हैदराबादची मराठी लेखनपरंपरा

110

>> डॉ. विद्या देवधर

भाषाकार प्रांतरचनेनंतर हैदराबाद संस्थानातील मराठी भाषेचे अस्तित्व आणि तिची स्वतंत्र ओळख टिकविण्याची गरज तेथील मराठी विचारवंतांच्या लक्षात आली. या गरजेतून आणि ध्यासातून विविध मराठी साहित्य चळवळींचा उदय झाला. या परंपेची ओळख करून देणारा हा लेख.

सातशे वर्षांपासून हैदराबाद, गुलबर्गा, तेलंगणा व मराठवाडा भागात परकीय राजवट होती. त्यापूर्वी तेराव्या शतकात, काकतीय राज्यांतही हैदराबादजवळ वरंगळ भागात मराठी – मरहट्टी लोक होते आणि आजही येथे असलेल्या १५०-२०० कुटुंबांच्या या समाजाला ‘अरे-मराठी’ समाज म्हणून ओळखले जाते. बहामनी, कुतुबशाही व असफजाही (निजाम) राजवटीतही हैदराबाद परिसरातील मराठी मंडळींनी आपली भाषा, आपले साहित्य व संस्कृतीचे जतन केले. उर्दू, मराठी, कानडी, तेलगू भाषिकांबरोबर हिंदी मुलखातील लोकांनीही हैदराबादला आपले मानले.

केशवस्वामी नोकरी करण्यासाठी इ.स. १६३८ मध्ये भागानगरीला आले. परोपकारी स्वभाव व रसाळ प्रवचने, कीर्तन यामुळे केशवस्वामी भागानगरकर यांच्याभोवती शिष्य समुदाय वाढत गेला. जियागुडा येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात आजही जिथे देवाचे सेवाकार्य चालू आहे, तिथे शिवछत्रपतींनी केशवस्वामींचे कीर्तन ऐकले होते, असे सांगतात. समर्थभक्त देव यांनी केशवस्वामी यांची समाधी शोधून काढली आणि धर्मवीर वामनराव नाईक यांनी केशवस्वामींचे लेखन विसाव्या शतकारंभी प्रकाशित केले. त्यानंतर हैदराबाद येथील कै. गोपाळ, तृप्ती आगाशे यांनी धुळे येथे २ वर्षे अथक परिश्रम घेऊन त्यांचे अप्रकाशित साहित्य मिळवले आणि २०१० मध्ये केशवस्वामींची सुमारे साडेचार हजार पदे प्रकाशित केली. भगवद्गीतेचा श्लोकबद्ध मराठी अनुवाद करणारे जिवन्मुक्त महाराज (देशपांडे) यांनी जहिराबादजवळ मठस्थापना केली होती. त्यांनी १७६८ मध्ये समाधी घेतल्यावर त्यांच्या दोन मुलांनी त्यांची गीताटीका पूर्ण केली. निजामाचे पंतप्रधान व महसूलमंत्री राजा चंदूलाल (१८०३) यांचे गुरु काशीनाथ पंतही मराठीच होते. समर्थशिष्य कल्याणस्वामींच्या परंपरेतील सखाराम महाराज (१८४०) यांचे गद्य पंचीकरण प्रसिद्ध आहे.

स्वामी विवेकानंदांच्या १८९३ मधील हैदराबाद भेटीनंतर मराठी मनातील नवविचारांना दिशा मिळाली. १९९५ च्या गुढीपाडव्याला ‘भारत गुणवर्धक संस्था’ आणि विजयादशमीच्या मुहूर्तावर ‘वैदिक धर्मप्रकाशिका’ या शिक्षण संस्थेची स्थापना झाली. आज दोन्हीही संस्थांचे कार्य चालू आहे. वेदमूर्ती पंडित सातवळेकरांच्या प्रयत्नांतून विवेक वर्धिनी शिक्षण संस्था १९०७ मध्ये सुरू झाली. आज त्यांच्या १८ शिक्षण संस्था, महाविद्यालये व पदव्युत्तर केंद्रेही आहेत.

निजाम राज्यात केवळ दहा टक्के जनता उर्दू भाषिक असूनही हिंदूंच्या कानडी, तेलगू व मराठी भाषेत एकही सरकारी शाळा कुठेही नव्हती. मराठी मंडळींनी सुरू केलेले मराठी शिक्षण हेही साहित्य चळवळीचे केंद्र ठरले. मराठी वृत्तपत्र मात्र मूळ धरत नव्हते. प्राचीन रुढी- परंपरा, संस्कृती रक्षणाच्या कल्पना यामुळे उर्वरित भारतापेक्षा मनाने पन्नास-शंभर वर्षे मागे असलेल्या हैदराबादने या विविध चळवळींमधून येऊ घातलेले हे परिवर्तन फार लवकर स्वीकारले.

‘मराठी भाषा टिकवणे’ ही एक महत्त्वाची चळवळ होती. या चळवळीला, विचारांना व्यासपीठ दिले ‘निजाम विजय’ने. त्यापूर्वी संपूर्ण संस्थानात मराठी भाषेसाठी प्रसिद्धीचे, संपर्काचे साधन नव्हते. वाङ्मयीन व्यवहारासाठी आवश्यक असणारा जाणता समाज, लेखक कवी यांची मांदियाळी सभा-संमेलने, प्रकाशने, चर्चा या गोष्टी अस्तित्वात नव्हत्या. वाङ्मयीन धारणेसाठी व मराठीच्या प्रेमासाठी या गोष्टींची कशी आवश्यकता आहे. ते सातत्याने लोकांना ‘निजाम विजय’मधून सांगितले गेले. लक्ष्मणराव फाटकांनी पहिल्या एक-दोन वर्षांत प्रत्येक अंकात मराठीच्या ग्रंथालयाची आवश्यकता आग्रहाने मांडलीच, पण महाराष्ट्रातील ग्रंथालयाचे वार्षिक समारंभ, अहवाल, तेथील व्याख्याने, नव्या पुस्तकांचा परिचय देत राहिले. त्यातून मराठी ग्रंथ संग्रहालय सुरू झाले.

उस्मानिया विद्यापीठातील अभ्यासक्रमात ‘मराठी विषय’ व मराठी प्रोफेसरांची नेमणूक याचा पाठपुरावा निजाम विजयमधून केला. ‘निजाम विजय’ या नियतकालिकाच्या वाङ्मयीन दृष्टिकोनाचा प्राणवायू होता तो म्हणजे उस्मानियातील मराठी विभागप्रमुख (१९२२) प्रो. चिं. नी. जोशी. लेखक व कवी यांना सांभाळणे, विद्वत्तेची परंपरा टिकवणे, जुन्यांचे स्मरण, नव्याचे स्वागत, मराठीचा प्रसार, संशोधन, दुर्मिळ हस्तलिखिते लोकसाहित्य जमवणे, जपणे या असंख्य गोष्टी प्रा. जोशी यांनी २५ वर्षे सांभाळल्या. १९५७ नंतर भाषावार प्रांतरचना झाली, तेव्हा शिक्षणाचे प्रमाण वाढल्यानंतर लेखनाला अनेक धुमारे फुटू लागले.

‘पंचधारा’ (१९५८) या परिषदेच्या वाङ्मयीन नियतकालिकाचे पहिले संपादक होते डॉ. श्रीधरराव कुलकर्णी. तेलगू, कानडी, तामिळ, हिंदी आणि मराठी या भाषाभगिनींच्या साहित्य संसाराचा मराठी भाषिकांना परिचय करून द्यावा व भाषिक आणि सांस्कृतिक आदान-प्रदानाचे सौहार्द निर्माण करावे. या मनीषेतून पंचधारा सुरू झाले. मी १९९० पासून पंचधारा संपादक मंडळात कार्यरत आहे. उस्मानया विद्यापीठात १९६५ पासून ‘स्वाध्याय संशोधन पत्रिका’ सुरू झाली. विद्याठातर्फे संशोधन पत्रिका प्रकाशित करण्याचा उपक्रम चालवणारा मराठी विभाग भारतात एकमेव आहे. बहुभाषिक भारतीय साहित्याचे व्यापक उद्दिष्ट समोर असतानाच मराठीचे मूळ संशोधन, मराठीचा विचार, अभ्यास आणि नवनिर्मिती याकडे दुर्लक्ष करायचे नाही हे पंचधारेचे धोरण आहे.

पुस्तक प्रकाशने हा साहित्य चळवळीतील महत्त्वाचा भाग असतो. हे मराठीचे काम आहे, हे व्हायलाच हवे, तेथे तडजोड नाही, या विचाराने परिषदेने गेल्या ५९ वर्षांत ५५ पुस्तके प्रकाशित केली. प्राचीन हस्तलिखितांचे संशोधन, लोकसाहित्य, संत साहित्य, आधुनिक काव्य याबरोबरच तेलगू व तमिळ साहित्याचा इतिहासही परिषदेने प्रकाशित केला आहे. ‘काळाच्या पडद्याआड’च्या ३ खंडांमधून १९२० पासूनच्या निजाम विजयच्या कर्तृत्वाचा, तत्कालीन घडामोडींचा आलेख उपलब्ध आहे.

हैदराबादमधील मराठी भाषा व्यवहार आणि साहित्य व्यवहाराचा चारशे वर्षांचा स्पष्ट आलेख आपल्याला येथे पहाता येतो. सतराव्या शतकातील शिवशाहीचा उदय आणि स्वातंत्र्याचा अनुभव त्यानंतर इंग्रजांच्या राजवटीतील पाश्चात्त्य विचार, पुरोगामी किंवा लोकशाहीवादी उदार दृष्टिकोन यांचा लाभ मात्र हैदराबादकरांना मिळाला नाही. तरीही येथील मराठी मंडळींनी मराठी भाषा टिकवून ठेवली. एवढेच नव्हे तर उत्तम साहित्य निर्मिती होत राहिली. हा प्रवास अतिशय खडतर होता. पण भाषाप्रेमाचा अखंड झरा येथे वाहत राहिला.

हैदराबादमध्ये आज सुमारे २५ संस्थांमधून मराठी शिक्षण, मराठी संस्कृती आणि मराठी साहित्याचे जतन व संवर्धन कार्य चालू आहे. मराठी साहित्य परिषद हा साहित्य चळवळीचा केंद्रबिंदू आहे. आणि ‘पंचधारा’ हे वाङ्मयीन नियतकालिक आपला दर्जा आणि वेगळेपणा सांभाळून प्रकाशित होत आहे. मराठी साहित्य संशोधन प्रेम ओसरले आहे तरीही परिषदेचे त्रिविध कार्य चालूच आहे. आमच्या पाठीशी आहे, महाराष्ट्रातील गावांत, तालुक्यांत विखुरलेला मराठी अभ्यासक आणि संवेदनशील असा मराठी समाज!

(लेखिका हैदराबाद – तेलंगणा येथील मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या