‘आयएस’चे कंबरडे मोडले, ‘लेन वुल्फ’चे काय?

36
  • अॅड्. निखिल दीक्षित

इंग्लंड-स्पेननंतर इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांनी मंगळवारी न्यूयॉर्क येथे ट्रकहल्ला घडवून आणला. हे कृत्य lone wolf सारख्या एकाकी तरुणाकडूनच घडवून आणण्यात आले आहे. त्यामुळे इराकमध्ये ‘आयएस’ने जरी माघार घेतली असली, त्यांचे कंबरडे मोडले असले तरी ही क्रूर संघटना सहजासहजी हार मानेल असे वाटत नाही. lone wolf चा वापर करून आयएसचे हल्ले सुरूच राहतील, असे जाणकार बोलत आहेत.

स्लामिक स्टेटच्या आवाहनानंतर इराक व सीरियामध्ये इस्लाम खिलाफतच्या लढय़ासाठी महाराष्ट्रातील कल्याणमधून पळून गेलेल्या चार तरुणांपैकी एक तरुण कल्याणमध्ये आपल्या आईवडिलांकडे परतला तर तीन तरुणांपैकी एक तरुण इराकमध्ये युद्ध लढताना २०१४ साली मारला गेला. त्यानंतर आता अन्य एक तरुण मारला गेल्याची गेल्याच आठवड्यात खबर आल्याने त्याचे आईवडील धाय मोकलून रडत आहेत. एकाचा तर अद्यापि पत्ताच लागलेला नाही. त्यामुळे त्या तरुणाच्या कुटुंबीयांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे. आयएसकडून हिंदुस्थानसह जगभरात आपल्या संघटनेची दहशत निर्माण करण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातील मुस्लिम तरुणांचे ब्रेन वॉशिंग करून त्यांना ‘आयएस’साठी आजही तयार केले जात आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबईच्या गोवंडी भागातून एक अल्पवयीन तरुण मिसिंग असल्याची तक्रार त्याच्या आई-वडिलांनी नोंदवली असून तो ‘आयएस’मध्ये सामील झाल्याचेही वृत्त आहे.

Lone wolf हा प्रकार फारच गंभीर आहे. लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर असणारी ही एकाकी तरुण मुलं कुठेही अतिरेकी हल्ला घडवून आणीत आहेत व कुठेतरी एकाकीपणे राहणाऱ्या अशा या तरुणांचा शोध घेणे तपास यंत्रणांना कठीण जात आहे. इंग्लंड व स्पेनमधील हल्ल्यांनंतर आता अलीकडे तीन-चार दिवसांपूवीं आयएसच्या (lone wolf) एका अतिरेक्याने अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे ट्रकहल्ला करून ८ निष्पाप अमेरिकन नागरिकांना ठार मारले व डझनभर नागरिकांना गंभीर जखमी केले. इराकमध्ये अलीकडे पीछेहाट झालेल्या आयएसने जगभरात आपली दहशत निर्माण करण्यासाठी lone wolf चे हल्ले सुरू केले आहेत. हेच न्यूयॉर्क येथील हल्ल्यावरून दिसून येत आहे. त्याचा धोका हिंदुस्थानलाही आहे हे विसरून चालणार नाही.

अलीकडेच हिंदुस्थानी तपास यंत्रणांनी देशभरातून ‘आयएस’च्या संपर्कात असणाऱ्या १० मुस्लिम तरुणांना अटक केली. त्यात मुंब्य्राचा ‘नाझीम’ हा ‘आयएस’चा हस्तक होता. मुंब्रा येथे भाड्याच्या घरात राहून तो मुस्लिम तरुणांचे ब्रेन वॉशिंग करीत होता. दिवसा तो फेरीवाल्याचा व्यवसाय करायचा. रस्त्यावर अंडी विकणाऱ्या नाझीमला पाकिस्तान व बांगलादेशातून आदेश यायचे त्याप्रमाणे तो सूत्र हलवीत होता. तो वेळीच पकडला गेल्याने संभाव्य धोका टळला, परंतु नाझीमसारखे असे बरेच आयएसचे हस्तक आपल्या देशात असून न्यूयॉर्कसारखे हल्ले आपल्या देशात होण्याची शक्यता आहे असे गुप्तचर यंत्रणांकडून सांगण्यात येते. वास्तविक ‘आयएस’चा इराकमधील दबदबा आता संपला आहे. इस्लामिक स्टेटने काबीज केलेले बरेचसे प्रांत इराकने परत मिळविले आहेत. इराकमधून संपूर्णपणे पीछेहाट झाल्यामुळे आयएसकडून आता एकाकी (lone wolf) व आत्मघातकी तरुणांना तयार करून त्यांना गर्दीच्या ठिकाणी पाठविले जात आहे. ट्रक अथवा जड वाहन घुसवून अपघात घडवून आणले जात आहेत किंवा अंदाधुंद गोळीबार करून ‘आयएस’ची दहशत माजविली जात आहे.

२०१४ मध्ये आयएसने इराकमध्ये ५० पेक्षाही अधिक प्रांतांवर कब्जा मिळवून आपली हुकमत सुरू केली. त्यात मोसूल या प्रमुख शहराचा समावेश होता. आयएसच्या आवाहनानुसार गेल्या ४ वर्षांत जगभरातून (१२० देश) ४० हजार तरुणांनी (‘आयएस’साठी) इराक व सीरियामधील युद्धात भाग घेतला. त्यात ५ हजार युरोपियन नागरिकांचा समावेश होता. परंतु ‘आयएस’ची पीछेहाट होताच सुमारे १५०० तरुण आपल्या मायदेशी परतले. काही मरण पावले तर काहींनी शरणागती पत्करली. फिलिपाईन्स व लिबियासारख्या जवळच्या देशांत आश्रय घेतला. इराकमधून ‘आयएस’चे पूर्णपणे उच्चाटन झाले आहे, परंतु ‘सीरिया’मध्ये इस्लामिक स्टेटची अजूनही वळवळ सुरू आहे. ‘आयएस’चा प्रमुख अबू बकर अल बगदादी हा मारला गेल्याचे सांगण्यात येते, परंतु त्याला कुणीही दुजोरा देत नाही. त्यामुळे बगदादी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ‘आयएस’चा या जगाला धोका कायम आहे हे लक्षात ठेवा. न्यूयॉर्कवरील ट्रकहल्ला ही गंभीर बाब आहे. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणतात, हे मानसिक संतुलन ढासळलेल्या तरुणाचे कृत्य आहे, परंतु असे lone wolf पदोपदी आहेत त्याचे काय? घातपाती कारवाया करणाऱया एकाकी तरुणांना आपण कसे शोधणार? फारच कठीण आहे. आत्मघातकी हल्ले हे जगाला विनाशाकडे नेणारे आहेत. ‘आयएस’ ही अतिरेकी संघटना ‘इराक’मध्ये हरली आहे, परंतु त्यांचे आत्मघातकी सैनिक जगभरात आहेत हे विसरून चालणार नाही.

(लेखक हे ज्येष्ठ पत्रकार आहेत)

आपली प्रतिक्रिया द्या