो, अशी धास्ती अनेक उमेदवारांच्या मनात होती. भाजपचे स्वयंघोषित चाणक्य अमित शहा यांच्या तर सभा लावू नका, असे सांगण्यापर्यंत वेळ भाजपच्या उमेदवारांवर आली. हा लोकसभा निवडणुकीने महाशक्तीला दिलेला धडा आहे. मोदी कोणता ताम्रपट घेऊन आलेले नाहीत. मोदी हरू शकतात, हा विश्वास जनतेने लोकसभा निवडणुकीत दाखवून दिला आहे. प्रत्यक्षात निकाल काय येतील, हे उद्या कळेलच.

‘कॅप्टन’ लापता!

पंजाबमध्ये शीख समुदायाची भाजपला सहानुभूती मिळावी यासाठी निवडणूक आयोगाने हुकमाच्या ताबेदारीनुसार ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’च्या भळभळत्या आठवणींच्या दिवशीच मतदानाचा मुहूर्त (1 जून) मुक्रर केला. पंजाबमध्ये सगळय़ा राजकीय फोडाफोडीनंतर   हाही एक हथकंडा दिल्लीतील महाशक्तीने आजमावून पाहिला आहे. मात्र हे सगळे करत असताना ज्यांच्या भरवशावर पंजाबात भाजपने आपली ताकद लावली ते आयात माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हेच संपूर्ण निवडणुकीत ‘लापता’ झाले आहेत. अमरिंदर यांनी काँगेसमधून फुटून सुरुवातीला आपला पक्ष स्थापन केला. त्यानंतर तो पक्ष भाजपमध्ये विसर्जितही केला. आता कॅप्टनपाठोपाठ त्यांच्या पत्नी परनीत कौर यादेखील भाजपमध्ये आल्या. त्या लोकसभेची निवडणूक लढवित आहेत. मात्र तरीही अमरिंदर पत्नीच्याही प्रचारात फिरकले नाहीत. त्यांची तब्येत अत्यंत नाजूक असल्याचे सांगितले जात असले तरी त्यात काही फारसे तथ्य नाही. देशात व पंजाबात भाजपविरोधात वारे आहे. विशेषतः पंजाबमध्ये गावागावांमध्ये भाजपच्या उमेदवारांना शेतकरी वर्ग पिटाळून लावत आहे. कॅप्टन यांना काँगेसमध्ये असताना पंजाबात एक वेगळाच सन्मान मिळायचा. आयुष्याच्या संध्याकाळी हा सन्मान गमावून बसायला लागू नये म्हणून कॅप्टन यांनी आजारपणाचा बहाणा केला आहे. कॅप्टनपाठोपाठ या निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेले रवनीत बिट्टू व सुशीलकुमार सिंग यांच्या हृदयाची धडधडही या भाजपविरोधी लाटेने वाढली आहे. ‘घर फिरले की घराचे वासे फिरतात.’ भाजपने थाटामाटात आयात केलेले एकेक प्रस्थापित नेते घरवापसी करताहेत किंवा कॅप्टनसारखे गायब तरी होताहेत.

वाराणसीची धाकधूक

नरेंद्र मोदी हे केवळ देशातीलच नव्हे तर जगातील सर्वशक्तिमान नेते आहेत, असा त्यांच्या भक्तमंडळींचा दावा असतो. ‘मोदी गॅरंटी’वर तिसऱ्यांदा भाजपचे सरकार येईल, असे या भक्तमंडळींचे अनुमान आहे. मात्र वाराणसीमध्येच मोदींच्या मनात विजयाची धाकधूक आहे काय? असा प्रश्न त्यांची एकंदरीत प्रचार यंत्रणा पाहून पडतो. एवढी मोठी विकासकामे केली असतील तर खरे तर मोदींना प्रचार करण्याची गरज नव्हती. मात्र वाराणसीमध्येही मोदींना घर घर फिरावे लागले, हे काही चांगले लक्षण नाही. त्यातच लोकसभेची निवडणूक लढविणारे तीन उमेदवार मोदींच्या प्रचार यंत्रणेत होते. त्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. राजस्थानच्या सीकरमधून निवडणूक हरण्याच्या अवस्थेत असलेले भाजपचे उमेदवार सुमेधानंद सरस्वती वाराणसीमध्ये फिरत होते. झारखंडच्या खुंटीमधून निवडणूक लढवित असलेले केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडांही मोदींच्या आसपास होते तर मुजफ्फरनगरचे उमेदवार संजीव बालियानदेखील या यंत्रणेचा हिस्सा होते. वास्तविक, हे तिन्ही उमेदवार आपापल्या जागा जिंकतील की नाही, याची गॅरंटी नसताना हे तिघेही आपले मतदारसंघ सोडून वाराणसीवासी का झाले होते? याबद्दल खमंग चर्चा सुरू आहे. सुमेधानंद सरस्वतींच्या पंथाचे मतदार वाराणसीमध्ये आहेत. काही आखाडय़ांमध्ये त्यांच्या शब्दाला किंमत आहे. त्याचा सद्उपयोग पंतप्रधानांना मते मिळावीत यासाठी केला गेला. बालियन यांच्या रूपाने जाट व ठाकूर मते वळविण्याचा प्रयत्न झाला तर मुंडा यांच्या माध्यमातून दलित व अदिवासी मतदारांना चुचकारण्याचे प्रयत्न केले गेले. खुद्द नरेंद्र मोदींना हे हथकंडे आजमावे लागले असतील तर या निवडणुकीत मोदी व भाजपविरोधात जनक्षोभ मोठय़ा प्रमाणावर होता याचाच हा पुरावा आहे.

[email protected]