महाराष्ट्रातील किल्ले : जिवंत म्युझियम

>> प्र. के. घाणेकर

दुर्ग संग्रहालयाची कल्पना आपण राबविली पाहिजे. यामध्ये किल्ल्यांचे शिलालेख, पडलेल्या बांधकामाचे फोटो, प्रतिकृती तसेच एखादा बुरुजाचा दगड कोसळला असेल आणि तो आता पुन्हा त्यावर बसविणे शक्य नसल्यास तो अशा अनेक गोष्टी संग्रहालयात ठेवला पाहिजे. चांगले दुर्मिळ फोटो संग्रहालयात ठेवता येतील. उत्खननात ज्या वस्तू सापडतात त्या ठेवता येतील. मूर्ती, शिलालेख यांचे संग्रहालय प्रत्येक जिल्हय़ात व्हावे. हे पर्यटन विकसित करणे गरजेचे आहे. तरच किल्ले संस्कृतीचे महत्त्व टिकून राहील.

मध्ययुगात म्हणजेच १२ ते १७व्या शतकापर्यंत जगात सगळीकडे किल्ले बांधले गेले. त्या काळात ती गरज होती किंवा किल्ले बांधण्याची पद्धत होती असे आपण म्हणूया. भू – राजनैतिक गरज त्यावेळच्या राज्यकर्त्यांची होती. त्यापूर्वीही किल्ले होते, पण त्या काळात खूपच किल्ले बांधले गेले. महाराष्ट्रात जे राजवंश होऊन गेले यामध्ये सातवाहन, राष्ट्रकूट, कदंब, यादव, शिवकाल, पेशवाई या देशी सत्तांनी किल्ले बांधले. जगातल्या तिथल्या राजसत्ताकांनी किल्ले बांधले, पण महाराष्ट्रात परधर्मी, परराष्ट्रीय व्यक्तींनी किल्ले बांधले हे आपल्याकडचे वैशिष्ट्य़ म्हणावे लागेल.

बुद्धी, बळावर जी जहागिरी मिळाली त्यातून हे किल्ले बांधले गेले. मध्य आशियातील लोकांनी किल्ले बांधले. मुरूड – जंजिरा सिद्दीने बांधला. युरोपातल्या लोकांनी काही किल्ले बांधले. यामध्ये फोर्ट ब्रिटिशांनी बांधला. पोर्तुगीजांनी केळवे, अलिबागचा किल्ला बांधला. गोव्यातही त्यांनी किल्ले बांधले. डचांनी किल्ले बांधले. डच, आफ्रिकन, ऑस्ट्रेलिया येथील लोकांनी महाराष्ट्रात किल्ले बांधले. महाराष्ट्रातील किल्ले हे जिवंत म्युझियम आहे. शिवकाळात किल्ल्यांना महत्त्व आले. प्रत्येक घडामोडीत किल्ले आहेतच. महत्त्वाचे प्रसंग किल्ल्यांवर घडले आहेत. त्यामुळे तो काळ किल्ल्यांसाठी सुवर्णकाळ होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे २०-२५ किल्ले बांधले, त्यात वैज्ञानिक प्रयोग केले. त्यांनी हे प्रयोग ठरवून केले. त्यामुळेच किल्ल्यांच्या बांधकामातही परफेक्शन दिसते. आपल्या किल्ल्यांचे वैशिष्ट्य़ म्हणजे ते आजच्या काळातल्या सगळ्यांनाच आपले वाटतात. किल्ले आपले आहेत असं वाटणं हे बाकीच्या प्रांतात दिसत नाही. महाराष्ट्रातील किल्ल्यांबद्दल जेवढे लिहिले गेले आहे तेवढे कुठल्याही इतर प्रांतातील किल्ल्यांबद्दल लिहिलेले नाही. किल्ल्यावरील साहित्य, ग्रंथांची निर्मिती प्रचंड प्रमाणात झाली, जी इतरत्र दिसत नाही. पुस्तिका, ग्रंथ, संशोधन, महाराष्ट्राव्यतिरिक्त दिसत नाही. कारण त्यांचा इतिहास किल्ल्यांशी निगडित नाही. आधुनिक विमाने, रॉकेट या तंत्रज्ञानामुळे किल्ल्यांचे महत्त्व अलीकडच्या काळात पूर्वीइतके राहिले नाही.

मात्र, इतिहासाचे साक्षीदार म्हणून किल्ल्यांचे महत्त्व कमी होणार नाही, पण त्याचा वापर सध्या होणार नाही. इतिहास समजून घेण्यासाठी त्या स्थानभेटी देण्यासाठी जावे लागते. पेशवाईच्या काळात किल्ल्यांची गरज कमी झाली. राज्याच्या सीमा विस्तारल्या गेल्या. त्यामुळे शिवकाळात जे महत्त्व होते, ते पेशवाईत संपले. पुढे अत्याधुनिक शस्त्रांचा वापर वाढला. त्यामुळे किल्ल्यांचा वापर युद्धासाठी करण्याची गरज कमी झाली. मानवी हस्तक्षेप कमी झाला. मानवी हस्तक्षेपविरहित निसर्ग जागा कशा असतात हे किल्ल्यांवर गेल्यावर कळतं. हा निसर्ग पाहण्यासाठी किल्ल्यावर आवर्जून जाणारे आहेत. वटवाघळांची प्रचंड वसाहत सुवर्णदुर्गावर आहे. निसर्गातली गंमत, दुर्मिळता बघायला मिळते. सध्याच्या पिढीत अभ्यास करणारे आहेत म्हणून किल्ल्यांकडे जायला त्यांना आवडते.

आसरा आणि पाणी या दोन गोष्टी भागल्या की, साहसी पर्यटन या किल्ल्यांमुळे करता येते. काही किल्ले आता पर्यटनस्थळेच झाली आहेत. त्या भागात रोजगार वाढला आहे. ज्या किल्ले पर्यटनामुळे आपल्याला रोजगार मिळतोय ही भावना असल्याने किल्ले जपूया. त्यातून किल्ल्यांचे संवर्धन करण्याकडे कल निर्माण झाला. आता किल्ले बांधणे शक्य नाही. किल्ल्यांची दुरुस्ती करायची असेल तर पुरातत्त्व खात्याची परवानगी, नियम पाळूनच करावी लागते. सद्यस्थितीत असलेल्या किल्ल्यांची वर्णने, चित्र, आर्किटेक्चर प्लॅन आपल्याकडे नाहीत. त्यामुळे आता किल्ले बांधणे शक्य नाही. हे बांधकाम चुन्यात होते. आता चुना वापरण्याचे तंत्र लोकांना माहीत नाही.

या सर्व गोष्टी लक्षात घेता दुर्ग संग्रहालयाची कल्पना आपण राबविली पाहिजे. यामध्ये किल्ल्यांचा शिलालेख जेव्हा नजरेस पडतो तेव्हा आपले त्याकडे लक्ष जाते. त्या पडलेल्या बांधकामाचे फोटो, प्रतिकृती तयार केल्या पाहिजेत. एखादा बुरुजाचा दगड कोसळला असेल आणि तो आता पुन्हा त्यावर बसविणे शक्य नसल्यास तो संग्रहालयात ठेवला पाहिजे. तरच तो सुरक्षित राहील. आणखी १०० वर्षांनंतर किल्ल्याचा बुरूज असा दिसत होता, हे पुढच्या पिढय़ांना सांगता येईल. चांगले दुर्मिळ फोटो संग्रहालयात ठेवता येतील. उत्खननात ज्या वस्तू सापडतात त्या ठेवता येतील. मूर्ती, शिलालेख यांचे संग्रहालय प्रत्येक जिल्ह्य़ात व्हावे. हे काम सरकारनेच करायला हवे. दुर्गम किल्ल्यावर जाण्याच्या पायवाटा सुरुंग लावून काही कंटकांनी मोडल्या आहेत. त्यामुळे किल्ल्यांवर जाता येत नाही. त्यावर जाण्याची व्यवस्था केली तर किल्ल्यांवर काय आहे हे कळेल. आपल्याकडे इतर पर्यटन विकसित झालेले नाही म्हणून किल्ल्यावर पर्यटकांचा ओघ वाढला आहे. हे पर्यटन विकसित करणे काळाची गरज आहे. तरच किल्ले संस्कृतीचे महत्त्व टिकून राहील.
(लेखक इतिहास अभ्यासक आहेत.)