‘नित्यनेमावली’तच बीजारोपण

  • प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे

सद्गुरू श्री भाऊसाहेब महाराज उमदीकर यांच्या आज्ञेने प्रा. रा. द. रानडे म्हणजेच गुरुदेवांनी ‘नित्यनेमावली’ची संपादित स्वरूपात रचना केली. ती १९११ साली प्रसिद्ध झाली. त्यांनी नित्यनेमावलीस लिहिलेल्या प्रस्तावनेत तत्त्वज्ञान आणि अनुभूती यांचे बीजारोपण झाल्याचे कळून येते. त्यांच्या आध्यात्मिक कार्याचा रुजलेला विलक्षण महत्त्वाचा द्रष्टेपणा यात दिसून येतो. या प्रस्तावनेतील संदर्भ घेत त्यांच्या आध्यात्मिक कार्याचा मागोवा घेणारा लेख.

थोर तत्त्वज्ञ आणि साक्षात्कारी संत डॉ. रा.द. तथा श्रीगुरुदेव रानडे यांची ६१वी पण्यतिथी (ज्येष्ठ शुद्ध १०) २२ जून २०१८ रोजी निंबाळ येथील श्री गुरुदेव रानडे आश्रमातील समाधी मंदिरात दि. १८ ते ते २२ जूनपर्यंत पाच दिवसांच्या नामसप्ताहाने साजरी होत आहे. त्यात त्रिकाळ नामस्मरणाबरोबरच त्रिकाल भजन, दासबोधवाचन इ. कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. सद्गुरू श्री भाऊसाहेब महाराज उमदीकर यांच्या आज्ञेने व कृपेने (मार्गदर्शनाखाली) प्रा. रा.द. रानडे यांनी ‘नित्यनेमावली’ची संपादित आणि सकलित स्वरूपात रचना केली. ती १९११ साली प्रसिद्ध झाली. त्यावेळी श्री गुरुदेवांचे वय अवघे २५ वर्षे होते. त्यांनी नित्यनेमावलीस लिहिलेल्या प्रस्तावनेत तत्त्वज्ञान आणि अनुभूती यांचे बीजारोपण झाल्याचे कळून येते. त्या नेमावलीत शेवटी त्यांनी ‘अनुभवपद शतक’ या शीर्षकाखाली मराठी, कानडी, हिंदी अशी एकूण ११० पदे घेतली आहेत. त्यावरून त्यांना येत असलेले आध्यात्मिक अनुभव कोणते होते, याचीही कल्पना येते. नंतर त्यांनी जे अनेक ग्रंथ लिहिले (इंग्रजी व मराठी) त्यातून अध्यात्माची बीजसूत्रे कशी विस्तार पावली हेही कळून येते. हा त्यांच्या आध्यात्मिक कार्याचा रुजलेला द्रष्टेपणा विलक्षण महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याचा मागोवा इथे घेतला आहे.

त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतच ही आध्यात्मिक-तत्त्वज्ञानाची बीजे कशी रुजली होती, हेही कळून येते. प्रस्तावनेतील काही संदर्भ इथे उधृत केले असून नंतर भजन संकलनातून त्यांनी संतांच्या मुखांतून आपल्याला अभिप्रेत असलेल्या परमार्थाचे पाथेय तुकाराम महाराज यांच्या ‘बारा-चौदा’ अभंगांतून कसे दिले आहे हेही संक्षिप्तपणे पाहता येते. अभंगांच्या रचनेतील विविध संप्रदायांतील पदांचा समावेश करून त्याद्वारे त्यांनी सांप्रदायिक-समन्वयाची भूमिकाही दर्शविली आहे. अभंगांतून व पदांतून विशेष भक्तिदर्शन त्यांनी घडविले आहे. शेवटी अनुभवपद शतकातून कसा विस्तार झाला हेही दृष्टोत्पतीस येते. यासाठी त्यांच्या वापरातील १९४५ सालची आवृत्ती व २०११ साली श्री गुरुदेव रानडे समाधी ट्रस्टने प्रकाशित केलेली १६वी आवृत्ती ही प्रमाण मानून येथील विवेचन केले आहे. १९४५ सालच्या नित्यनेमावलीच्या पहिल्या पानावर श्री गुरुदेवांची मराठी व इंग्रजीत स्वाक्षरी आहे. कारण ही नेमावली त्यांच्या वापरातली होती. श्री गुरुदेवांना त्याद्वारे ‘ईश्वरदर्शनाने आपले जीवन धन्य करून घ्यावे’ याच कार्याचा प्रसार करावयाचा होता. १६व्या आवृत्तीतील पुढील दोन परिच्छेद त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या बीजारोपणाची ग्वाही देतात.

बीजारोपणाची ग्वाही
‘आत्मदर्शन झाल्यावर अतींद्रिय पण बुद्धिग्राह्य सुख होते व ते सुख अनुभवीत असता आसनावरून हलू नये वाटते, असा गीतावचनाचा सारांश आहे. उपनिषदातही ‘परं ज्योतिरूपसंपद्य स्नेन रूपेण अभिनिष्पद्यते सोsमात्मा’ असे वचन आहे. पतंजलीनी योगाचे फल ‘तदा दृष्टुः स्वरूपेsवस्थानम्’ असेच दिले आहे. ती सद्गुरूस शरण गेल्यानेच अनुभवास येते. ‘सत्वाचे चांदणे’, ‘पहावा दर्पणीचा नयन’, ‘पोथी वाचू जाता पाहे, मातृकामध्येचि आहे’, ‘करे घेतो वस्तुलागी आडवे ब्रह्म’ इत्यादी वाक्यांचा गुरुकृपेवाचून बोध होणे अशक्य आहे. सर्व साधूसंतांनी आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता राजयोग व भक्ती यांची विलक्षण सांगड घातली होती.

आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर देव व भक्त यामधील विभक्तपणा निघून जातो. आपण ब्रह्म झालो अशी खात्री झाल्यावर सर्वाभूती भगवद्भाव दिसू लागतो, हाच सर्व साधुसंतांचा उपदेश आहे. प्रथम आत्मदर्शन कसे होते व नंतर अभेदबुद्धी कशी होते, याचे श्री ज्ञानदेवांनी उत्कृष्ट निरूपण केले आहे.

परमार्थाची दशविध सूत्रे
श्री गुरुदेवांनी ‘नित्यनेमावली’तच आणखी एक परिच्छेद लिहिला असून त्यात ‘परमार्थाची दशविध सूत्रे’ प्रकट केली आहेत. ते लिहितात की, ‘धन्य ते साधू की ज्यांनी हा अनुभव घेतला आहे! वरील दोन ओव्यांत ज्ञानदेव महाराजांनी सर्व वेद, सर्व शास्त्र, सर्व पुराणे यांचे सार थोडक्यात सांगितले आहे. याचा अनुभव घेण्यास साधने म्हटली म्हणजे प्रथम गुरुकृपा पाहिजे व नंतर श्रवण, विचार व अभ्यासही पाहिजे. नंतर विवेक वैराग्य उत्पन्न होऊन मनुष्य आत्मदर्शनास पात्र होतो. आत्मदर्शन झाल्यावर हृदयग्रंथी तुटते, सर्व संशय नष्ट होतात, नैष्कर्म्यसिद्धी प्राप्त होते. देवात आणि भक्तात भेद उरत नाही. साधक द्वैतापासून अद्वैतास, आकारापासून निराकारास, स्वरूपापासून ब्रह्मस्थितीस सहज प्राप्त होतो. ‘नित्यनेमावली’तील काकडारती ते शेजारती या संदर्भातील पदे व अभंग म्हणजे संपूर्ण भक्तिशास्त्रच होय. त्यातही रात्रीच्या भजनातील तुकाराम महाराजांचे ‘बारा-अभंग’ म्हणजे अध्यात्मविद्येचा मेरूदंड आहेत.

अनुभव पद शतकाचे विशेषत्व
श्री गुरुदेवांच्या वापरातील १९४५ सालची ‘नित्यनेमावली’ पाहता त्यात शेवटी ‘अनुभवपद शतक’ या शीर्षकाखाली त्यांनी मराठी, कानडी, हिंदी अशी मिळून ११० पदे निवडली आहेत. वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी तत्त्वज्ञान आणि अनुभूती या दोन्हीचे ‘स्मरणपूर्वक’ त्यांनी केलेले विवेचन व संपादन-संकलन पाहून त्यांच्या बुद्धिशक्तीचे आश्चर्य तर वाटतेच, पण अभिमानही वाटतो. याच बुद्धिमत्तेचे स्वरूप त्यांनी नंतर लिहिलेल्या अनेक ग्रंथांतून विकसित झालेले दिसते. बीजवेलीचा महावृक्ष व्हावा, असे हे ‘दर्शन’ आहे. संतांच्या मुखाने ‘अनुभव’ बोलावेत, ही त्यांची विशेषतःच होती. ‘मला हे अनुभव आले आहेत’ असे न सांगता ‘मला अनुभवाला आलेल्या शिवाय एकही पद वा अभंग मी ग्रंथात नोंदविला नाही’ हेच त्यांचे सांगणे होते. ज्याला स्वानुभव येतात तोच दुसऱ्याचे अनुभव जाणू शकतो, हा निकष लावला तर त्यावरूनच त्यांची पारमार्थिक उंची (श्रेष्ठता) कळून घेता येते. श्री गुरुदेवांनी १९३३ साली ‘मराठी संतवाङ्मयातील’ परमार्थमार्ग व १९५४ साली हिंदी संतवाङ्मयातील परमार्थ मार्ग, १९३३ साली कन्नड संतवाङ्मयातील परमार्थ मार्ग ही पुस्तके (इंग्रजीतून) लिहून प्रकाशित केली गेली आहेत. पुढे त्यांनी ५०० (मराठी, कानडी, हिंदी) पदांचा संग्रह प्रसिद्ध केला, तसेच ‘परमार्थ सोपान’मध्ये हिंदी पदे व दोहे यांचे संकलन आहे.

आध्यात्मिक सर्वंकषता
हे सर्व पाहता ‘तत्त्वज्ञानाच्या सहाय्याने अनुभवांची तपासणी आणि अनुभवांच्या सहाय्याने तत्त्वज्ञानाची तपासणी, असा ‘गणिती-ताळा’ केला आहे, हेच लक्षात येते. १९११ साली ‘नित्यनेमावली’च्या स्वरूपात त्यांच्या बुद्धिमत्तेची चमक दिसून येते, तर १९२० साली ‘माझ्यापुरता माझा परमार्थ झाला आहे’ या त्यांच्या निवेदनाने त्यांची ‘आध्यात्मिक सर्वंकषता’ प्रत्ययाला येते. पुढे १९५७ सालापर्यंत त्यांनी परमार्थ प्रसाराचेच बहुथोर कार्य केले आहे. त्यांचे स्मृतीस सहस्त्रप्रणाम! त्यांचे चरणी दंडवत!!