ट्रुडोची अयशस्वी हिंदुस्थान भेट!

104

>> डॉ. विजय ढवळे, ओटावा-कॅनडा

१५ ते २२ फेब्रुवारी २०१८ या आठवडय़ात कॅनडाचा तरुण पंतप्रधान जस्टिन टडो हा हिंदुस्थान दौऱ्यावर आला होता. त्याच्याबरोबर १४ खासदारांचा ताफाही होता. त्यामध्ये संरक्षणमंत्री सज्जान आणि व्हँकुव्हरचा खासदार सोहोल यांचाही समावेश होता. हे दोघेही हिंदुस्थान सरकारच्या दृष्टीने छुपे खलिस्तानी होते आणि तसे स्पष्ट नोंदवूनही टडोने त्यांना आपल्यासमवेत आणले होते. हे नरेंद्र मोदींना रुचले नाही म्हणून ज्या मोदींनी केवळ महिन्यापूर्वीच शूर, स्वाभिमानी, पराक्रमी इस्रायलसारख्या चिमुकल्या राष्ट्राच्या पंतप्रधानांचे स्वागत करण्याकरिता प्रोटोकॉल बाजूला ठेवला, विमानतळावर स्वतः जाऊन गळाभेट घेतली होती. त्याच मोदींनी टडोच्या स्वागतासाठी मात्र एका ज्युनियर मंत्र्याला पाठवले होते. टडो मात्र हिंदुस्थानी पेहेरावात सर्वत्र वावरत होता. त्याचप्रमाणे त्याची पत्नी सोनिया ग्रेगरी आणि त्यांची तिन्ही मुले. ताज महाल, अमृतसरमधील सुवर्ण मंदिर वगैरे प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी अनेक टुरिस्ट येतात त्याच वकुबाने टडो व त्याचा परिवार आला आहे असे भासवत त्याच्या भेटीला मोदी सरकारने विशेष महत्त्व दिले नाही. त्याच्या भेटीपूर्वी कॅनडा व हिंदुस्थान यांच्यातली साम्य स्थळे हुडकली जात होती. दोन्ही देश लोकशाहीवादी आहेत, इंग्रजी भाषिक आहेत, राष्ट्रकुलचे सदस्य आहेत, कॅनडात सुमारे १० लाख लोक हिंदुस्थानी वंशाचे आहेत वगैरे गोष्टींवर भर दिला जात होता.

परंतु हिंदुस्थान सरकारला टडोच्या उदारमतवादी धोरणांबद्दल साशंकता होती. त्याने सीरियामधील यादवी युद्धात निर्वासित झालेल्या २५ हजार लोकांना कोणतेही ठोस नियम न लावता कॅनडात प्रवेश देण्याची घोषणा त्याच्या निवडणूक प्रचार मोहिमेत केली होती. प्रत्यक्षात आले त्याच्या दुप्पट लोक. पैकी ९० टक्के अजूनही बेकार आहेत. सरकारने त्यांच्यावर आतापर्यंत ५००० कोटी रुपये खर्चले आहेत व त्यामध्ये घट होण्याची चिन्हे नाहीत. क्युबाचा क्रूर हुकूमशहा फिडेल कॅस्ट्रो वयाच्या ९०व्या वर्षी मरण पावला. त्याने क्युबाच्या तीन पिढय़ा तरी नासवल्या, लोकशाहीला संपूर्ण हरताळ फासला. मात्र त्याच्यावर स्तुतीसुमने उधळणारा जस्टिन टडो हा एकमेव पाश्चात्त्य नेता होता. याच टडोने २०१७ साली चीन दौऱयात तेथील राज्यकर्त्यांना लोकशाहीचे धडे देण्याचा मूर्खपणा केला होता. परिणामी कॅनडा आणि चीन यांच्यातला मुक्त व्यापार करार प्रस्ताव हा अनिश्चित काळाकरिता खुंटीवर टांगला गेला होता.

राजकीय अपरिपक्वता किंवा स्वतःवर प्रकाशझोत पडण्याकरिता इतर गोष्टींची दखलही न घेण्याची सवय ही जस्टिन टडोने यापूर्वीही प्रकट केली होती. हे महाशय २०१६च्या नाताळ सुट्टीत प्रिन्स आगाखान यांच्या बहामा बेटावरील खासगी प्रॉपर्टीवर आठवडाभर मुक्काम ठोकून होते. हा आगाखान त्याच्या चॅरिटी फाऊंडेशनकरिता कॅनेडियन सरकारकडून कोटय़वधी डॉलर्सचे दरवर्षी अनुदान घेतो. त्यामुळे हा उघड उघड Conflict of Interest होता. त्यावर सडकून टीका झाली. चौकशी समितीने वर्षभर बैठकांचे गुऱहाळ लावले. शेवटी टडोवर दोष ठेवला तेव्हा त्याने आगाखान आमचे कौटुंबिक मित्र आहेत असे लंगडे समर्थन दिले. या मित्राला टडो मात्र १६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भेटत होता हे विशेष. मी पूर्ण जबाबदारी घेतो असे तो पार्लमेंटमध्ये म्हणाला. म्हणजे काय? या ट्रिपचा खर्च तू खिशातून भरून देणार आहेस का? नाव नको, उलट त्यानंतर एक आईस स्केटिंग मॅच पाहण्याकरिता तो सहकुटुंब व्हँकुव्हरल दोन सरकारी विमाने घेऊन गेला होता. हा काय सत्तेचा माज म्हणायचा की बेफिकीर वृत्ती? की चक्क बेजबाबदारपणा?

टडोची हिंदुस्थान भेट ही दुय्यम दर्जाची असल्याचे मोदी सरकार ठरवत असल्याची टीका कॅनडाच्या वृत्तसंस्थेने केली आणि मोदींच्या असंतोषात आगीची ठिणगी पडली ती दिल्लीमधील कॅनडाच्या राजदूताच्या घरी टडोच्या सन्मानार्थ डिनर पार्टी झाली त्यावेळी. त्यामध्ये जसपाल अटवाल हजर होता. हाच तो आतंकवादी की, जो २० वर्षे तुरुंगात हिंदुस्थानी केंद्रीय मंत्र्यावरील हल्ल्यात दोषी म्हणून जेरबंद होता. हीच ती असामी की, ज्याने उजाल दुसांज या नेत्यावर त्याने खलिस्तानला विरोध दाखवला म्हणून बेगुमान हल्ला केला होता आणि अशी पार्श्वभूमी असलेली, खुनशी प्रवृत्तीची व्यक्ती पंतप्रधानांसाठी आयोजित केलेल्या डिनरला उपस्थित राहते हा काय प्रकार आहे? पंतप्रधानांचे कार्यालय, राजदूताचे कार्यालय, सुरक्षा अधिकारी प्रत्येक आमंत्रिताला आधी पडताळून पाहतात की नाही? मग हा घातकी जसपाल अटवाल दिमाखात आमंत्रित म्हणून मिरवतो, इतकेच नव्हे तर पंतप्रधानाची पत्नी सोफिया ग्रेगरी हिच्या समवेत फोटोही काढून घेतले. त्यामुळे हिंदुस्थान सरकारच्या परराष्ट्र संरक्षण खात्याचा तिळपापड उडाला यत नवल ते काय!

मुळातच जसपाल अटवालला प्रवेश मिळालाच कसा, असा प्रश्न वार्ताहरांनी टडोला केला तो गुरुवारी, १५ फेब्रुवारी २०१८ला. तेव्हा टडोने रणदीप सराई या व्हॅंकुव्हरच्या खासदाराचे नाव घेतले, ज्याचा टडोच्या शिष्टमंडळात समावेश होता आणि सराईच्या शिफारसीने अटवालला राजदूताच्या ऑफिसने निमंत्रित केले असे सांगितले. याविषयी संपूर्ण चौकशी केली जाईल आणि त्याबद्दल जे कोणी जबाबदार असतील त्यांना पूर्ण निवेदन जाहीर करावे लागेल असे टडो म्हणाला. हे म्हणजे ‘बैल गेला आणि झोपा केला’ असे म्हणण्यासारखेच निरर्थक आहे. एक खलिस्तानी दोषी ठरल्यामुळे दोन दशके तुरुंगामध्ये व्यतीत केलेला माणूस राजदूताच्या निवासस्थानी उजळ माथ्याने वावरतो याचे कुठलेही समर्थन होऊच शकत नाही. त्यामुळे दुसऱया दिवशी पंतप्रधान मोदी यांनी १६ फेबुवारी २०१८ला टडोची अनौपचारिक भेट घेतली खरी. दोघांनीही सभ्यतेचे मुखवटे चढवले होते. मोदींनी आपण डेव्हॉसमध्ये समक्ष भेटीत सांगूनही टडोने त्याच्या समवेत खलिस्तानला सहानुभूती असणारे लोक आणले होते. त्याबद्दल उघड रोष व्यक्त करणे राजकीय शिष्टाचारात बसत नसल्यामुळे तसे केले नाही, इतकेच. टडोलाही तोंड वर करून अटवालच्या डिनर पार्टीतल्या उपस्थितीबद्दल काही बोलणे शक्यच नव्हते. म्हणून तो अप्रिय विषय अनुल्लेखाने मारला गेला!

कॅनडा-हिंदुस्थान यामधील मैत्रीचे गोडवे गाणाऱ्यांना हेसुद्धा आकलन झाले पाहिजे की, सर्वसामान्य हिंदुस्थानी कॅनडाबद्दल कोणतीही खास आस्था वा आपुलकी नाही. हा देश अत्यंत थंड, वर्षातून पाच महिने शून्याच्या खाली तापमान असलेला. त्यामुळे येथे येणाऱयांची, इच्छुकांची संख्या सध्या जरी आठ लाखांची वेटिंग लिस्टवरील मर्यादा ओलांडून गेली असली तरी हिंदुस्थानीयांची आसुसलेली नजर प्रथम अमेरिका, मग ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंडकडे लागलेली असते! ते कॅनडातही इमिग्रेशनकरिता अर्ज खरडून ठेवतात इतकेच. त्याचप्रमाणे कॅनडामध्ये हिंदुस्थानसारख्या दक्षिण आशियामध्ये घडणाऱ्या घडामोडींमध्ये बदल करण्याची ताकदही नाही, ना इच्छाशक्ती. हिंदुस्थान व कॅनडा या दोन देशांतला वार्षिक व्यापार अवघा पाच अब्ज डॉलर्सचा आहे. तेवढाच व्यापार कॅनडा आणि अमेरिका या देशांमध्ये केवळ दोन दिवसांत होतो. त्यामुळे त्यादृष्टीनेही कॅनडा आणि हिंदुस्थान हे तसे एकमेकांनाही नगण्यच देश म्हणायला हवेत.

दावोस येथे जागतिक आर्थिक फोरम झाली तेव्हा मोदींनी ‘‘कॅनडात फुटीरतावाद्यावर नियंत्रण घातले जात नाही, उलट तुमच्या मंत्रिमंडळातच खलिस्तान्यांचा अंतर्भाव आहे’’ असे तोंडावर सुनावले होते. तेव्हा जस्टिन टडोने ‘‘तसे काही नाही, तो अपप्रचार आहे. कॅनडाच्या भूमीवर कोणत्याही घातपात करणाऱया लोकांना वा संस्थांना उत्तेजन दिले जात नाही’’ असे थातूरमातूर उत्तर देऊन वेळ मारून नेली होती. हा जस्टिन टडो दिसायला अत्यंत रुबाबदार व देखणा तरुण आहे. केवळ ४६ वर्षीय, जन्मतारीख २५ डिसेंबर १९७१. त्याचे वडील १५ वर्षे कॅनडाचे पंतप्रधान होते. अतिशय बुद्धिमान. वकिली पेशा होता. १९७४ साली इंदिरा गांधींनी अणुस्फोट चाचणी केली तेव्हा महात्मा गांधींच्या देशात हे व्हावे याचे मला दुःख होते अशी त्यांची टिपणी होती व कॅनडाने हिंदुस्थानवर आर्थिक निर्बंधही लादले होते.

जस्टिन टडो हा दुय्यम बुद्धिमत्ता असलेला राजकारणी आहे, पण वडिलांची पुण्याई आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व यावर भाळून २०१५ साली कॅनेडियन्सनी त्याला बहुमताचे सरकार बहाल केले. त्याच्या ३२ जणांच्या मंत्रिमंडळात चार पंजाबी आहेत. त्यात संरक्षणमंत्री सज्जानही आहे. सज्जान व सोहेल हे दोघेही खलिस्तानचे पाठीराखे आहेत, किमान सहानुभूती दाखवणारे आहेत असे हिंदुस्थान सरकारने टडोच्या निदर्शनास आणून दिले. टडो जेव्हा पंजाबमध्ये अमृतसर सुवर्ण मंदिरात गेला तेव्हा तेथील मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्या दोघांना भेटण्यासही नकार दिला, परंतु त्यावरून टडोने कोणताही धडा घेतला नाही. टडो हा एकेकाळी स्की शिकवणारा तसेच नाटय़ाचे धडे देणारा शिक्षक होता, पण त्याच्यात अफाट ‘चमकोगिरी’ आहे! ट्रंपच्या जहाल भूमिकेवर आपण प्रभावी उतारा आहोत अशी त्याने समजूत करून घेतली आहे. त्याला लोकप्रियतेचा विलक्षण हव्यास आहे. मुस्लिमांना गोंजारण्याची त्याची प्रवृत्ती आहे. त्यामुळे त्याची हिंदुस्थान भेट कशी विनाअडथळा पार पडते यावर राजकीय निरीक्षक लक्ष ठेवून होते आणि त्याची हिंदुस्थान यात्रा ही संपूर्ण निप्रभ आणि अयशस्वी झाली असेच म्हणावे लागेल.

(लेखक कॅनडास्थित उद्योजक आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या