दिल्ली डायरी – उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री बदल होणार का?

>> नीलेश कुलकर्णी  

सहा महिन्यांपूर्वी उत्तराखंडचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेल्या पुष्करसिंग धामी मुख्यमंत्रीपदी राहतील की जातील याविषयी सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आगामी  लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने तयारी सुरू केली असून दिल्लीकरांच्या प्लॅनमध्ये ‘फिट न बसणाऱ्या अनेकांना नारळ दिला जाण्याची चिन्हे आहेत. धामी सरकारच्या सहा महिन्यांतील ‘भ्रष्टाचाराच्या कहाण्या दिल्लीपर्यंत पोहोचल्याने धामी गोत्यात आले आहेत. धामी खुर्ची वाचवतात की उत्तराखंडला महिला मुख्यमंत्री मिळते ते दिसेलच.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा नारा देत असतात. उत्तराखंडमधील पुष्कर सिंग धामी सरकारच्या सहा महिन्यांतील ‘भ्रष्टाचाराच्या कहाण्या दिल्लीपर्यंत पोहोचल्याने मुख्यमंत्री सिंग धामी गोत्यात आले आहेत. शिक्षक भरती घोटाळ्यात थेट धामींवरच आरोप होत आहेत. त्यातच पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी त्यांना दिल्लीत तीन दिवस अडकून पडावे लागले. त्यामुळे त्यांच्या गच्छंतीची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळ फेरबदलासाठी धामी प्रयत्नशील असल्याचे एका गटाकडून सांगितले जात असले तरी धामींविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची दिल्लीकरांनी गंभीर दखल घेतली असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे देशात डझनभराहून अधिक राज्यांत भाजपची सत्ता आहे. मात्र एकाही राज्यात महिला मुख्यमंत्री नाही. त्यामुळे उत्तराखंडला भविष्यात पहिली महिला मुख्यमंत्री मिळण्याचीही जोरदार चर्चा आहे. आपली खुर्ची वाचविण्यासाठी ‘गॉडफादर’ महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यामार्फतही धामी यांचा आटापिटा सुरू आहे. आता धामी खुर्ची वाचवतात की उत्तराखंडला महिला मुख्यमंत्री मिळते ते दिसेलच.

तीरथसिंग रावत यांना केवळ कुंभमेळ्यापुरते मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करून लगेच हटविल्यानंतर पुष्कर सिंग धामी या कधीकाळी भगतसिंह कोश्यारी यांचे ओएसडी असलेल्या तरुणाच्या गळ्यात भाजपने मुख्यमंत्रीपदाची माळ घातली होती. धामी यांच्या नेतृत्वाखालीच विधानसभा निवडणूक लढविण्यात आली. त्यात भाजपला मोठे यश मिळाले, पण स्वतः धामी यांचा पराभव झाला (की केला गेला). तरीही दिल्लीकरांनी धामींवरच विश्वास दाखवला. त्यांच्याकडे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली. मात्र दुसऱ्या टर्ममध्ये धामी बदनाम झाले आहेत ते भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे. सहा महिन्यांपासून देवभूमीत अनागोंदी माजली आहे. मुख्यमंत्र्यांसह प्रत्येक मंत्री आपल्या मर्जीनुसार कारभार हाकत आहेत, अनेक निर्णय वादग्रस्त ठरले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भ्रष्टाचाराचे आरोप होणे भाजपला गैरसोयीचे आहे. त्यामुळेच भाजप भ्रष्टाचाराविरोधात कडक धोरण अवलंबते हे दाखविण्यासाठी का होईना, भाजपला धामींविरोधात भूमिका घ्यावी लागणार आहे. अर्थात, ही भूमिका कधी घेतली जाणार? हाही एक प्रश्न आहे. भाजपचे संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी भेटीसाठी धामी यांना ताटकळत ठेवले होते. हे संकेत पुष्करसिंग यांच्यासाठी शुभ नाहीत. उत्तराखंडमध्ये महिला मुख्यमंत्री हा नवा प्रयोग भाजप करू शकते. त्यासाठी चेहऱ्याची शोधाशोध सुरू आहे.

‘भगवंता’ काय हे?

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान आणि वाद यांचे फार जुने नाते आहे. विदेशातून हिंदुस्थानात परतत असताना भगवंतसिंग हे दारूच्या नशेत तर्र असल्याने त्यांना विमानातून खाली उतरविण्यात आले. पंजाबची प्रतिमा यामुळे जगभरात मलिन झाली, असा आरोप अकाली दलाचे नेते सुखबीर बादल यांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अर्थात, ‘आप’ने अपेक्षेप्रमाणे भगवंतसिंग यांचा बचाव केला आहे. तरीही काही प्रश्न अनुत्तरितच राहतात. प्रत्येक राजकीय नेत्याचे एक वैयक्तिक आयुष्य असते. त्यात डोकावण्याचे काहीच कारण नाही. मात्र वैयक्तिक छंद सार्वजनिक झाले की, मोठा गोंधळ उडतो. भगवंतसिंग मान हे संगरूरचे खासदार असताना लोकसभेत त्यांच्याच पक्षाच्या खासदाराने तत्कालीन लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्याकडे ‘मेरे सहयोगी सुबह सुबह देसी शराब पीकर आते है. मेरे पास बैठते है. मुझे इसकी बदबू से समस्या है. कृपया मेरी सीट बदल दे’, अशी लेखी विनंती केल्यामुळे भगंवतसिंग यांचा ‘घमघमाट’ देशपातळीवर पोहोचला होता. त्यांनी एके दिवशी संसदेच्या अत्यंत संवेदनशील अशा सुरक्षाविषयक यंत्रणांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले होते. त्यावेळी त्यांच्यावर कठोर कारवाई होता होता राहिली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर तरी मान हे जुन्या सवयी बदलून ज्या मोठय़ा अपेक्षेने पंजाबच्या जनतेने निवडून दिले आहे, त्यासाठी काहीतरी करतील अशी अपेक्षा होती. मात्र, पंजाबची अवस्था ‘उडता पंजाब’ ते ‘झुलता पंजाब’ अशी दुर्दैवाने सुरू आहे. भगवंतसिंग मान यांच्या बाबतची बातमी प्रपोगंडा किती आणि खरी किती, याबद्दल वाद होऊ शकतो. देशपातळीवर केजरीवालांचा दबदबा वाढत असताना त्यांच्या पक्षाला अडचणीत आणण्याच्या विविध खेळ्या खेळल्या जात आहेत. अशा खेळ्यांना भगवंतसिंग मान यांनी ‘चिअर्स’ करू नये इतकेच!

गणेशन यांचे ‘फोटोप्रेम’

2014 नंतर आपल्या देशात फोटोला अनन्यसाधारण असे महत्त्व आले आहे. सब कुछ फोटोग्राफी असाच प्रकार आहे. बाकी कर्तृत्व आणि कर्तव्य काही नसले तरी फोटोत दिसले पाहिजे यासाठी विलक्षण चढाओढ दिसून येते. पंतप्रधान स्वतःही आपल्या फोटोबाबत भलतेच दक्ष असतात. मात्र फोटोचा यावेळचा किस्सा आहे तो पं. बंगालच्या राज्यपालांचा. जगदीप धनखड उपराष्ट्रपती झाल्यानंतर पश्चिम बंगालचे राज्यपाल कोण? याचे उत्तर खरे तर कोणालाच पटकन देता येणार नाही. मात्र एन. गणेशन नावाचे महोदय तिकडे राज्यपाल आहेत. त्यांच्या एका कृतीने त्यांचे नाव सध्या देशभर आणि जगभरात पोहोचले आहे, झाले असे की, एका फुटबॉल स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ राज्यपाल गणेशन यांच्या हस्ते झाला. देशाचा अभिमान असलेल्या फुटबॉलपटू सुनील छेत्री याने पारितोषिक स्वीकारले. यावेळी फोटो काढताना राज्यपाल महोदयांनी चक्क छेत्रीला बाजूला ढकलल्यामुळे नेटकरी चांगलेच खवळले आहेत. कोण हे गणेशन? असा सवाल ही नेटकरी मंडळी विचारू लागली आहेत. अर्जेंटिनाचा लियोनेल मेस्सी आणि पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्या बरोबरीने गोलचा विक्रम ज्याच्या नावावर आहे, त्या छेत्रीला राज्यपालांनी केवळ फोटोफ्रेममध्ये येण्यासाठी बाजूला ढकलणे हे नक्कीच संतापजनक आहे.

[email protected]