ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव

शिरीष कणेकर

आय.सी.सी. (इंटरनॅशनल क्रिकेट कॉन्फरन्स) ही जागतिक क्रिकेटचा समन्वय साधणारी व संघर्षप्रसंगी लवादाची भूमिका बजावणारी निःपक्षपाती संस्था आहे; परंतु ती खरोखरच निःपक्षपाती आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्याजोगी संस्थेची वर्तणूक आढळून येते.

डी. आर. एस. प्रकरणात आय. सी. सी.ने ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ यावर कोणताही ठपका न ठेवता त्याला ‘बाइज्जत बरी’ केलंय. त्याची चूक (की गुन्हा) सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट असताना संघव्यवस्थापक लेहमन, माजी कर्णधार किम हय़ूज व ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळ हे खुशाल स्मिथला निर्दोष ठरवून मोकळे झाले. स्मिथ निर्दोष कसा हे ते सांगत का नाहीत?

स्मिथ खेळत होता. उमेश यादव गोलंदाजी करत होता. एक शीघ्रगती चेंडू स्मिथच्या पॅडच्या बुंध्याशी लागला. जोरदार ‘अपील’ झाले. अंपायरनं बोट वर केलं. स्मिथला डी.आर.एस.चा कौल घ्यावासा वाटला. फाइन. पण अलीकडे होतंय काय, तर येता-जाता कौल मागितला तर कौल वाया जातो व पदरी असलेले कौल संपून जातात. अन् खरोखर कौल मागण्याची नितांत आवश्यकता असते तेव्हा कौलच शिल्लक नसतात. सॉलीड गोची होते. चुटपुट लागून राहते. आधी वापरून फुकट घालवले अशी रुखरुख वाटत राहते. तेव्हा कौल आपल्या बाजूनं जाण्याची खात्री असेल तेव्हाच कौल मागावा. पण खात्री कशी पटावी? स्मिथनं शक्कल लढवली. पॅव्हेलियनमध्ये टीव्हीसमोर बसलेल्या व ‘क्लोज’ कॅमेऱ्यात ‘रिप्ले’ बघणाऱ्या आपल्या माणसाकडे त्यानं सूचक दृष्टी टाकून पृच्छा केली. हे अर्थातच नियमबाहय़ होतं. जगभरच्या क्रिकेटप्रेमींनी स्मिथची आगळीक (टी.व्ही.वर) डोळ्यांनी पाहिली. ही आयडिया आपण स्मिथला दिल्याची कबुली नंतर हँडकोंबनं दिली. तो स्मिथबरोबर दुसऱ्या बाजूनं खेळत होता. खुद्द स्मिथनंही ती घटना मान्य केली; पण प्रकार हेतुपुरस्सर नाही, तर तत्कालीक बुद्धिऱ्हासातून घडला असा अजब, अनाकलनीय शोध त्यानं लावला. बुद्धीच्या वतीनं त्यानं दिलगिरी व्यक्त केल्याचे वाचनात आलेले नाही.

त्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट ठामपणे स्मिथच्या पाठीशी उभं असल्याचे वृत्त पेपरात वाचलं. नियमबाह्य वर्तनाच्या पाठीशी ऑस्ट्रेलियन क्रिकेट उभं राहतं? नियमांची सर्रास पायमल्ली होत्येय याची ऑस्ट्रेलियाला काहीच पडलेली नाही? आपल्या माणसाला कुठल्याही परिस्थितीत पाठीशी घालायचं हे त्यांचं निलाजरं धोरण दिसतंय. निदान आय.सी.सी.नं योग्य, पारदर्शक भूमिका घ्यावी अशी रास्त अपेक्षा होती. स्मिथचा दोष उघड असताना व पूर्णपणे सिद्ध झालेला असताना आय.सी.सी. त्याच्यावर साधा ठपका ठेवायला तयार नाही. शिक्षा नका करू, पण सौम्य समज तरी द्याल की नाही? तेही नाही. यानंतर आपण आय.सी.सी.ला निःपक्षपाती म्हणायचं? आपली गाऱ्हाणी घेऊन त्यांच्याकडे धावायचं? ते आपले कैवारी व तारणहार आहेत असं म्हणत राहायचं?

आपला लाडका ‘लबाड कोल्हा’ सुनील गावसकर यानं एक मस्त आयडिया काढल्येय. तो म्हणतो, कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं स्मिथसारखंच करावं. म्हणजे डी.आर.एस.चा कौल घेण्यापूर्वी आत बसलेल्या माणसाला ‘कन्सल्ट’ करावी. सहाजिकच ऑस्ट्रेलियन संघ तांडव करील. लोण आय.सी.सी.पर्यंत जाईल. मग आय.सी.सी. काय करते बघू या. कोहलीविरुद्ध काही कारवाई करायला त्यांना तोंड नसेल. तोंड दाबून बुक्क्यांचा मारा अशी त्यांची अवस्था होईल. गावसकरची ही ‘जशास तसे’ स्कीम म्हणता येईल. त्यानं प्रकरण अधिक चिघळेल हे मान्य, पण आय.सी.सी. व ऑस्ट्रेलियन क्रिकेट यांना आरसा दाखवल्यासारखं होईल. अर्थात, या बोलण्याच्या गोष्टी झाल्या. खरोखरच असं कोणी करीत नसतं. विराट कोहली करूही शकतो म्हणा. तो आहे गरम डोक्याचा व उसळत्या रक्ताचा. सगळेच महेंद्रसिंह धोनी कसे असणार?

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या