दंताजींची गोष्ट

506

>> डॉ. मानसिंग पवार – माजी अधिष्ठाता, शासकीय दंतमहाविद्यालय, रुग्णालय

दंतविज्ञान आपल्या आरोग्याची खूपच महत्त्वाची शाखा. आज आपले दंतचिकित्साशास्त्र खूपच प्रगत झाले आहे. येत्या शुक्रवारी जागतिक दंतवैद्य दिन आहे. त्यानिमित्ताने दंतवैद्यकीची मजेदार सफर.

दंतवैद्यकशास्त्र. आरोग्य शाखेतील एक अपरिहार्य शाखा. प्राचीन काळात या शाखेची मुळे अगदी अश्विनीकुमारांपर्यंत गेली असावीत. अर्थात हा पुराणकाळ वगळता त्याअलीकडचा आदिमकाल पाहिला तर हे दंतवैद्यक विज्ञान आणि त्याचे उपचार खूपच अवघड व वेदनादायी होते. मुळात आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीतील दोन चांगल्या सवयी म्हणजे काहीही खाल्यानंतर चुळा भरणे, तोंड स्वच्छ करणे आणि गुळण्या करणे. पाश्चात्य संस्कृतीत या सवयींचा अभाव असल्याने आपल्या आणि त्यांच्या उपचार पद्धतीत बराच फरक आढळतो. आपल्याकडे चरक, सुश्रूत आणि वाग्भट यांच्या वैद्यक गंथांतून दंतविज्ञानाविषयी खूप माहिती आढळते. तेव्हा कृत्रिम दात बसविण्याचे काम वैद्य न करता सोनार किंवा तत्सम कारागीर करीत असत. तेसुद्धा फक्त समोरचे, शोभेचे दात बसवीत आणि ते फक्त श्रीमंतांनाच परवडत असे.

यातूनच आपल्याकडे चीनमधून दंतवैद्य येण्यास सुरुवात झाली. चीनमध्ये दंतवैद्यकीचा परंपरागत व्यवसाय होता. यापैकी बरेचसे दंतवैद्यक मुंबईत येऊन स्थिरावले. अगदी आजतागायत त्यांचे नोंदणी केलेले दवाखाने मुंबईत दिसायचे.

जवळजवळ सत्तरच्या दशकापर्यंत वैद्यकीय किंवा दंतशास्त्राचा विकास झालाच नव्हता. त्यावेळेला आपल्या देशात तसेच चीन, इजिप्तमध्ये चिनी लोक पारंपरिकरीत्या त्यांचा दंतवैद्यकीचा व्यवसाय करत होते. सुरुवातीला फक्त दात काढण्याचीच प्रक्रिया व्हायची. यातही चीनमध्ये ठरावीक समाजातील लोक दंतवैद्यकीचा सराव करायचे, मात्र ते शिकलेले दंततज्ञ नव्हते. दातात चांदी भरण्याचा उगम चीनमध्येच झालेला आहे. कोलकात्याला पहिल्यांदा असे चीनी दंतवैद्य आले. ते मुळात उत्कृष्ट कलाकारच होते. शिवाय त्यावेळी दात बसवणे वगैरे वैज्ञानिक संकल्पना नव्हत्या.

दंतवैद्यांचा इतिहास बघितला तर इ.स. 700पासून या कलेचा उगम झाला आहे. किडलेला दात किंवा दाताची कीड असे आपण म्हणतो. याला वर्म म्हणजे दाताचा किडा असं समजलं जातं होतं. हा किडा दाताला खराब करतो. ही एवढीच संकल्पना त्या काळी अस्तित्वात होती. याला टूथवर्म म्हणतात. त्यानंतर 70च्या दशकापर्यंत दंतविज्ञान प्रगत झालं नव्हतं. त्या वेळेला प्रशिक्षित दंतवैद्यही नव्हते. प्रशिक्षणही दिलं जात नव्हतं. दंतशास्त्राबद्दल बोलायचं म्हटलं तर, 1723 साली बेरी फोचार्ड या शल्य चिकित्सकाने एक पुस्तक लिहिलं. यामध्ये दात आणि मुखरोग कोणते असतात, त्यावर कोणते उपचार करावेत ही माहिती दिली होती. तेव्हापासून दंतविज्ञानाचा उगम झाला. त्यानंतर 1840 साली पहिल्या दंत महाविद्यालयाची स्थापना झाली. अमेरिकेमध्ये 1841 साली जगातला पहिला दंतशास्त्रातला कायदा पारित झाला.

आपल्या देशातल्या दंतशास्त्राबाबत सांगायचं झालं तर सद्यस्थितीत दंतशास्त्र हिंदुस्थानात अतिशय मोठय़ा प्रमाणात विकसित झालं आहे. जगाच्या तुलनेत आपल्याकडे दंतशास्त्राचा विकास पहिल्या क्रमांकावर आहे. याचं सर्व श्रेय डॉ. आर.अहमद यांना जातं. त्यांनी स्वतःचा पैसा वापरून पहिलं दंत महाविद्यालय कोलकाता येथे सुरू केलं. त्यावेळी दंतशास्त्राचं प्रशिक्षण हिंदुस्थानात दिलं जातं होतं, मात्र एक वर्षाचा कोर्स होता आणि 1935 साली हा कोर्स चार वर्षांचा झाला. सध्या आपल्या देशात 319 दंत महाविद्यालये आहेत. त्यातून 30 ते 32 हजार बीडीएस आणि 15 ते 20 हजार एमडीएस विद्यार्थी बाहेर पडतात.

दंतरोग आणि त्यावरील प्रगत तंत्रज्ञान
दंतशास्त्रात विविध प्रकारच्या शाखा तयार झाल्या. यामध्ये दंतरोग निदान आणि क्ष-किरण शास्त्र या महत्त्वाच्या शाखा आहेत. म्हटलं जातं. सुरुवातीला न्हाव्याच्या दुकानात ज्या खुर्च्या वापरल्या जात होत्या त्याही पूर्वी झाडाला बांधून किंवा खुर्चीला पकडून दात काढले जायचे. आता यामध्ये प्रामुख्याने डेंटल चेअर युनिट्स वापरलं जातं. तंत्रज्ञानाद्वारे मुख कर्करोग किंवा इतर आजारांच्या लक्षणांचा तपास करता येतो. त्यामुळे दंतवैद्यातही रोगाचं निदान आता अचूक होऊ लागलं आहे. याव्यक्तिरिक्त ऑप्टिकल कॅमही आता उपलब्ध झालेला आहे. बीडेएस आणि एमडीएस विद्यार्थ्यांना याचं प्रशिक्षण दिलं जातं. 1980साली दंतशास्त्रात थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानही विकसित झालं आहे. रुग्णाचा अपघात झालाय. तोंडाचं हाड तुटलंय. जन्मजात काही विकृती असतात. अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी थ्रीडी प्रिंटिंगचा वापर केला जातो. रुग्णाला हवे त्या पद्धतीचं उपचार करता येतात. याशिवाय वेगवेगळ्या आकाराचे इम्प्लांट रुग्णाच्या तोंडात केलं जातं. शिवाय हाड निर्माण करण्याचंही तंत्रज्ञान विकसित झालं आहे. आज अतिशय विकसित असं दंत तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

मुख शल्यशास्त्र
मायक्रोस्कोप, सीबीसीटी, ऑप्टिकल कॅम आणि थ्रीडी प्रिंटिंगचा वापर करून निदान आणि उपचार करता येतात. उपचाराचं नियोजन करता येतं. रोग कोणता आहे, किती पसरलेला आहे, कुठल्या पद्धतीने शस्त्रक्रिया केली तर कमी त्रास होईल अशा पद्धतीचे उपचार शस्त्रक्रियेद्वारे करणं शक्य आहे. पूर्वी फक्त दात काढणं एवढीच उपचार पद्धती अस्तित्वात होती. बोन डिस्ट्रक्शन, वेडेवाकडे दात आणि कोणत्याही प्रकारची चिकित्सा आता तंत्रज्ञानाद्वारे शक्य झाली आहे. चिकित्सेचं नियोजन ही व्यवस्थितरीत्या करता येतं तसेच डॉक्टर रुग्णाला उत्तम उपचाराचं आश्वासन देऊ शकतात. तोंड, दात आणि जबडय़ाच्या हाडाचे रोग यावर शस्त्रक्रिया केली जाते.

बाल दंतवैद्य शास्त्र
लहान मुलांच्या दातांची काळजी घेणे व त्यांच्या दंतविकारावर इलाज करणे हे या शाखेचे कार्य असते. चेहऱयाच्या व मुखातील कमानींच्या छोटय़ा आकारमानास शोभणारे व योग्य असे दुधाचे दात ही निसर्गाची योजना आहे. या दातांच्या आरोग्यावरच नंतर येणाऱया कायम दातांची रचना, आरोग्य वगैरे अवलंबून असते.

सौंदर्य उपचार आणि दंतचिकित्सा
दंतउपचारासाठी जे मटेरियल वापरलं जातं त्यामध्ये कम्पोझिट रेझिन वापरलं जातं. याचा रंग दातासारखा आहे. सौंदर्यचिकित्सेसाठी याचा वापर केला जातो. पोर्सलिनही वापरलं जातं. तुटलेल्या दाताचा आकारही पूर्वीच्या दातासारखा करता येतो. याला दंतशल्यशास्त्र असे म्हणतात. रुट कॅनल उपचारही याच अंतर्गत केली जाते.
कृत्रिम दात बसवणे, ब्रिज बसवणे, रिमूव्हेबल डेंक्चर, इम्प्लाट सपोर्टिव्ह असतो. ही उपचार पद्धतीही याअंतर्गत येते. ही आज अत्यंत पुढारलेली शाखा आहे.
हलणाऱ्या दातांवर उपचार करणंही याअंतर्गत होते.

दातांची काळजी
दररोज सकाळी आणि जेवणापूर्वी व जेवणानंतर ब्रश करणं. ब्रशिंग जोरात करू नये.
वर्षातून दोन वेळा दातांची तपासणी करणे.
दात काळा पडलाय किंवा तो संवेदनशील झालाय तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आहारामध्ये फळ व कच्च्या भाज्यांचा समावेश केल्याने दातांना कीड लागण्याची शक्यता कमी होते.
अति शिजलेले पदार्थ, ब्रेड, चॉकलेट्स, चायनीज, गोड पदार्थ यांचं सेवन कमी करावे.
चहा, कॉफी बऱ्याचदा दातांमध्ये होणाऱ्या पिवळेपणाला जबाबदार असतात. या पिवळेपणाला दूर करण्यासाठी माउथ वॉशचा जास्त वापर करणे टाळावे.
डेंटल फ्लॉस हा एक वॅक्स म्हणजे मेण लावलेला धागा असतो. त्याचा वापर दोन दातांमधला भाग स्वच्छ करण्यासाठी केला जातो.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या