सांगोल्याचे आबा

  • अनंत देशपांडे

गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे सध्याचे राजकारण तसे निराशाजनक आहे. मात्र याही वातावरणात ‘आशेचा किरण’ वाटणारी काही मोजकी व्यक्तिमत्त्वे आजही महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या एकाच विधानसभा मतदारसंघातून ११ वेळा निवडून येण्याचा ‘विक्रम’ करणारे गणपतराव ऊर्फ आबा देशमुख हे त्यापैकी एक अग्रणी नाव. आमदारकीची पन्नाशी पार करूनही किंवा दोनदा मंत्रीपद भूषवूनही गणपतरावांमधील विनम्रता आणि कष्टकऱ्यांसाठीची कळकळ, तळमळ याला अजिबात धक्का लागलेला नाही. सध्याच्या राजकारणातही ‘निस्पृह’ आणि ‘स्वच्छ’ राहता येते याचा आदर्श वस्तुपाठ म्हणून गणपतराव देशमुखांकडे पाहता येईल. सांगोल्याचे हे ‘आबा’ म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘भीष्माचार्य’च म्हणावे लागतील.

सातत्याने राजकारणात राहूनही निर्मळ राहता येईल का? असे आज कोणालाही विचारले तर ठामपणे ‘नाही’ असे उत्तर मिळेल. मात्र या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ मिळेल, अशी काही व्यक्तिमत्त्वे आजही आहेतच. सांगोल्याचे शेकापचे आमदार गणपतराव देशमुख हे त्यातील आघाडीचे नाव. गणपतराव देशमुख यांना ‘आबा’ म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी आमदार म्हणून विधानसभेतील कामकाजाची पन्नाशी २०१४ मध्येच ओलांडली आहे. १९६२ पासून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गणपतराव देशमुखांचा अकरावेळा एकाच मतदारसंघातून निवडणूक जिंकण्याचा विक्रम आहे. तामीळनाडूतील द्रमुकचे सर्वेसर्वा एस. करुणानिधी यांच्या नावावर यापूर्वी दहावेळा निवडणूक जिंकण्याच्या विक्रमाची नोंद होती; पण गणपतरावांनी अकराव्यांदा निवडणूक जिंकत २०१४ मध्ये तो विक्रम मोडला.

सोलापूर जिल्ल्ह्यातील पेनूर हे गणपतरावांचे जन्म गाव. तेथील शाळेत पाचवीपर्यंत शिक्षण घेऊन पंढरपुरातून ते मॅट्रिक झाले. पुढे पुण्यातील एस. पी. कॉलेज आणि लॉ कॉलेजमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. कष्टकरी, शेतकरी आणि शेतमजूर यांच्यासाठी काही तरी केले पाहिजे व त्यासाठी राजकारणात आले पाहिजे अशी खूणगाठ गणपतरावांनी शालेय जीवनातच बांधली होती. त्यात देशभक्त तुळशीदास जाधव यांचा पगडा गणपतरावांवर होता. पुढे महाविद्यालयीन जीवनात कम्युनिस्ट विचारसरणीकडे ते ओढले गेले. त्यामुळे शालेय जीवनात काँग्रेस विचारसरणीचा प्रभाव असूनही प्रत्यक्ष राजकारणात येण्यासाठी बहुधा त्यांनी शेतकरी कामगार पक्षाची निवड केली. गणपतराव देशमुखांना जेधे, मोरे यांच्यासह नाना पाटील, तुळशीदास जाधव यांचा सहवास लाभला. शंकरराव मोरेंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मार्क्सवादाचे धडे गिरवले. गरीब आणि कष्टकऱ्यांसाठी चांगली चाललेली वकिली सोडून राजकारण सुरू केले आणि १९६२ साली शेकापच्या तिकिटावर प्रथम विधानसभा निवडणूक लढवली. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असलेल्या विधिमंडळात १५ मार्च १९६२ रोजी गणपतराव देशमुख यांच्या आमदारकीला प्रारंभ झाला. राज्यपालांच्या अभिभाषणावर गणपतरावांनी केलेल्या भाषणाची दखल तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या भाषणात घेतली. त्यानंतर १९७२ आणि १९९५चा वगळता ११ विधानसभा निवडणुकांत गणपतराव देशमुख यांना सांगोल्याच्या तीन पिढ्यांनी भरघोस मते देऊन निवडून दिले. २०१४ मध्ये देशमुखांच्या मनात नसतानाही सांगोलेकरांनी त्यांना अर्ज भरायला लावला आणि निवडूनही दिले. गणपतराव १९७८ आणि १९९९ यावेळच्या मंत्रिमंडळात मंत्रीही राहिले आहेत. मात्र अकरावेळा आमदार, दोनदा मंत्री राहूनही गणपतरावांमध्ये आजही तोच विनम्रपणा, गरीब कष्टकऱ्यांसाठी तीच कळकळ आहे. १९७२ च्या दुष्काळानंतर सुरू झालेल्या रोजगार हमी योजना आणि कायद्याचा आधार घेत गणपतरावांनी सांगोल्यासारख्या दुष्काळी तालुक्याला मोठा आधार दिला. सांगोल्यात आज दिसणारी डाळिंब आणि बोराची झालेली हजारो एकरावरची लागवड हे गणपतरावांचेच कर्तृत्व आहे. सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करायची आणि आपल्या मतदारसंघापुरते मर्यादित राहून दुर्लक्ष होऊ द्यायचे नाही हा गणपतरावांच्या आमदारपन्नाशीचा मंत्र आहे. प्रतिवर्षी आपल्या मतदारसंघातील प्रत्येक गावाला ते दोनवेळा आवर्जून भेट देतात.
महाराष्ट्राच्या राजकारणाचे ‘भीष्माचार्य’ असलेल्या गणपतराव देशमुख यांनी कधीच नव्वदी पार केली आहे. मात्र गरीब, कष्टकरी, शेतकरी आणि शेतमजुरांसाठी काम करण्याची धुरा आजही ते तेवढय़ाच निष्ठsने वाहत आहेत. अकरावेळा आमदार आणि दोनदा मंत्री होऊनही ते एसटीला विसरलेले नाहीत. आमदार निवासातील वृत्तपत्रांचे बिल सरकारकडून दिले जाते. मात्र हा जनतेचा पैसा असल्याने गणपतराव त्याची रद्दी विकून आलेले पैसे सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडे न चुकता जमा करतात. काही महिन्यांपूर्वी पेनूर या गावच्या प्रेरणा गवई या विद्यार्थिनीने लिहिलेल्या पत्रावरून गणपतरावांनी पेनूरला एसटीचा थांबा मिळवून देऊन तेथील विद्यार्थ्यांची अडचण दूर केली. राजकारणातले अनेक चढउतार गणपतराव देशमुख यांनी पाहिले. सध्याच्या एकूण राजकारणाबद्दल फारसे चांगले बोलले जात नसले तरी गणपतराव आजही आशावादी आहेत. जातीयवाद आणि श्रीमंत-गरीब भेद मिटवले पाहिजेत असा त्यांचा आग्रह आहे. कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांना शेतीला अव्याहत पाणी दिले पाहिजे असेही त्यांना वाटते. स्वच्छ आणि पारदर्शक व्यक्तिमत्त्व असलेल्या गणपतराव देशमुखांचा चांगूलपणावर अढळ विश्वास आहे. या विश्वासाच्या जोरावर सांगोल्याच्या या ‘आबां’नी आमदारकीची ‘पन्नाशी’ पार केली आहे आणि वयाची शंभरीही पार करावी, अशी सर्वांची इच्छा आहे.