माणूसपण अधोरेखित करणारा ‘क:विमुक्ता’

>> डॉ. वीणा सानेकर

कवी आणि कविता समजून घेण्याचे, उलगडण्याचे प्रयत्न तरुण पिढीने जाणीवपूर्वक करावेत ही एकूण मराठी साहित्याच्या दृष्टीने एका आश्वासक पर्वाची नांदी म्हणता येईल. गीतेश शिंदे, संकेत म्हात्रे, पंकज दळवी यांच्या कोलाजचा उल्लेख त्याकरिता करायला हवा. एखाद्या कवीच्या फारशा न ऐकलेल्या, न वाचलेल्या कविता प्रत्यक्ष ऐकणं ही कोलाजच्या ’क’ची संकल्पना. ’कःविमुक्ता’ने तिचा नावीन्यपूर्ण आविष्कार सादर करण्याचे ठरवले. मराठीतील आघाडीच्या पाच कवयित्रींशी यानिमित्ताने डॉ. वीणा सानेकर यांनी संवाद साधला. त्याच अनुभवाला त्यांनी दिलेले हे शब्दरूप.

शब्दांतून स्त्रीने तिची स्वप्ने गुंफली. वेदना मोकळी केली. उद्वेग, संताप, अपमान, आनंद…सारंच शब्दांतून व्यक्त केलं. हाती लेखणी नव्हती तेव्हाही ती रचतच होती. जात्यावरच्या ओव्या आणि स्त्रीगीते, थेरीगाथा, धवळे, अभंग ही तिच्या शब्दांची आणखी रूपे. जनाबाई, मुक्ताबाई, सोयरा, वेणाबाई यांनी त्यांचे/ त्यांचे शब्द शोधले. संतकवितेत या कवयित्रींच्या कवितेला स्वतंत्र स्थान आहे. त्यानंतरच्या काळात क्षीण झालेली स्त्री कवितेची परंपरा प्रबोधन काळात पुन्हा पुनरुज्जीवित झालेली दिसते. १९व्या शतकात सबंध महाराष्ट्रात वैचारिक घुसळण सुरू झाली. ताराबाई शिंदे, मुक्ता साळवे यांचे निबंध व्यवस्थेला प्रश्न विचारू लागले. सावित्रीबाईंची कविता माणुसकीचा दिवा घेऊन प्रकटली. १९२० ते १९५० या काळात लक्ष्मीबाई टिळकांनी लिहिलेली ‘करंज्यात मोदक कशाला?’ ही कविता खूपच गाजली.

नर नारी संगम जिकडे तिकडे पाही
विश्वात एकले कुठेच काही नाही

हे त्यांनी अधोरेखित केले तर ‘जरी फुटल्या बांगडय़ा, मनगटी करतूत’ असं बहिणाबाई चौधरींनी याच काळात म्हटले.

नाही मी नुसती मादी
मी माणूस, माणूस आधी

ही जाणीव या काळात स्पष्ट होऊ लागली होती. शांताबाई शेळके, इंदिरा संत या याच काळात लिहू लागल्या होत्या. १९७५ हे एकूणच स्त्रीयांच्या दृष्टीने जागतिक स्तरावरच अतिशय महत्त्वाचं वर्ष! ७०पूर्वीची कविता कशी होती याचे वर्णन करताना इंदिरा संतांच्या दोन ओळी आठवतात –

हवा फुलांचा शेजार बाई हसत राहावे
काळजाच्या कुपीमध्ये हवाबंद दुःख व्हावे

सुखाची आरास जगापुढे मांडावी आणि दुःख मात्र आपल्यापाशी ठेवावे ही जाणीव या काळात ठळक होती. यामागचं कारण शोधताना असे दिसते की, स्त्रीच्या प्रत्येक कृतीवर समाजाचा पहारा होता आणि त्यातून लेखनाची कृतीही सुटली नव्हती. पुरुषप्रधान व्यवस्थेचा हा पहारा लिहित्या बाईने १९७५नंतर झुगारून द्यायला सुरुवात केली. विमुक्त होण्याचा हा तिचा प्रवास समजून घेण्याची संकल्पना कोलाजनिर्मित ‘कः विमुक्ता’ या कार्यक्रमामागे होती. घाटकोपरच्या झुनझुनवाला महाविद्यालयात ‘कोमसाप’च्या युवा कट्टय़ाच्या सहकार्याने त्याचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. सिसिलिया कार्व्हालो, डॉ. अनुपमा उजगरे, प्रा. प्रतिभा सराफ, जयश्री हरी जोशी आणि योगिनी राऊळ या पाच कवयित्रींशी त्यांच्या कवितांसह संवाद असे कार्यक्रमाचे स्वरूप होते.

घरात कोणतीही साहित्यिक पार्श्वभूमी नसताना कवितेकडे ओढल्या गेलेल्या डॉ. सिसिलिया कार्व्हालो वसईच्या मातीचे, तिथल्या निसर्गाचे, वाडवळी बोलीचे फार मोठे योगदान मानतात.

बाई : पोकळी व्यापत जाते
अवकाश व्यापत जाते
अवकाश होत जाते
आणि आकाशाला येतो बहर

हे शब्द लिहिणाऱ्या सिसिलिया यांची कविता केवळ स्त्रीकेंद्री जाणिवाच व्यक्त करत नाही, तर भोवतालातील अनेक विसंगती आणि समजुतींवर ती थेट भाष्य करते. कर्मकांडाच्या बंदिस्त चौकटीत अडकून पडलेल्या समाजाला ती रोखठोक शब्दांत सांगते, ‘‘ही वाट फक्त देवळापर्यंत जाते, पण ती तुम्हाला स्वर्गापर्यंत नेईलच असे नाही.’’

विशुद्ध भावकवितेशी नातं सांगणारी डॉ.अनुपमा उजगरे यांची कविता ‘सांगी’ आणि ‘पश्चात’ या कवितासंग्रहांतून वाचकांसमोर आली. ‘कःविमुक्ता’ या कार्यक्रमात आजोबांच्या साहित्य संस्कारांची पार्श्वभूमी सांगत सादर केलेली ‘वाण’ ही कविता आयुष्याला मिळालेल्या कवितेच्या समृद्ध देण्याविषयीची कविता होती.

काही क्षणांची तिची भेट
माझी ओटी भरून जाते
पुढच्या प्रवासातल्या नव्या वाणासाठी
मी पुन्हा तिची वाट पाहते

कवयित्री प्रतिभा सराफ यांच्या कवितेतील खिडकीशी निगडित आई/मुलीच्या संवादांतून नवे आश्वासक आकाश खुले झाले. प्रतिभा सराफ यांच्या छोटय़ा कविता आणि गझलचे निवडक शेर त्यांनी भावस्पर्शी शैलीत सादर केले.

तुझा चेहरा दिसू लागला मुलीत आता
जगण्याचे मी पुन्हा ठरवले तू नसल्यावर

आयुष्यातील स्थित्यंतरे, भोवतालातल्या घडामोडी आणि पडझडी यांची स्पंदने व्यक्त करताना मराठीतली स्त्र्ााr कविता अभिव्यक्तीच्या वेगवेगळ्या वाटा शोधते आहे याचा प्रत्यय या कार्यक्रमातून येत राहिला.

या कार्यक्रमात सहभागी झालेली आणखी एक कवयित्री म्हणजे जर्मन, संस्कृत, इंग्रजी अशा विविध भाषांची अभ्यासक, अनुवादक जयश्री हरी जोशी. मुंबईतील मॅक्समुल्लर भवनमध्ये समन्वयक म्हणून कार्यरत असलेली जयश्री नादविभोर आणि मुक्तछंदातली अशी दोन्ही प्रकारची कविता लिहिते. मायलेकींचा अनुबंध उलगडणाऱया ‘दृष्ट’ या कवितेतील या ओळी रसिकांची दाद मिळवून गेल्या.

मला अनाम गावाची गर्भधून ऐकू येते
माझ्या सकंप श्वासाला
आई पुन्हा झोके देते

‘मोड आल्या दुःखा’ ही अनुपमा उजगरे यांची कविता नादसौंदर्य आणि आशय या दोन्ही अंगांनी उपस्थितांना विशेष भावली. योगिनी राऊळ यांच्या कविता स्त्र्ायांच्या प्रश्नांना भिडतानाच त्या प्रश्नांची चिकित्साही करतात. त्यातूनच त्यांची ‘घर की दुकान’ ही कविता जन्माला आली असावी.

या नं ताई बघा नं
इतक्या वर्षांचे कष्ट आजारपण
सासरच्या खस्ता इथे आहेत बघा
नवऱयाचा खाल्लेला मार? काचेच्या मागे आहे

या कवितेतून दुःखाचे प्रदर्शन करण्याचे धोक्याचे वळण स्त्रीला मोहात पाडत असते हेदेखील सुचवले गेले. १९८५ पासून स्त्रीमुक्ती चळवळीशी जोडल्या गेलेल्या आणि ‘प्रेरक ललकारी’ या नियतकालिकाच्या संपादनाशी जोडल्या गेलेल्या योगिनी राऊळ यांच्या कवितांना त्यांच्या कामातून एक वेगळे परिमाण लाभले आहे. ‘बाईपणातून बाहेर पडताना…’ हा त्यांचा कवितासंग्रह २०१५ साली प्रकाशित झाला.

आजच्या घडीला मराठीत वेगवेगळ्या वर्गातली स्त्री लिहिते आहे. वंचित, बहुजन समाजातील स्त्रीदेखील आपल्या लेखणीला धार लावते आहे. आपल्या समाजाने निर्माण केलेल्या साच्यांमध्ये केवळ स्त्रीयांनाच नाही तर पुरुषांनाही बंदिस्त केले आहे हे भान आणून देते आहे. यातूनच माणूसभानापर्यंतचा तिचा परीघ विस्तारत जातो आहे. ग्लोबलायझेशननंतरची भोवतालातली पडझड, अधांतरी लोंबकळणाऱया नव्या पिढीचे प्रश्न, निसर्ग व माणूस यांच्यातील ढळत चाललेला समतोल, मानवी नात्यांमधील विस्कटलेपण असे अनेक पैलू आजच्या स्त्री कवितेतून समोर येत आहेत. जागतिक पातळीवर लिहिल्या जात असलेल्या स्त्री कवितेच्या तुलनेत मराठीतील , स्त्री कविता कुठेच उणी नाही ही जाणीव या कार्यक्रमातून निश्चितच निर्माण झाली. कोलाजनिर्मित ‘कःविमुक्ता’ म्हणूनच दीर्घकाळ स्मरणात राहील.

– veenasanekar2018@gmail.com