कवडसे – फक्त हसुनी टाळतेस तू

>> महेंद्र पाटील

परवा तिचा एक खूप सुंदर फोटो अचानक नजरेसमोर आला आणि पुन्हा एकदा मी नेहमीप्रमाणे तिच्या सौंदर्याची तारीफ करू लागलो. त्या दिवशी नेहमीपेक्षा जरा स्पष्टच बोललो. सगळं काही माझ्या  मनातलं. नेहमीप्रमाणे उत्तरादाखल तिच्या चेहऱयावर फक्त स्मित हास्य होतं. तिची आणि माझी ओळख होऊन एक तप ओलांडून गेलं आहे. फारशा भेटीगाठी काही झाल्या नाहीत आमच्या. पण तरीही आम्ही फोन आणि मेसेजद्वारे एकमेकांच्या संपर्कात होतो. फोनवर बोलणं सातत्याने होत नसलं तरी प्रत्येक ऋतूत एकदा तरी बोलणं व्हायचं. जेव्हा आमची नवीन ओळख झाली होती तेव्हा खूप बोलायचो आम्ही. एका अनामिक नात्याचं एक अकल्पित जग निर्माण केलं होतं आम्हीच आमच्या मनात. सारंकाही अनाकलनीय वाटत असलं तरी मनाला ते आवडत होतं. मी माझ्या मनातल्या गोष्टी तिच्या मनाला हळुवारपणे सांगायचो आणि तिच्या मनाचा थांग घेण्याचा प्रयत्न करायचो. ती उत्तर द्यायची, पण तिच्या उत्तरांची भाषा अबोल होती… तिला नेमकं काय म्हणायचंय ते मला कळत नव्हतं. काही शब्दांची काही वाक्यांची देवाण घेवाण झाली की आमच्या संवादात वेगळीच शांतता यायचा आणि काही क्षणात आमचा संवाद संपायचा. तो ऋतू असाच निघून जायचा. पुन्हा नव्या ऋतूत तिचा नवीन फोटो समोर यायचा. पुन्हा माझ्या मनात एखादी नवी कविता जन्माला यायची. तिला ती कविता आवडायची. पण तेव्हाही ती मर्यादित व्यक्त व्हायची. पुन्हा माझ्या मनात तिला जे सांगायचं होतं ते मनातल्या मनातच राहून जायचं. तीसुद्धा नेहमीप्रमाणे व्यक्त व्हायचं असूनही अव्यक्तच राहायची.

एकदा असं झालं  की एका संध्याकाळी तिचं मन माझ्या प्रत्येक शब्दाला साथ देत गेलं. तिच्याही मनातली ती अबोल आर्त चाहूल मला जाणवू लागली. माझ्या मनाला वाटलं हाच तो क्षण आहे ज्याची मी वाट पाहात होतो. या क्षणाला तरी तिच्या अबोल उत्तरांना बोल फुटून ती व्यक्त व्हावी, आषाढाच्या धारांसारखी बेभान… श्रावण सरींसारखी अलवार… हिवाळ्यातल्या पहाटेला पसरलेल्या दाट धुक्यासारखी… पण तसं काही घडलं नाही. उलट त्या क्षणापासून आमच्या बोलण्यात काहीसं अंतर पडू लागलं. संवाद कमी होऊ लागले. याच दिवसात एकदा आमची एका गजबजलेल्या संध्याकाळी छोटीशी भेट झाली. काही गप्पागोष्टी झाल्या आणि लवकरच भेटूया असं ठरवून त्या गजबजलेल्या गर्दीत आम्ही आपापल्या वाटेने निघून गेलो.

त्या दिवसापासून आजपर्यंत पुन्हा भेटण्याचा योग आला नाही. पुन्हा आमचा मनातला तो अबोल संवाद झाला नाही. अशातच तिचा फोटो पुन्हा समोर आला. जुन्या आठवांच्या गावी मला घेऊन गेला. या वेळी मी ठरवलं की तिला सांगून टाकायचं आणि मी तसं बोललोही. मला तू खूप आवडतेस. पण तिच्या उत्तरात पुन्हा स्मित हास्यच आणि माझ्या मनात तीच वेडी हुरहूर होती. का बरं टाळत असेल ती विषय आमच्या दोघांचा? ती पूर्णपणे टाळतेय असंही मनाला वाटत नव्हतं. मग न राहवून मी तिला विचारलं ‘का फक्त हसुनी तू टाळतेस नेहमीच विषय आपुला!’ यावर ती म्हणाली, शब्द छान आहेत. एखादी कविता लिही पटकन.’ मी विचार करू लागतो की बारा वर्षांतल्या तुझ्या अबोल उत्तरांना मी एका कवितेत कसं सामावणार… म्हणून हा सर्व शब्दप्रपंच. बाकी काही नाही. कविता सुचेल तेव्हा सुचेल. पण हे शब्द वाचून तुला उत्तर सुचावं हीच माफक अपेक्षा.

[email protected]