कपूर खानदानाचे पाय मातीचेच

  • डॉ. विशाखा गारखेडकर

सुवर्णकाळ पाहिलेल्या आर. के. स्टुडिओची विक्री अखेरीस झाली आणि सिनेजगताचा एक अध्याय आता इतिहासजमा होतोय. अस्वस्थ करणाऱ्या या घटनेविषयी कुठेच प्रतिक्रिया नाहीत. वडिलोपार्जित जायदाद विकून कपूर बंधूंनी आपले पाय मातीचेच असल्याचे दाखवून दिले आहे. सिनेप्रेमींसाठी ही दुःखद अशी घटना आहे.

काही संस्था किंवा व्यक्ती यांचे नुसते अस्तित्वदेखील आपल्याला अभिमानाने मिरवायला आवडत असते. मुंबईतील चेंबूर भागात असलेल्या आर. के. स्टुडिओच्या बाबतीतही अनेकांना असेच वाटत असावे. त्या स्टुडिओचे केवळ असणेसुद्धा कालपर्यंत खूप सुखावणारे होते. दीड वर्षापूर्वी या स्टुडिओला लागलेल्या आगीच्या घटनेने पहिल्यांदा मनावर ओरखडा उमटला आणि आता काल हा स्टुडिओ गोदरेज प्रॉपर्टीजला विकल्याची बातमी धडकली आणि आपल्या शरीराचा एक भाग जणू कोणीतरी तोडून नेलाय आणि त्यामुळे आतून खूप तुटल्यासारखे रितेपण आल्याची जाणीव झाली. खरे तर आर. के. स्टुडिओचा आणि आपला थेट संबंध कधीही नव्हता. मात्र, लहानपणापासून यासंबंधातील सुरस कथा ऐकत मोठी होत असल्यामुळे भावनिक बंध निर्माण झाले होते. अनेकांच्या याच भावना असतील.

आपण हिंदुस्थानी तसेही कमनशिबी किंवा कर्मदरिद्री म्हणा हवे तर, वारशाने मिळालेली संपत्ती, ऐवज, ऐतिहासिक ठेवा जपण्याचे किंवा सांभाळण्याचे तर सोडाच, पण कधी एकदा विपून त्यातून पैसा कमावू याचाच अधिक हिशेब मांडणारी आहोत, असे माझे वैयक्तिक मत आहे. कारण हा वारसा, संपत्ती, आयती मिळालेली असते. कष्ट घेतलेले नसतात, त्यामुळे त्याचे महत्त्व कसे कळणार? कोणत्याही मध्यमवर्गीय कुटुंबात शेती, दागदागिने, घर यांची वाटणी कर्त्या पुरुषाच्या पश्चात वर्षभराच्या आत केली जाते. तसेच काहीसे कपूर कुटुंबातही घडलेले दिसते. थेट मध्यमवर्गीय कुटुंबाच्या मानसिकतेशी केलेली तुलना काहीजणांना आवडणार नाही; परंतु थोड्याफार फरकाने हेच आर. के. स्टुडिओच्या विक्रीबाबत घडले असावे. समाजवाद्यांच्या वस्तीत बिल्डरला बंगल्याची जागा विकून टोलेजंग फ्लॅट उभारून आपल्या वाडवडिलांच्या समाजवादी विचारांनाच तिलांजली दिलेली पिढी निर्माण झालेली दिसेल. 1990 नंतरच्या परिकोषाचा हा परिणाम आहे.

हिंदुस्थानच्या फिल्म इंडस्ट्रीत ‘शो मॅन’ म्हणून गौरवलेल्या आणि ज्याचा अग्रणी उल्लेख केल्याशिवाय हिंदुस्थानच्या सिनेमाचा इतिहास लिहिला जाऊ शकत नाही त्या राजकपूर यांच्या कुटुंबानेदेखील त्यांच्या पश्चात आर. के. स्टुडिओ एका मोठ्या उद्योगाच्या घशात घालून भलेही 500 कोटी कमावले असतीलही, मात्र इथल्या असंख्य लाखो, करोडो सिनेमाप्रेमींच्या हृदयाला पिळवटून टाकले आहे. हळहळण्याव्यतिरिक्त आपल्या हाती काय आहे? एकट्या कपूर कुटुंबालाच दोष तो कसा देणार? आर. के. स्टुडिओचा फारसा वापर न करणारी सिने इंडस्ट्रीतील मंडळीदेखील या स्थितीला कारणीभूत आहेतच.

राज कपूर या निळ्या डोळ्याच्या माणसाने हिंदुस्थानमधील प्रत्येक सिनेमाप्रेमीला स्वप्न पाहायला आणि जगायला शिकविले. अत्यंत भोळाभाबडा, कधी डोक्यावर टोपी, खांद्यावर काठी आणि पॅण्टीला खालून दोन-चार पह्ल्ड अशा अतिसामान्य वेशात पडद्यावर आदर्शवाद दाखवत राजकपूरने स्वातंत्र्यानंतरच्या पिढीला ही स्वप्ने विकली. त्यासाठी तो कधी ‘आवारा’ झाला, कधी ‘अनाडी’ तर कधी बूटपॉलिशवाला झाला. चार्ली चॅप्लीनशी मिळतेजुळते पात्र वठवत राज कपूर यांनी खूप वर्षे अधिराज्य गाजवले. देशाला नुकतेच स्वातंत्र्य मिळालेले असल्यामुळे सगळा देश चाचपडत होता. त्या काळात राज कपूर यांनी सर्वसामान्यांच्या आशा-अपेक्षा, व्यथा, दु:ख, वेदना पडद्यावर मांडायला सुरुवात केली. त्यांच्यातील हळव्या प्रेमीला, तर कधी जोकरला लोकांनी डोक्यावर उचलून धरले. वडिलांचा चित्रपटातील अभिनयाचा तसेच श्रीमंतीचा वारसा असतानाही स्पॉटबॉयपासून सुरुवात करीत राज कपूर यांनी करीअरला सुरुवात केली. अत्यंत कल्पक असलेल्या राजकपूर यांनी नेमकी पोकळी हेरली आणि नावीन्यपूर्ण विषय हाताळत चित्रपट काढले. राज कपूर म्हणेल ती पूर्व दिशा असा दरारा एकेकाळी त्यांनी निर्माण केला होता.

‘बरसात’ या चित्रपटाच्या यशानंतर 1949 मध्ये मुंबईच्या चेंबूर भागात जागा घेऊन राज कपूर यांनी आर. के. स्टुडिओची भव्यदिव्य उभारणी करत शोमॅन असल्याचे दाखवून दिले. आवारा, आग, मेरा नाम जोकर, कल आज और कल, जिस देश मे गंगा बहती है, श्री 420, बॉबी, सत्यम शिवम सुंदरम, प्रेमरोग, राम तेरी गंगा मैली, शाहरुख खानचा ओम शांती ओम, हिना, रूप की रानी चोरों का राजा अशा कितीतरी यशस्वी चित्रपटांची निर्मिती आर. के. स्टुडिओमध्ये झाली. राजकपूर यांच्या हयातीत या स्टुडिओत होळी खेळायला अनेक दिग्गज यायचे. या होळीचा खूप बोलबाला होता. सिनेमा हा श्वास मानणाऱ्या राज कपूर यांनी आपली सर्व कमाई या स्टुडिओच्या उभारणीला लावली होती.

रुपेरी पडद्यावरच्या इतिहासाला साक्षी असणारा व सुवर्णकाळ पाहिलेला स्टुडिओ राज कपूर यांच्या हयातीपर्यंत चांगला सुरू होता. त्यांच्या पश्चात रणधीर कपूर, ऋषी कपूर या त्यांच्या मुलांनीदेखील देखभाल केली. मात्र अलीकडच्या काळात उतरती कळा लागली होती. एकतर चेंबूर हा भाग आता मुंबईच्या मध्यवर्ती भागात आला होता. त्यामुळे रहदारीची समस्या वाढली होती. म्हणून अनेक जण शूटिंगसाठी स्टुडिओकडे येत नव्हते. आउट डोअर शूटिंगचे आकर्षणही वाढले होते. त्यातच दीड वर्षापूर्वी एका ‘रियालिटी शो’ला जागा भाड्याने दिली असताना आग लागल्यामुळे खूप मोठे नुकसान झाले. ऋषी कपूर यांनी पुनर्निर्माण करण्याचा विचारही केला; परंतु बंधू रणधीर कपूर यांनी विरोध केला. हा पांढरा हत्ती पोसणे आता डोईजड झाले होते. त्यामुळे स्टुडिओ विक्रीचा घाट घातला गेला.

आपल्याकडे मुलांमध्ये जायदादीवरून होणारी भांडणे काही नवीन बाब राहिलेली नाही. सिनेसृष्टीतदेखील अशी असंख्य उदाहरणे आहेत. त्यामुळे राजकपूर यांची पत्नी कृष्णा कपूर यांनी भविष्यात या स्टुडिओच्या जागेवरून आपसात वाद नको म्हणून आपल्या हयातीत तो विकून तीन मुले, दोन मुली यांना या विक्रीतून येणारा वाटा समान देण्याचे ठरविले असावे. त्यामुळेच कृष्णा कपूरची तीन मुले ऋषी कपूर, रणधीर कपूर, राजीव कपूर आणि दोन मुली रितू नंदा, रीमा जैन या सगळ्यांनी मिळून स्टुडिओ विक्रीचा निर्णय घेतला. विक्रीच्या किमतीचा खरा आकडा अद्याप बाहेर आलेला नाही. परंतु 500 कोटी असल्याची चर्चा आहे. खरेतर अशा ऐतिहासिक वास्तूची किंमत कोटींमध्ये कशी करणार? हा स्टुडिओ जतन करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यायला हरकत नव्हती. मुंबईतील असंख्य उद्योगपती, बिल्डर्स यांची जमात जागा गिळायला बसली आहे. कारण त्या जागांच्या किमती करोडोंमध्ये आहेत. आपल्या जागा पैशाच्या लोभापायी विकून मोकळे होणाऱ्यांची मानसिकता आपण एक वेळ समजू शकतो. मात्र, करोडोंत खेळणाऱ्या कपूर खानदानानेदेखील ही ऐतिहासिक वास्तू सरळ विक्री करून आपले पायसुद्धा मातीचेच आहेत हे दाखवून दिले. उद्या या ठिकाणी गगनाला भिडणाऱ्या टोलेजंग इमारती उभ्या राहून आपल्याला वाकुल्या दाखवतील. त्या वाकुल्या आपल्यासोबतच भोळ्याभाबडय़ा आदर्शवादाच्या कल्पना पेरणाऱ्या शोमॅन राजकपूर यांनादेखील असतील.