सूर्याखालचा अंधार!

102
  • डॉ. विजय ढवळे, ओटावा-कॅनडा

जपानचे वैभव जगाला ढळढळीत दिसते, पण त्यामागील सामान्य नागरिकांचे श्रम, त्याग आणि प्रामाणिकपणा आहे हे विसरून चालणार नाही, परंतु जपानमधील कामगारांपेक्षा (हंगामी) हिंदुस्थानातल्या कामगारांची स्थिती खूपच चांगली आहे.

पान हे एक चिमुकले राष्ट्र. लोकसंख्या महाराष्ट्राहून थोडीशी जास्त. म्हणजे साडेबारा कोटी. रोज तीन-चार तरी भूकंप होतातच. खनिज द्रव्यांचा पूर्णपणे अभाव. पेट्रोलचा प्रत्येक थेंब आयात करावा लागतो. दुसऱ्या महायुद्धात जपानच्या महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटले. त्यापूर्वी चीनवर कब्जा केलेला होताच. आता साम्राज्य वाढवण्याच्या ईर्षेने पछाडलेल्या जपान्यांनी तुफान बॉम्बफेक करून अतिपूर्वेकडील राष्ट्रांना अंकित केले व युद्ध हिंदुस्थानच्या सीमेपर्यंत येऊन ठेपले. मात्र यानंतर जपानची अधोगती होत गेली. फिनिक्स नावाच्या पक्ष्याचा राखेतून पुनर्जन्म होतो अशी कविकल्पना आहे. त्याचे प्रत्यंतर जपानने जगाला दाखवून दिले आणि जगातली दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईपर्यंत मजल मारली! जपानी माणसाची चिकाटी, उद्योजकता, जिद्द, ईर्षा, विजिगिषु वृत्ती यांचा सर्वांमुखी गौरवच होतो. अनेक वर्षे मोटार उत्पादनात क्रमांक एकवर असलेल्या जनरल मोटर्स कंपनीला टोयोटाने मागे टाकले आहे याबद्दल जग नेहमीच अचंबित झाले आहे.

उगवत्या सूर्याचा देश अशा वर्णनाने जपानचा उल्लेख केला जातो. विज्ञान, तंत्रज्ञान या क्षेत्रात त्या देशाने विस्मयकारक आघाडी घेतलेली आहे. टोयोटा कारखान्याबाबतच्या अचंबित करणाऱ्या गोष्टींचे इतर देशांतल्या उद्योजकांवर खूप गारुड आहे. उत्पादन क्षमतेबाबत तर टोयोटाला जगात तोड नाही हे सत्यच आहे! जपानमधले शेतकरी जेव्हा शेतीची कामे नसतील तेव्हा मोटार कारखान्यात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करतात. त्यांचे दुःसह अनुभव सातोशी कामाटा या पत्रकाराने शब्दबद्ध केले ते १९७२ मध्ये. त्याचा इंग्रजीत अनुवाद होऊन ते जगासमोर यायला अजून १० वर्षे लागली. जे वाचून वाचकांना धक्काच बसला. अनुवादकाने कामाटाची भेट घेतली तेव्हा त्याने सांगितले, ‘या पुस्तकातल्या अनुभवांची तीव्रता आता जास्तच दाहक झाली आहे. पेन्टिंग, मोल्डिंग ही कामे आता यंत्रमानव करतात. परंतु यंत्रांची जुळणी अजूनही मोसमी कामगारच करतात. या हंगामी कर्मचाऱ्यांची कंपनी राहण्या-जेवण्याची व्यवस्था करते, पण त्या बदल्यात त्यांना ताबडवून घेते!’

मोटारींच्या जोडणी खात्यात सतत ५ तास यंत्रवत काम केल्यावरच जेवणाची सुट्टी दिली जाते. सांधेदुखीचा त्रास होण्याची दाट शक्यता असतेच. दारियस हा जन्माने अमेरिकन. त्याचे वडील दर ३ वर्षांनी कॅडिलॅक ही प्रतिष्ठेचे चिन्ह मानली गेलेली गाडी विकत घ्यायचे. मग त्याची जागा टोयोटाने घेतली तेव्हा त्या कारखान्यात आपण काम करावे असे दारियसला वाटू लागले. डिझाइन इंजिनीयर म्हणून नोकरीही मिळाली. मग त्याचा भ्रमनिरास झाला. त्या खात्यात खासगीपणाचा पूर्ण अभाव होता. दुसऱ्याच्या टेबलाचे खण उघडून आतली पत्रे व टिपणे वाचणे ही नित्याचीच बाब होती. जेवणाची सुट्टी तासाभराची. त्या काळात श्रमपरिहार म्हणून बरेच जण डुलक्या काढायचे! मूळ वेतन कमी म्हणून आठवड्याला ४० तास सक्तीचा ओव्हरटाइम. जास्त दर म्हणजे फक्त १.३ पट-दुप्पट काम दीडपटही नाही. वार्षिक बोनस पगाराच्या पाचपट आणि तो वर्षातून दोनवेळा विभागून दिला जायचा. जपानमध्ये गटागटाने काम केले जाते व त्याचा बराच उदो उदो केला जातो. पण त्याचा टीमवर्कशी संबंध नाही! प्रत्येक जण स्वतःच्या कामापुरते पाहतो. इतरांना मदत करत नाही!

गुणवत्तेमध्ये घट झाली तर त्याकरिता संपूर्ण गटालाच जबाबदार धरले जाते. म्हणून प्रत्येक जण दुसऱ्यावर जास्त लक्ष ठेवतो. प्रत्येक जण एकच पोषाख घालतो त्यामुळे कोणीही उठून दिसत नाही! बॉसशी जुळवून घेणे हे यशाच्या शिडीवरून वर जाण्यास उपयोगी असते ही जगमान्य पद्धत जपानमध्ये तर पूर्णत्वाला गेलेली आहे. त्यामुळे होयबांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. टोयोटा, होंडा, निसान, सुझूकी या जपानी मोटार कारखान्यातही त्याहून निराळी परिस्थिती नाही.

जपानमध्ये रुग्णाकडून डॉक्टर फी घेत नाहीत. ते सरकारी पगारी नोकर असतात. त्या पगाराची रक्कम औषध कंपन्यांकडून उभी केली जाते. कायम जागा मिळवण्यासाठी पाच वर्षे तरी राबावे लागते. वरची श्रेणी आणखी १० ते १५ वर्षे गेल्यानंतर मिळते. जोडणी विभागातल्या कामाचा वेग हा जबरदस्त असतो. पण कामगारांना सुरक्षेदाखल फक्त हेल्मेट पुरवले जाते. व्यवस्थापन हे सुरक्षेसाठी जबाबदार असले तरी एखाद्याचे बोट तुटले वा हात कापला गेला तर कोणी ते पाहणारा साक्षीदार असेल तरच नुकसानभरपाई मिळू शकते. अपघात झाला तर पर्यवेक्षक हा नेहमी कंपनीच्या बाजूनेच अहवाल लिहितो.

‘आपापली काळजी घ्या, धोकादायक कामे करू नका’ अशा अर्थाचे फलक सर्वत्र लावलेले असतात ते फक्त कामगारांना दोषी ठरवणे सोपे जावे म्हणून. गटप्रमुख अपघातांच्या धोक्यांबद्दल सूतोवाच करतात, पण ते कसे टाळावेत याचे प्रशिक्षण देत नाहीत. त्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो किंवा ते सरळ बेपर्वाच असतात! जखमी कामगारांना बॅण्डेज बांधून कारखान्यात येण्याची सक्ती असते. अपघातांची नोंद होऊ नये म्हणून ही व्यवस्थापनाने लढवलेली नामी शक्कल होती.

सप्टेंबर महिन्यात दारियसला कामाच्या वार्षिक अहवालावरून पगारवाढ देण्याची योजना समजली. पण कामाचे मूल्यमापन करण्याकरिता कोणतेही मानदंड नव्हते. त्यामुळे एका बाजूने पगारवाढीसाठी जास्त काम करावे तर दुसऱ्या बाजूने ओव्हरटाईमवर पाणी सोडावे अशी कंपनीच्या दुहेरी फायद्याची ती योजना होती. स्त्र्ायांचे जपानमध्ये सार्वजनिक आणि औद्योगिक जगतात दुय्यम स्थान आहे. वाढती महागाई त्यांना लग्नानंतरही नोकरी करण्यास भाग पाडते. लैंगिक छळवणुकीची तिथे फार मोठी समस्या आहे. अश्लील विनोदांना सामोरे जावे लागते. मुळातच जपानी स्त्रीया या करीअर करण्याकरिता उदासीन असतात. बॉसला चहा करून देणे, ऑफिसची सफाई करणे या गोष्टीदेखील त्यांच्यावर लादल्या जातात. सौंदर्याचे वरदान असलेल्या स्त्रीयांना नोकरीवर त्वरित घेतले जाते. तिशी गाठणे म्हणजे स्त्रीयांच्या नोकरीतला पूर्णविराम समजायला हवा.

मानसिक संतुलन राखणे ही जपानी कामगारांच्या समोरची मोठी समस्या असते. कारण कामाचा बोजा हा बऱ्याच वेळा न पेलणारा असतो. जपानमध्ये हजेरी कार्ड भरत नाहीत. त्यामुळे अशाच एका घटनेत त्या कामगाराने रोज किती तास काम केले याचा पुरावा नव्हता. शेवटी वकिलाने कोर्टालाच टोयोटाकडून ही माहिती मिळविण्याची विनंती केली. त्यावरून पर्दाफाश झाला. तरीही टोयोटा खुसपटे काढून नुकसानभरपाईचे पैसे कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होती. यात अनेक वर्षे गेली. पुरेशी नुकसानभरपाई देणे भाग पडले.

कायद्याने कंत्राटी कामगारांनाही संघटना बांधण्याचा अधिकार दिला आहे, पण पुष्कळ कंपन्या त्याची अंमलबजावणीच करीत नाहीत. संघटनेचे नेते फक्त माहिती पुरविण्याचे काम करतात. त्यांची पुढे नेमणूक व्यवस्थापनात केली जाते. म्हणून त्यांच्या धोरणांना ते विरोध करीत नाहीत. या निवडणुकात उमेदवारी हवी असेल तर त्या माणसाला दहा व्यवस्थापनातल्या अधिकाऱ्यांची शिफारसपत्रे लागतात. निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला मिळणारे पेन्शन, सुविधा, विमा संरक्षण, त्याच्यानंतर कुटुंबीयांनाही मिळणारे काही फायदे – ही अमेरिकेत १६ टक्के आहे तर जपानमध्ये फक्त १ टक्का.

जे उद्योगात तेच राजकारणात. निवडणुकीच्या फक्त एक आठवडा आधी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येतात. त्यामुळे धोरणांवर चर्चा, गुऱहाळ होण्यास वाव नाही. घरोघरी जाऊन प्रचार करण्याला बंदी आहे. उमेदवारांना त्याचे वैयक्तिक फोटोही वापरण्यास मनाई आहे. प्रत्येक उमेदवारावर फक्त २ वाहने वापरण्याची सक्ती आहे. मोठे पक्ष वृत्तपत्रीय जाहिराती देऊ शकतात. लहान पक्ष त्यांच्या पासंगालादेखील पुरत नाहीत. कॅमी अशा भारदस्त नावाखाली जपानी मोटार कंपन्यांनी उत्तर अमेरिकन कंपन्यांशी करार केले, पण ते टिकले नाहीत. कारण अमेरिकन कामगारांना जपानी व्यवस्थापनाची बळजबरी पचनी पडली नाही. संघवृत्तीचा अभाव, श्रेय उपटण्याकरिता केलेली चलाखी, अंतर्गत हेवेदावे ही कोणत्याही देशाची मक्तेदारी नाही. जगभर हे चालते, परंतु जपानमधील (हंगामी) कामगारांपेक्षा हिंदुस्थानातल्या कायम कामगारांची स्थिती खूपच उजवी आहे!

चकाकते ते सर्व सोनेच नसते! जपानचे वैभव जगाला ढळढळीत दिसते, पण त्यामागील सामान्य नागरिकाचे श्रम, त्याग आणि प्रामाणिकपणा याकडे दुर्लक्ष होते, पण मग कोणी विचारील, देश महत्त्वाचा की वैयक्तिक लाभ? कमी काम करून फक्त आखाती देश संपत्तीने सुजले, पण त्यांच्या देशातले तेलाचे साठे केव्हा ना केव्हातरी संपतीलच. पेट्रोलऐवजी दुसरे इंधन वापरून मोटारी चालवता येतील. सौदीअरेबियाने २०३० सालानंतर काय परिस्थिती असेल याचे समीक्षण करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. हिंदुस्थानात मोदींनी स्वावलंबनाचा नारा दिला आहे. शेवटी सामान्य जनतेचा प्रतिसाद कसा मिळतो यावर मोदींचे यश अवलंबून आहे. ‘‘ना मैं खाऊंगा ना किसीको खाने दुंगा’’ हे त्यांच्या वैयक्तिक बाबतीत वादातीत आहेच. तीन वर्षांत कोणतीही भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड झाली नाहीत ही जमेची बाजू आहे! मोदी उत्कृष्ट वक्ते व विक्रेते आहेत. त्यांच्यावरच आधुनिक हिंदुस्थानची प्रगती व उभारणी अवलंबून आहे. एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढण्यात ते आतापर्यंत तरी कमी पडलेले नाहीत हाच आशेचा प्रखर किरण आहे.

(पुण्याचे डॉ. माणिक खेर यांच्या अभ्यासपूर्ण लेखातल्या माहितीचा उपयोग सढळ हस्ते केला आहे – लेखक)

आपली प्रतिक्रिया द्या