सह्याद्रीची चढाई…

> जे. डी. पराडकर

टेकडी चढणे यात फारसे अवघड असे काही नाही. मात्र उंच उंच डोंगर आणि कडे चढणे यासाठी सराव, कौशल्य आणि धाडस असावे लागते. ट्रेकिंग करायचे तर सुरुवातीला प्रशिक्षित मंडळींकडून याचे धडे गिरवावे लागतात. ट्रेकिंगसाठी पूर्वनियोजन आणि जो ट्रेक करायचा आहे त्याची इत्थंभूत माहिती, नकाशे सोबत असणे गरजेचे असते. उंच कडे आणि सुळके सर करताना थोडासा जरी निष्काळजीपणा झाला तरी तो जिवावर बेतू शकतो. यासाठी ट्रेकर्सना सदैव सतर्क रहावे लागते. ट्रेकिंग हा एक धाडसी छंद आहे. केवळ विक्रम करणे एवढाच यामागचा उद्देश नसतो. बालपणापासून ट्रेकिंगची आवड असेल तर तरुणपणी उत्तम सरावाच्या जोरावर मोठमोठे ट्रेक करता येतात. पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये व्यवस्थापक पदावर कार्यरत असतानादेखील सुट्टीच्या दिवशी आपला ट्रेकिंगचा छंद जोपासण्याचा प्रयत्न गेली 30 वर्षे मीनल जोशी-मिरपागार यांनी जपला आहे.

मीनल जोशी यांनी वयाच्या 15व्या वर्षी आपल्या मित्र- मैत्रिणींसमवेत पुण्याच्या आसपासचे छोटे छोटे ट्रेक करणे सुरू केले. बालपणी अनेक गिर्यारोहकांची चरित्र, त्यांचे धाडसी ट्रेक, तसेच त्यांना आलेले अनुभव याविषयीची पुस्तके वाचल्याने मीनल यांना ट्रेकिंगची आवड निर्माण झाली. मित्रमंडळींच्या सोबत छोटे ट्रेक केल्यानंतर आपल्याला हे जमू शकते याबाबतचा आत्मविश्वास वाढला. ट्रेकिंगला जाण्यासाठी घरातून कधीही विरोध झाला नाही. त्यामुळे मीनल यांचा उत्साह वाढला. मीनल यांना ट्रेकिंगची खरी आवड निर्माण झाली ती त्यांचे दोन मोठे भाऊ आणि त्यांच्या मित्र-मैत्रिणींचा एक ट्रेकिंग ग्रुप होता त्यामुळेच. या ग्रुपमधून ते मीनल यांना ठिकठिकाणी ट्रेकिंगसाठी घेऊन जायचे. त्यांच्या सोबत जाताना ते ट्रेकिंगसाठी आवश्यक काळजी कशी घ्यायची, वेळ आणि कोणता हंगाम निवडायचा, हवामानाचा अंदाज कसा घ्यायचा यांसह सुरक्षिततेसाठी कशी काळजी घ्यायची याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करत.

वयाच्या 15व्या वर्षांपासून शिक्षण सांभाळून मीनल यांनी सलग आठ ते नऊ वर्षे ट्रेकिंगचा आपला छंद जोपासला. विवाहानंतर पाच वर्षे ट्रेकिंगमध्ये खंड पडला हे जरी खरे असले तरी हा छंद त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. पती आणि मुलांसह मीनल यांनी रुबी हॉल क्लिनिक गुपसोबत पुन्हा नव्या उत्साहाने ट्रेकिंग सुरू केले, ते आज वयाच्या 50व्या वर्षीदेखील त्याच जोमाने आणि उत्साहाने सुरू आहे. मीनल यांनी महाराष्ट्रातील अनेक ट्रेक केले. त्यामध्ये सह्याद्री पर्वतरांगांमधील राजगड, तोरणा, रायगड, रायरेश्वर, ढाकचा बहिरी, अदराई जंगल ट्रेक, सांधण व्हॅली, राजमाची, पुरंदर, वासोटा, जरंडेश्वर, कमळगड, कोरीगड, कात्रज ते सिंहगड, नळीची वाटमार्गे हरिश्चंद्र गड हा ट्रेक करताना मार्गात येणारे दोन अतिशय अवघड रॉक पॅच दोराच्या साहाय्याने चढायचे होते, तेही पाठीवर सामान असलेली सॅक घेऊन. तेदेखील त्यांच्या ग्रुपने यशस्वीपणे पार केले. खिरेश्वरमार्गे हरिश्चंद्र गड, कळसूबाई शिखर आदींचा समावेश आहे.

काही ट्रेकसाठी आदल्या दिवशी रात्री बसने प्रवास सुरू व्हायचा. संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर बॅग पॅक करून रात्री बसने सर्व मंडळी निघायची. ट्रेक ठिकाणी पोहोचल्यावर पहाटे 4 ते 6 विश्रांती घेऊन ट्रेकला सुरुवात केली जायची. रुबी हॉल क्लिनिकचा 12 ते 15 मंडळींचा ट्रेकचा एक ग्रुप आहे. त्या ग्रुपसह कधी कधी कमर्शियल ग्रुपबरोबरदेखील मीनल यांनी ट्रेक केला आहे. महाराष्ट्र राज्याबाहेर जाऊन हिमाचल प्रदेशमधील दोन ट्रेक यशस्वीपणे केले आहेत. देहराडूनजवळचे रुपीन पास ट्रेक, गंगोत्री तपोवन ट्रेक करत असताना गोमुखापासून तपोवनकडे जाणारा रस्ता खूप चढाईचा होता. खूप उंचीवरून कोसळणारा धबधबा 10 हजार फुटांवरून क्रॉस करायचा होता. पाय ठेवायला दगड खूप लांब होते. पाणी खूप पर्ह्सने अंगावर पडत होते. पाय जर घसरला असता तर 10 हजार फूट खाली दगडात कोसळण्याची भीती होती. अशी धोकादायक स्थिती असतानाही सारे बळ एकवटून हा ट्रेक यशस्वी केल्याचे मीनल यांनी सांगितले. भविष्यात एव्हरेस्ट बेस सर करायचा दृढनिश्चय केला असल्याचे मीनल यांनी नमूद केले. बालपणी लागलेली ट्रेकिंगची आवड विवाहानंतर विविध जबाबदाऱया आणि नोकरीत राहूनही जोपासणाऱ्या मीनल जोशी-मिरपागार यांची जिद्द कौतुकास्पद म्हटली पाहिजे.

[email protected]