प्रेम… आणि अभ्यास… करीयर…!

426
  • संजीवनी धुरी-जाधव

प्रेम… कॉलेजचा अभ्यास… करीयरचा ताण… साऱ्याचा मेळ कसा बसवायचा…?

प्रेमाला वयाचे, परिस्थितीचे बंधन नसते. महाविद्यालयीन दिवसांतील प्रेम, आकर्षण, एकमेकांविषयी वाटणारी ओढ या खूप आम गोष्टी आहेत. कुणीतरी आवडणं… त्या व्यक्तीलाही आपण आवडणं… भेटणं… झुरणं… फिरणं… सारं काही याच दिवसांत सहज घडणारं… छान खुलणारं… पण या साऱ्याबरोबरच तुम्ही महत्वाकांक्षी असाल, आयुष्यात चांगले करिअर घडवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायला हवे. आयुष्यात एखादा जोडीदार असणे यात काही गैर नाही, पण त्यासाठी अभ्यासाकडे पाठ फिरवणे हे काही बरोबर नाही. आपल्या स्वप्नांना योग्य दिशा द्यायची असेल आणि ध्येय गाठायचे असेल तर अधिक मेहनत घेऊन अभ्यास आणि नाते या दोघांचा समतोल राखता आला पाहिजे.

नात्यात समतोल राखा
अभ्यासासाठी जोडीदाराला सोडू नका. कारण त्याची निवड फार विचारपूर्वक केलेली असते. त्याच्याशी तुमच्या भावना जुळलेल्या असतात आणि जोडीदारासाठी अभ्यास सोडू नका. चांगले करिअर करायचे असल्यास अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करणे तेवढेच आवश्यक आहे. अशा व्यक्तींच्या संगतीत राहा ज्यांनी नाते आणि अभ्यास दोन्हीही टिकवून ठेवले आहे. त्यामुळे तुमचे नाते आणि अभ्यास या दोन्ही गोष्टींचा समतोल राखणे गरजेचे आहे.

ध्येयावर लक्ष केंद्रित करा
कायम तुमच्या डोक्यात शिक्षणाला पहिले प्राधान्य असायला हवे. त्यामुळे तुमच्या ध्येयामध्ये कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

परस्पर समन्वय साधा
तुमच्या नात्यामध्ये परस्पर समन्वय असायला हवा. तुम्ही एकाचवेळी तुमचे नाते आणि अभ्यास करु शकत नाही . तुमचा जोडीदार तुम्ही केलेल्या वेळापत्रकाबाबत गंभीर असणे तितकेच आवश्यक आहे. दोघंही शिक्षण घेणारे असतील तर त्यांनी आधी त्यांच्या शिक्षणावर लक्षकेंद्रित करायला हवे. जोडीदार तुमच्यासाठी काहीवेळ वाट पाहिल पण अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले तर वर्ष फुकट जाईल. त्यामुळे तुमच्यामध्ये आणि जोडीदारामध्ये परस्पर समन्वय असणे गरजेचे आहे.

एकत्र अभ्यास करा
दोघंही फार महत्वाकांक्षी असाल तर ग्रंथालयात एकत्र अभ्यास करा. त्यामुळे एकमेकांसोबत वेळ घालवता येईल आणि अभ्यासावरही काही परिणाम होणार नाही.

वेळेचे योग्य नियोजन करा
अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा आणि त्याप्रमाणे तुमच्या इतर कामांचे नियोजन आखा. असे केल्यास तुम्हाला तुमच्या नात्यासाठीही काही वेळ देता येईल. अभ्यास करण्याच्या तणावामुळे आपल्या नातेसंबंधांवर त्याचा परिणाम होत असतो. पण तुम्हाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे असेल तर नात्यांमध्ये अडकून पडू नका. त्याचा काही प्रमाणात अभ्यासावर परिणाम होत असतो.

एकमेकांना प्रोत्साहन द्यायला हवे
सगळ्यात आधी अभ्यासाकडे लक्ष द्यायला हवे. कॉलेज जीवनात प्रेम होणं हे वाईट नाही. पण ते नातं गांभीर्याने घेऊन टिकवता यायला हवे. त्यासाठी दोघांमध्ये एकमेकांना समजून घेण्याची मानसिकता हवी. दोघांनी एकमेकांना प्रोत्साहनच द्यायला हवे. तरच त्यांना नाते आणि शिक्षण याचा समतोल राखता येईल. त्यांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम व्हायला नको. – प्रिया जाधव, सिलिका इन्स्टिटय़ूट
जोडीदार समजूतदार हवा
कॉलेजमध्ये गर्लफ्रेण्ड, बॉयफ्रेण्ड असणं कॉमन झालंय. काहीजण प्रेमात बुडून अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. पण नातं आणि शिक्षण सांभाळणे सोपे नाही. त्यासाठी वेळ आणि त्याबद्दल एकनिष्ठता असणे तेवढेच आवश्यक आहे आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमचा जोडीदार समजुतदार असेल. त्याला तुमच्या स्वप्नांची पर्वा असेल. तरच यशस्वी करिअर घडवू शकाल. – शुभम बेंडल, डी. जी. रुपारेल कॉलेज

वेळेचे नियोजन आखा
मला तरी कॉलेज जीवनात प्रेम बसणं गैर वाटत नाही. पण प्रेम सांभाळून अभ्यासाबाबतही तितकेच गंभीर असलं पाहिजे. मुलांना चांगलं वाईट कळतं पण कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं हे ज्याला कळेल त्यांचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार नाही. अभ्यासही चांगला करता आला पाहिजे आणि नातेही जोपासता आले पाहिजे त्यासाठी वेळेचे नियोजन तितकेच महत्वाचे आहे. – विश्वा पाटील, चेतना कॉलेज

परीक्षेचा काळ

परीक्षेच्या काळात एकमेकांमध्ये समजूतदारपणा असण्याची गरज असते. परीक्षेचा काळ थोडा ताणतणावाचा असतो. अभ्यासाबाबत आपण थोडे गंभीर असतो अशावेळी नात्यासाठी वेळ देता येत नाही, नात्यांवर त्याचा परिणाम होतो. परीक्षा झाल्यावर एकमेकांना वेळ देता येईल. त्यामुळे या काळात अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे असते.

ठाम राहा
सगळ्यात आधी स्वतःशी ठरवा आपले नाते आणि अभ्यास याचा समतोल कसा राखायचा. त्यासाठी कुठलेही संकल्प करताना दिवसा ठरवायचे आणि रात्री कंटाळा करायचा असे न करता. ठरवलेली कामे त्या-त्या वेळेतच व्हायला हवीत हे मनाशी पक्के ठेवा.

आपली प्रतिक्रिया द्या